मृत्यूपत्र हे आपल्या मालमत्तेच्या वाटणीत अत्यावश्यक दस्तावेज मानले गेले आहे. त्यामुळे ते तयार करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे असते. विशेषतः यामध्ये नमूद केलेल्या अटी कायदेशीररित्या मान्य असाव्यात हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. काही अनाठायी अटींमुळे वारसपत्र नामंजूर होण्याची शक्यता वाढते. वारसापत्रात असलेल्या अटी किंवा परिस्थितीशी निगडीत असलेल्या तरतूदी भारतीय वारसा हक्क कायदा 1925 मध्ये दिल्या आहेत. कंडीशनल बिक्वेस्ट (सशर्त वारसापत्र), कंटिजंट बिक्वेस्ट (परिस्थितीजन्य वारसापत्र), ऑनरस बिक्वेस्ट (मान्यताप्राप्त वारसापत्र), वॉईड बिक्वेस्ट (अमान्य वारसापत्र) याचा समावेश होतो.
यासंबंधी काही उदाहरण सांगता येतील.
अशक्य अट : भारतीय वारसा कायदा 1925 नुसार एखादे अशक्य काम पूर्ण करण्याची अट घालणारे वारसापत्र नामंजूर होईल. उदा. जर एखाद्या मालमत्तेचा अधिकार एखाद्या व्यक्तीला देताना त्याने एका दिवसात 1 हजार किलोमीटर धावून पूर्ण करावे, अशी जर अट घातली असेल तर ती अट आणि वारसापत्र फेटाळले जाईल.
बेकायदा किंवा अनैतिक अट: जर वारसापत्रात बेकायदा आणि अनैतिक अट असेल तर ते वारसापत्र नामंजूर होऊ शकते. उदा. जर एखाद्या व्यक्तीने वारस नेमताना संबंधिताने पत्नीला सोडचिठ्ठी दिली तरच त्याला वारसापत्राचा लाभ मिळेल, अशी जर अट घातली असेल तर ती नामंजूर ठरू शकते. त्याचबरोबर एखाद्या अटीमुळे दुसर्या व्यक्तीचे नुकसान होत असेल तर ते वारसापत्र आणि अट नामंजूर होईल.
अटींचे पालन करणे: जर एखाद्याने वारसापत्रात मांडलेली अट उत्तराधिकार्याला पालन करता येणे व्यवहार्यदृष्ट्या शक्य असेल तर ते वारसापत्र आणि अट मान्य करता येते. उदा. जर एखाद्याने वारसापत्रात तीन व्यक्तीच्या सहमतीने वारसदाराने लग्न करावे अशी जर अट असेल आणि तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल तर उर्वरित दोघांच्या मंजूरीने विवाह करत असेल तर त्या वारसापत्रातील अट पूर्ण केल्याचे मानले जाईल.
अनिश्चित घटनेसंबंधी अट: एखादी विशिष्ट घटना झाल्यास किंवा न झाल्यास ते वारसापत्र रद्द ठरविले जाईल, अशीही अट घालता येते. उदा. एखाद्या व्यक्तीने वारसापत्रात मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत घर सोडून अन्यत्र स्थलांतरित होणे गरजेचे आहे आणि तो ठरलेल्या कालावधीत तो नाही गेला तर वारसापत्राच्या माध्यमातून मिळालेले अधिकार रद्द होऊ शकतात.
मृत्यूपत्र करताना आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्वासात घ्यावे. शक्यतो सर्वांना समोर बसवूनच आपल्या संपत्तीचे वाटप कसे करणार आहोत, हे जाहीर करावे. सर्वांसमक्ष संपत्तीचे वाटप कसे होईल हे जाहीर केल्याने नंतर वादविवाद होत नाहीत. वडिलोपार्जित मालमत्ता ही तुमच्या वारसांना कायदेशीररित्या मिळत असतेच. मात्र, तुम्ही कमवलेला पैसा, बनवलेले घर, फ्लॅट, प्लॉट, सोने-नाणे आदी मालमत्ता ही कुटुंबियांमध्ये कोणत्या प्रकारे वाटावयाची याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागतो. तुमच्या निर्णयाला कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. जर तुम्ही कुटुंबातील सदस्यांना बोलावून संपत्तीच्या वाटपाचे विवरण सांगितले तर तुम्हाला त्याच क्षणी कोणीही काहीही बोलणार नाही. मात्र, तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मुलांमध्ये, पत्नीमध्ये संपत्तीवरून वाद होण्याची शक्यता असते. पतीच्या मालमत्तेतील वाटा मिळू न शकल्याने अनेक विधवा महिलांची स्थिती कठीण बनते असे मध्यंतरी एका पाहणीत दिसून आले होते. अशा अनेक महिलांनी पोलिसांकरवी तसेच न्यायालयाकरवी आपल्या पतीच्या मालमत्तेतील वाटा मिळवला आहे. तुमच्या कुटुंबात असे काही घडू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर मृत्यूपत्र करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
नवरा-बायको एकत्रितपणे एकच मृत्युपत्र बनवू शकतात.
यामध्ये दोघांनीही एकमेकांच्या नावाने सर्व मालमत्ता लिहून दिलेली असते आणि शेवटी ती परिवाराला व नातलगांना लिहून दिली असते. पण हे संयुक्त मृत्युपत्र जेव्हा दोघांचाही मृत्यू होईल तेव्हाच लागू होते, हे लक्षात ठेवावे.
आपल्या कुटुंबातील सर्वसदस्यांना बोलावून तसेच आपले काका, मामा अशा अन्य नातलगांपैकी कोणालातरी बोलावून त्यांच्या समक्ष संपत्तीची वाटणी करावी. वाटणी करताना कोणाला किती हिस्सा द्यायचा याचा निर्णय पूर्णपणे तुमचा असतो. सर्व सदस्यांना आपण कोणत्या पद्धतीने संपत्तीचे वाटप करणार आहोत, हे सांगितल्यानंतर तसे मृत्यूपत्र तयार करावे. मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून आपल्या कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची सही घ्यावी. आपल्याला मृत्यूपत्र शासकिय कार्यालयात जाऊन रजिस्टर करुन त्याच्या प्रती कुटुंबातील सदस्यांना वितरित कराव्यात. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुम्ही निर्धास्त राहू शकता.
मृत्यूपत्र तयार करताना मालमत्तेच्या वाटपाबाबत स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. म्हणजे तुमच्या मालकीची तीन मजली इमारत आहे आणि ही इमारत तुम्हाला दोन मुली आणि एक मुलगा यांच्यामध्ये वाटप करायची आहे. तर मृत्यूपत्र तयार करताना तुमच्या मालकीच्या इमारतीतील कोणता मजला कोणाच्या नावाने राहील याचा स्पष्ट उल्लेख केला पाहिजे. सोने-नाणे, रोख पैसे यांच्या वाटपाबाबतही मृत्यूपत्रात स्पष्ट सूचना करणे आवश्यक आहे. सोन्या-नाण्यापैकी किती वाटा कोणाला राहील. रोख रकमेपैकी किती वाटा कोणाला जाईल, याचा उल्लेख अतिशय स्पष्ट शब्दात करणे गरजेचे आहे. तुमच्या मुलांपैकी एखाद्याला तुम्हाला काहीच देण्याची इच्छा नसेल तर तुम्ही तशी रचनाही करू शकता. तुम्ही कमावलेल्या मालमत्तेचे वाटप कसे करायचे याचा संपूर्ण अधिकार तुम्हाला असतो. त्यामुळे तुमच्या मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देणे शक्य होत नाही. ज्या मुलांना तुम्हाला अधिक वाटा द्यायचा असेल त्यांना तुम्ही तो वाटा देऊ शकता.
मृत्यूपत्राची नोंदणी केल्यावर त्यावर कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही. फक्त नोंदणीचे शुल्क (रजिस्ट्रेश फी) आपल्याला भरावी लागते. खबरदारीचा उपाय म्हणून मृत्यूपत्राची निबंधक कार्यालयात जाऊन नोदणी करणे योग्य ठरते.