5G स्पेक्ट्रमच्या लिलावात शुक्रवारी (दि.29 जुलै) 23 व्या फेरीनंतर 1,49,855 कोटी रूपयांची बोली लागली. कंपन्यांकडून 24 वी फेरी सुद्धा सुरू झाल्याचे कळले आहे. या बोलीत रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि गौतम अदानी यांची अदानी डाटा ही कंपनी उतरली आहे. लिलावाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी ही बोली 1,49,623 कोटी रूपयांवर पोहोचली होती.
देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव मंगळवारपासून (दि.26 जुलै) सुरू झाला. या लिलावासाठी टेलिकॉम क्षेत्रातील मोठ्या कंपन्या तयारीनिशी उतरल्या आहेत. 5Gबाबत सर्वसामान्य लोकांमध्येही मोठी उत्सुकता आहे. 5Gच्या आगमनाला इंटरनेटच्या दुनियेतील क्रांती असं म्हटलं जात आहे. कारण 5जीमुळे सध्याच्या इंटरनेटचा स्पीड 10 पटीने वाढेल, असं सांगितलं जात आहे. याचा सकारात्मक परिणाम विविध क्षेत्रांवर होणार आहे. 5जी मोबाईल कंपन्यांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 5जीच्या आगमनामुळे शेतीमध्येही तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वीच ड्रोनच्या पद्धतीने डिजिटल शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ड्रोन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
71 टक्के स्पेक्ट्रमची विक्री
रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि अदानी ग्रुप यांनी स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी एकूण 21,800 कोटी रूपयांची रक्कम आगाऊ जमा केली. लिलावासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी सुमारे 71 टक्के स्पेक्ट्रम विकले गेले आहेत.
5Gचा डाऊनलोड स्पीड 35 सेकंद!
5Gच्या लिलावामुळे इंटरनेटचा डाऊनलोड स्पीड हा खूपच चर्चेचा विषय ठरला आहे. 2G साठी इंटरनेट डाऊनलोडचा स्पीड 2.8 दिवस होता. 3G साठी तो 2 तासांपर्यंत कमी झाल. तर 4G साठी 40 मिनिटे आणि आता 5G साठी तो 35 सेकंद असेल, असं बोललं जात आहे. तर 5G चा सरासरी डाऊनलोड स्पीड 100mbps असणार आहे. तोच 3G, 4G आणि LTE साठी अनुक्रमे 3 mbps, 14 mbps आणि 30mbps होता.