बॅंकांनी कर्जाचा व्याजदर कमी केला की, कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ होते. त्यात घरासाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक जण स्वत:चे घर असावे, हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी गृह कर्ज (Home Loan) घेत असतो. सर्व प्रकारच्या कर्जामध्ये गृह कर्ज हे सर्वांत मोठ कर्ज मानले जाते. कर्ज घेतल्यानंतर काही काळाने बरेच जण कर्ज फेडण्यातच आपले आयुष्य खर्ची घालवत असतात. प्रत्येकाला कर्जमुक्त आयुष्य जगावं असे वाटत असते. पण त्यातून बाहेर कसं पडायचे याचा मार्ग माहित नसतो. तर आज पण कर्जाच्या विळख्यातून लवकर कसे बाहेर पडता येऊ शकेल, हे समजून घेणार आहोत.
कर्ज देणाऱ्या बॅंका किंवा वित्तीय संस्था या नेहमी कर्जाच्या सुरूवातीच्या काळात महिन्याच्या ईएमआयमधून व्याजाची रक्कम वसूल करत असतात. आणि हा काळ खूप मोठा असतो. इतक्या वर्षात आपल्या मुळ मुदद्लीतील थोडीशीच रक्कम कमी झालेली असते. म्हणून महिन्याच्या ईएमआयबरोबरच वेळोवेळी मूळ रकमेची परतफेड करणे फायद्याचे ठरू शकते. कर्ज घेतल्यापासून सुरूवातीची 5 वर्षे अधिकाधिक मूळ रक्कम फेडण्यासाठी दिली तर एकूण बॅंकेला व्याजापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.
कर्जाच्या ओझ्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी छोट्या-छोट्या खर्चावर नियंत्रण आणून आणि योग्य नियोजनाद्वारे तुम्ही कर्जातून लवकर मुक्त होऊ शकता. यासोबत आणखी काही उपाय आपण पाहुया.
- आपल्याकडे कोणत्या प्रकारची कर्ज आहेत याचा आढावा घेऊन सर्वप्रथम ज्याचा व्याजदर जास्त आहे. अशी कर्जे प्रथम फेडा. जसे की, क्रेडिट कार्ड कर्ज (Credit card loan), वैयक्तिक कर्ज (Personal loan), शैक्षणिक कर्ज (Educational loan) आणि सर्वात शेवटी गृह कर्ज (Home loan) फेडण्यास प्राधान्य द्या.
- पगारवाढ झाली की, लगेच कर्जाचा मासिक हप्ता वाढवून घ्या. ईएमआयमध्ये थोडीशी वाढ करता आली तरी ती करून घ्यावी. कारण यामुळे बचतीची सवय तर लागतेच पण त्याचबरोबर वाढवलेल्या ईएमआयमधून मुद्दल वजा होत रहाते.
- महिन्याभरातले सर्व खर्च भागवून झाल्यानंतर शिल्लक राहिलेली रक्कम कर्जाच्या खात्यात वळती करावी.
- कर्जाचा हप्ता कमी करण्याऐवजी कर्जाची मुदत कमी करून घेणे. यामुळे व्याजाचे प्रमाण कमीकमी होत जाते.
- गृहकर्ज घेतलेल्या बॅंकेशी किंवा वित्तीय संस्थेशी नेहमी संपर्कात राहा. बॅंका किंवा वित्तीय संस्था वेळोवेळी व्याजदर कमी करण्याच्या योजना राबवत असतात. त्याचा फायदा घेऊन व्याज दर कमी करून घ्या.
- कर्जाचा हप्ता कधीच चुकवा नका. चेक किंवा इसीएस बाऊंस झाला तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.
कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळे पर्यायांचा वापर करू शकता. प्रत्येकाची स्थिती समान नसते. त्यामुळे अशाप्रकारे तुम्ही तुमचे पर्याय शोधून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या पद्धतीने नियोजन करून नक्कीच लवकर कर्जमुक्त होऊ शकता.