मागच्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर कोणत्या ना कोणत्या कंपनीत नोकरकपात (Layoffs) होत असल्याचं दिसून येतंय. आयटी, ई-कॉमर्स आणि इतर मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरूच आहे. आता मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ग्रुपमधल्या लिंक्डइननंदेखील नोकरकपात करणार असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे कंपनीनं याआधीदेखील जवळपास 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. आता नव्या कपातीत आणखी 716 कर्मचाऱ्यांना काढलं जाणार आहे. याविषयी लिंक्डइननं (LinkedIn) अधिकृतरित्या माहिती दिलीय. यासोबतच कंपनी आपलं चायनीज व्हर्जन (Chinese version) असलेलं जॉब अॅपदेखील बंद करणार आहे.
Table of contents [Show]
महसूल वाढ मात्र कारण आर्थिक संकटाचं...
मायक्रोसॉफ्ट कंपनीनं आधीच कर्मचारी कपातीत आपलं नाव पुढे केलं. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं. आता लिंक्डइननं जागतिक आर्थिक संकटाचं कारण पुढे करून इतर कंपन्यांप्रमाणं आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवलाय. लिंक्डइनमध्ये जवळपास 20,000 कर्मचारी आहेत. मागच्या वर्षभरात म्हणजेच 2022मध्ये कंपनीचा महसूल प्रत्येक तिमाहीत वाढतच गेला होता. त्यामुळे महसूल वाढत असताना आर्थिक संकटाचं कारण देऊन आपल्या कर्मचाऱ्यांना बेकार करण्याच्या निर्णयाचं सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त होतंय.
Microsoft-owned #LinkedIn has laid off 716 employees, as the company makes changes to its Global Business Organisation (GBO) and exits the China market.#layoffs pic.twitter.com/S4lkgwCozg
— IANS (@ians_india) May 9, 2023
लाखो कर्मचाऱ्यांना गमवावा लागला जॉब
मागच्या सहा महिन्यांचा विचार करता लाखो कर्मचाऱ्यांना विविध कंपन्यांतून आपला जॉब गमवावा लागलाय. या नोकरकपातीची माहिती देणाऱ्या Layoffs.fyiनुसार, मागच्या सहा महिन्यांत जागतिक स्तरावर 2 लाख 70 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावल्याचं म्हटलंय.
कमाईचे मार्ग कोणते?
लिंक्डइनच्या कमाईचे दोन मार्ग आहेत. एक तर जाहिरात विक्री तर दुसरा मार्ग म्हणजे सबस्क्रिप्शन. दरम्यान, लिंक्डइनचे सीईओ रायन रोस्लन्स्की यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पत्र लिहिलंय. ऑपरेशन्स, सेल्स आणि सपोर्ट टीममधल्या काही कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
चायनीज अॅप करणार बंद
आर्थिक संकटाचं कारण देत कंपनी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता बेकारी वाढवणारे निर्णय घेत असल्याचा सूर उमटतोय. वातावरण आव्हानात्मक असल्याचं सांगत कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय तर घेतलाच मात्र त्यासोबतच आपलं चायनीज व्हर्जन असलेलं इन करिअर्स (InCareers) हे अॅपही बंद करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 9 ऑगस्टपर्यंत हे प बंद केलं जाणार आहे.
कंपनीनं आता 716 कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतलाय. मात्र कंपनीतल्या या बदलांमुळे नव्या 250 नोकर्या निर्माण होतील, असं सीईओ रायन रोस्लन्स्की यांनी सांगितलंय. आर्थिक संकटामुळे जॉब गमवावा लागलेल्या बेकार कर्मचाऱ्यांना या नव्या पदांसाठी अर्ज करता येईल, असंही सांगण्यात आलंय.
मायक्रोसॉफ्ट ग्रुप आणि नोकरकपात
मागच्या काही महिन्यांपासून मायक्रोसॉफ्ट ग्रुपमधल्या विविध कंपन्यांतून कर्मचारी कपात करण्यात आलीय. जानेवारीत 10,000 कर्मचाऱ्यांची छाटणी करण्याची घोषणा कंपनीनं केली होती. ग्रुपमधल्या सरफेस, होलोलेन्स, झेबॉक्स, गीटहब अशा विविध कंपन्यांमधूनही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. मायक्रोसॉफ्ट ग्रुपसह इतर काही मोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केली. यात प्रामुख्यानं अॅमेझॉन, मेटा, ट्विटर, अॅसेंचर अशा विविध कंपन्यांचा समावेश आहे.