जागतिक स्तरावर मंदीचं सावट अजूनही घोंगावत आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोकरकपातीचा धडाका लावला आहे. येत्या काळात आणखी 50 लाख कर्मचाऱ्यांना नोकरी गमावावी लागेल, अशा बातम्याही येत आहेत. दरम्यान, अॅमेझॉन या बलाढ्य कंपनीतील नोकरकपात अद्याप थांबली नाही. आर्थिक चणचणीचे कारण पुढे करत अॅमेझॉनने गेमिंग विभागातील 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
अनेकदा केली कर्मचारी कपात
जगभरात कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढत आहे. अनेक दिग्गज कंपन्या त्यांच्या एकूण वर्कफोर्समधून मोठी कपात करत आहेत. टेक जायंट अॅमेझॉनने मार्च महिन्यामध्येच 9000 कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. Amazon ही दुसऱ्यांदा मोठी कर्मचारी कपात करण्याची घोषणा होती. या कंपनीने विविध विभागांमधून हजारो कर्मचारी कमी केले आहेत.
माहिती - तंत्रज्ञान कंपन्या कर्मचारी कपातीत आघाडीवर
काही दिवसांपूर्वी मेटाने (Meta) 10000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. याआधी Amazon कंपनीने 18000 कर्मचाऱ्यांना कर्मचारी कमी करण्याची कंपनीची ही दुसरी वेळ होती. टेक कंपन्यांची वाढती नोकर कपात अनेकांसाठी डोकेदुखी ठरली. यामुळे अनेकांना नोकरीवर गदा येण्याची भीती आहेत. गेल्या तीन महिन्यात कंपनीने एकूण 27000 कर्मचारी कपात केली आहे.
तसंच Unacademy, Virgin Orbit, Fanclash, Accenture, MacDonald's, GoMechanic, Indeed, GM, Apple, Swiggy, Flipcart, USB-Credit Suisse, Walmart, Vipro, Microsoft, Meta, Twitter, Ericsson, Google, Salesforce, Twilio,TikTok, GoDaddy, Byju's यासारख्या अनेक कंपन्यांनी आतापर्यंत हजारोंच्यावर कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.