ITR FAQ: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. अवघे 10 दिवस बाकी आहेत. याची मुदत वाढवणार नाही, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return-ITR) भरणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागू शकते.
तुम्ही जर 31 जुलैनंतर म्हणजेच सरकारने दिलेल्या मुदतीनंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला 1000 ते 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो. 31 जुलैनंतर तुम्ही दंड भरून 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू शकता.यासाठी आकारला जाणारा दंड तुमच्या उत्पन्नावर आधारित असू शकतो. त्याचबरोबर जोपर्यंत तु्म्ही रिटर्न भरत नाहीत तोपर्यंत दंडाच्या रकमेवर प्रत्येक महिन्याला 1 टक्के व्याज सुद्धा आकारले जाते. त्यामुळे 31 जुलैपूर्वी आणि वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे तुमच्या फायद्याचे ठरू शकते.
Table of contents [Show]
इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये कितीवेळा बदल करता येतात?
तु्म्ही ज्या मूल्यांकन वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे; ते मूल्यांकन वर्ष (Assessment Year) संपण्याच्या 3 महिने अगोदर किंवा मूल्यांकन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही कितीही वेळा त्यामध्ये बदल करू शकता. साधारणत: नियमानुसार यामध्ये जो कालावधी प्रथम येईल, त्याला तो नियम लागू होतो.
ITR बाबत अजून काही बेसिक प्रश्न आहेत; त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
ऑनलाईन आयटीआर कसे फाईल करतात?
इन्कम टॅक्स विभागाने ऑनलाईन आयटीआर भरण्यासाठी एक स्वतंत्र बेवसाईट तयार केली आहे. करदाते www.incometax.gov.in/iec/foportal/ या पोर्टलवरून इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. स्टेप बाय स्टेप इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा.
ई-फायलिंग आणि ई-पेमेंट यामध्ये फरक काय आहे?
ई-पेमेंट ही ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टॅक्स भरण्याची एक प्रक्रिया आहे. जसे की आपण नेट बँकिंग किंवा डेबिट/क्रेडिट कार्डने पेमेंट करतो. तर ई-फायलिंग ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या उत्पन्नाची माहिती भरणारी प्रक्रिया आहे.
31 जुलैनंतर आयटीआर भरता येतो का?
होय, ज्यांना 31 जुलैपूर्वी किंवा दिलेल्या मुदतीत आयटीआर भरणे शक्य झाले नाही. ते त्यानंतर आयटीआर भरू शकतात. तसेच मागील एका वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा भरता येते.
मुदतीनंतर आयटीआर भरल्यावर किती दंड आकारला जातो?
सरकारने दिलेल्या मुदतीनंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास कायद्यातील कलम 234F नुसार, कलम 139(1) अंतर्गत उशिरा रिटर्न भरणाऱ्या करदात्यांकडून 5000 रुपये दंड आकारला जातो. ज्यांचे एका आर्थिक वर्षातील उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे; अशा करदात्यांकडून 1000 रुपये दंड आकारला जातो.
मुदतीत भरलेल्या रिटर्नमध्ये मुदतीनंतर सुधारणा करता येते का?
मागील वर्षी आपल्या वित्तीय कायदा, 2022 (The Finance Act 2022) मध्ये कलम 139 मध्ये उपकलम (8A)चा समावेश करण्यात आला आहे. या कलमांतर्गत अपडेटेड रिटर्न (Updated Return) भरता येते. अपडेटेड रिटर्न हे संबंधित मूल्यांकन वर्षाला 2 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कधीही भरता येते.
जास्तीचा टॅक्स परत कसा मिळू शकतो?
जर तुम्ही जास्तीचा टॅक्स भरला असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरून त्याचा क्लेम करता येतो. क्लेम केल्यानंतर तो रिफंड एका ठराविक पिरिअडनंतर ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँकेत जमा होतो.