PVR-Inox Movie Offer: चित्रपट रसिकांसाठी चित्रपट पाहण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यामुळे अनेक चित्रपटगृहाच्या मालकांकडून अनोखी शक्कल लढवली जात आहे. त्यात PVR-Inox या साखळी चित्रपटगृहाच्या कंपनीने आजपासून (दि. 16 ऑक्टोबर) मासिक सब्स्क्रिप्शन पास लॉन्च केला आहे. या पासच्या मदतीने प्रेक्षक प्रत्येक महिन्याला 10 चित्रपट पाहू शकणार आहेत.
PVR-Inox ची 'पासपोर्ट' सर्व्हिस
पीव्हीआर-आयनॉक्स या साखळी चित्रपटगृहाने आजपासून मासिक सब्स्क्रिप्शन योजना लॉन्च केली आहे. या योजनेला 'पासपोर्ट' हे नाव देण्यात आले असून यासाठी चित्रपट रसिकांना प्रत्येक महिन्यासाठी 699 रुपये मोजावे लागणार आहेत. 699 रुपयांत प्रेक्षकांना 10 चित्रपट पाहायला मिळणार आहेत. चित्रपट पाहण्यासाठी 'पासपोर्ट' काढलेल्या प्रेक्षकांना याचा वापर सोमवार ते गुरूवार या दिवसांसाठीच करता येणार आहे. विकेन्डच्या दिवशी या योजनेंतर्गत चित्रपट पाहता येणार नाही.
पासपोर्ट स्कीम फक्त पहिल्या 20 हजार युझर्सना
कंपनीने ही योजना फक्त 20 हजार सब्स्क्रिप्शपुरती सिमित ठेवली आहे. तसेच ही ऑफरसुद्धा ठराविक कालावधीपर्यंतच सुरू राहणार आहे. कंपनी या ऑफर अंतर्गत प्रेक्षकांना मल्टी यूड व्हाऊचर देणार आहे. या व्हाऊचरचा वापर करून प्रेक्षक एका दिवसात एका चित्रपटाच्या तिकिटासाठी याचा वापर करू शकतो.
पासपोर्ट स्कीमचा वापर करताना प्रेक्षकांना काही नियमांचा वापर करावा लागणार आहे. जसे की, या योजनेतील प्रेक्षकांच्या तिकिटाची किंमत 350 रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि यावर प्रेक्षकांना अतिरिक्त सुविधा शुल्क आणि टॅक्स द्यावा लागणार आहे. हे तिकिट प्रेक्षक PVR Inoxच्या अॅपवरून किंवा वेबसाईटवरून बुक करू शकतात. एखाद्या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 250 रुपये असेल आणि त्याच्या ऑनलाईन बुकिंगची किंमत 25 रुपये असेल, तर पासपोर्टधारक प्रेक्षकांना फक्त 25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
या राज्यांमध्ये पासपोर्ट सेवा नाही मिळणार
भारताच्या दक्षिण भागातील कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांसह चंदीगढ, पुद्दुचेरी, श्रीनगर या केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू नाही. या व्यतिरिक्त भारतातील स्रव पीव्हीआर आणि आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये पासपोर्ट स्कीम सुरू आहे.
कोविडनंतर अनेक चित्रपटरसिकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली. यामुळे सिनेमा मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यातून मार्ग काढण्यासाठी अनेक चित्रपटगृहांनी वेगवेगळ्या क्लृपत्या सुरू केल्या. काही मल्टीप्लेक्स थिएटर मालक तर वर्ल्ड कपमधील मॅचेस सुद्धा दाखवत आहेत.