रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) युपीआयमध्ये एक नवीन फीचर जोडले गेले आहे. याला सिंगल ब्लॉक, मल्टीपल डेबिट (Single Block and Multiple-Debits) असे नाव देण्यात आले आहे. हे फीचर नोकरी करणाऱ्यांसाठी मदत करणार ठरेल. यामध्ये सॅलरी फिक्स करण्याचा ऑप्शन मिळेल. ज्यामध्ये मासिक खर्चासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच UPI पेमेंट सेट करू शकता. यामुळे स्वत:च्या खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे सांगितले जातेय.
असा करून घ्या फायदा (Benefits of UPI New Feature)
हे फीचर ऑटो डेबिटचेच एक एक्सटेंशन आहे. समजा तुम्ही प्रत्येक महिन्यात खूप सारे ओटीटी app सारख्या सेवा रीचार्ज करता तर त्यासाठी पगाराचा काही हिस्सा UPI पेमेंटसाठी फिक्स करू शकता. त्यानंतर रीचार्ज डेटवर आपोआप पेमेंट होईल. या फीचरच्या मदतीने एक किवा अधिक महिन्याच्या रीचार्जसाठी अमाऊंट फिक्स करू शकता.
समजा, तुमचा 20 हजार रुपये इतका पगार आहे. आणि रीचार्ज आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी तुम्हाला 5 हजार रुपये इतका खर्च येतो. अशा स्थितीत तुम्ही महिन्यासाठी 5 हजार किवा 3 महिन्यासाठी 15 हजार रुपये UPI पेमेंटसाठी फिक्स करू शकता. यामुळे प्रत्येक महिन्याला तुम्हाला UPI पेमेंट करावे लागणार नाही. यात फंड हे ग्राहकांकडेच राहतील आणि उत्पादन किंवा सेवा वितरित झाल्यानंतर ते डेबिट केले जातील. काही वेळा आपण पेमेंट करायला गेल्यावर आपला अवांतर खर्च होत असतो. यामुळे अवांतर पैसे खर्च होण्यापासून स्वत:ला रोखणे शक्य होऊ शकते.
नवीन फीचर्समुळे UPI पेमेंट सुलभ व सुरक्षित होईल - शक्तीकांत दास
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून स्पष्ट करण्यात आले आहे की, या फीचरमुळे UPI पेमेंट सुलभ आणि अधिक सुरक्षित होईल. 'सिंगल ब्लॉक, मल्टिपल डेबिट' नावाचे हे फीचर ग्राहक आणि सेवा देणारे या दोघांनाही उपयुक्त ठरेल “यूपीआयमध्ये सिंगल ब्लॉक आणि मल्टीपल-डेबिट कार्यक्षमता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे ई-कॉमर्स स्पेसमध्ये पेमेंट करणे आणि सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीमध्ये लक्षणीय वाढ होईल,” असे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले आहे.