• 04 Oct, 2022 00:21

लवकरच Made in India ‘iPhone’ मिळणार, टाटाकडून जय्यत तयारी! तैवानच्या कंपन्यांशी चर्चा

Apple iPhone

अॅपल कंपनीला आयफोन तयार करण्यासाठी सुटे भाग पुरवणाऱ्या तैवानमधील विस्ट्रॉन कॉर्पोरेशन (Wistron) कंपनीशी टाटा ग्रुपची (TATA Group) चर्चा सुरू आहे. टाटा ग्रुप तैवानच्या या कंपनीशी भागीदारी करून भारतात संयुक्त उपक्रमांतर्गत (Joint Venture) iPhoneची निर्मिती करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या उत्पादनातील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आणि जगासमोर इतर पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टिने भारतातील टाटा ग्रुप आयफोनचं उत्पादन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी टाटा ग्रुप (Tata Group) तैवानमधील कंपन्यांशी चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. अॅपल कंपनीला आयफोन तयार करण्यासाठी तैवानमधील विस्ट्रॉन कॉर्पोरेशन कंपनी सुटे भाग पुरवते. या कंपनीशी टाटा कंपनीची चर्चा सुरू आहे. टाटा ग्रुप तैवानच्या या कंपनीशी भागीदारी करून भारतात संयुक्त उपक्रमांतर्गत (Joint Venture) iPhoneची निर्मिती करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 

टाटा ग्रुप टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी कंपनी तैवानमधील विस्ट्रॉन कॉर्पोरेशनशी संबध जोडून या क्षेत्रात दमदारपणे पाऊल टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे. विस्ट्रॉन कंपनी प्रोडक्ट डेव्हलपमेंट, सप्लाई चैन आणि पार्ट्स असेंम्बल करण्यामध्ये माहिर असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विस्ट्रॉन कंपनीसोबत टाटा ग्रुपची चर्चा यशस्वी ठरली तर टाटा ग्रुप हा आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरेल. सध्या विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी या तैवानच्या कंपन्या चीन आणि भारतात आयफोन बनवत आहेत.

भारतात जर एका भारतीय कंपनीकडून आयफोनची निर्मिती होऊ लागली तर भारत भविष्यात चीनला आव्हान देऊ शकतो. सध्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्मितीत चीनचा कोणी हात धरू शकत नाही. पण कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि चीनचे अमेरिकेशी बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.

टाटा ग्रुप विस्ट्रॉन कंपनीमधील भागभांडवल खरेदी करू शकते किंवा या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे भारतात नवीन कंपनी सुरू करू शकतात. अॅपल कंपनीलासुद्धा पुरवठा आणि उत्पादनाच्याबाबतीत चीनवर असलेलं अवलंबित्व कमी करायचं आहे, असं सांगितलं जातं. तसेच अॅपलला भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करायचे आहे. यासाठी अॅपल कंपनीसुद्धा नवीन पुरवठादारांच्या शोधात आहे. पण आयफोनचे उत्पादन हे किचकट काम मानलं जातं. कारण याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना अॅपलच्या अनेक कठोर नियमांचं आणि गुणवत्तेच्या नियंत्रणाचे पालन करावं लागतं.

टाटा ग्रुपची विस्ट्रॉन कंपनीसोबतची चर्चा यशस्वी झाल्यास भारतातील आयफोनचे उत्पादन पाच पटीने वाढेल. टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी टाटा ग्रुपच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि हायटेक उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले होते.