Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणुकीकडे (Investment) बघण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलत आहे?

गुंतवणुकीकडे (Investment) बघण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलत आहे?

2021 मध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत सर्वाधिक 14.2 दशलक्ष डिमॅट खाती (Demat Accounts) उघडली गेली. यामधील 70 टक्के खाती ही 1981 ते 1996 यादरम्यान जन्मलेल्यांची असून, विशेष म्हणजे ही खाती दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरात राहणाऱ्या शहरातील तरूणांची आहेत.

कोविड-19 (Covid-19) च्या संसर्गामुळे भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) भारतातील अनेकांची आर्थिक गणितं बिघडली तर काहींनी या संधीचा लाभ घेत नव्याने आर्थिक गणितं शिकण्याचा प्रयत्न केला. एका सर्व्हेक्षणानुसार, 2021 मध्ये 14.2 दशलक्ष डिमॅट खाती (DMAT Account) उघडली गेली. एका वर्षात इतकी खाती उघडण्याचा हा आतापर्यंतचा रेकॉर्ड मानला जात आहे आणि यात विशेष म्हणजे यातील 70 टक्के खाती ही दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांमधून सुरू करण्यात आलेली आहेत.

अभ्यासकांच्या मते आतापर्यंत तरूण पिढीला गुंतवणुकीच्या बाबतीत इतके गंभीर असल्याचे कधीच पाहिले नव्हते. 1996 ते 1981 यादरम्यान जन्मलेल्यांचे वय 25 ते 40 वर्ष या गटातील आहे. याशिवाय, आजच्या स्पर्धात्मक युगात डीमॅटची सेवा देणाऱ्या ब्रोकरेज कंपन्या अवघ्या 24 तासात डिमॅट खाते उघडून देतात. या संख्येत तरूणांची मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागे सोशल मिडियाचा (Social Media) मोठा प्रभाव असल्याचे म्हटले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात तरूणांच्या हातात सोशल मिडिया हा एकमेव पर्याय होता. त्याचाच हा परिणाम असून, यामुळेच तरूणांचा गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला आहे, असे एका सर्व्हेक्षणामध्ये दिसून आले. सोशल मिडियामुळे फायनान्स क्षेत्राकडे प्रभावित झालेल्यांमध्ये तुमच्या, आमच्यासारखेच लोक आहेत. जे अत्यंत सर्वसामान्य, सर्वसाधारण कुटुंबातील आहेत आणि जे लॉकडाऊनच्या काळात एका विशिष्ट परिस्थितीतून गेले आहेत. त्यांनी वित्तच्या (फायनान्स) टिपिकल परिभाषेला ब्रेक देत त्याला एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मिडियामधून त्यांनी फायनान्सबद्दलची माहिती देण्याबरोबरच, इतरांना आर्थिक साक्षर करण्याची जबाबदारी ही नकळतपणे पार पाडली आहे. त्यामुळे बोजड आणि कंटाळवाणा वाटणारा वित्त हा विषय नक्कीच रंजक वाटू लागेल.

लाईफस्टाईलमध्ये बदल

जो कोणी पैसे कमावतो आणि वाचवतो, तो ग्राहक असतो. या अभिवृत्तीमुळे सर्व वयोगटांतील आणि वेगवेगळी व्यवसायिक पार्श्वभूमी असलेल्यांना प्रभावित केले. विशेषतः 15 ते 25 वर्षांच्या मुलांना आयपीओ (IPO), एसआयपी (SIP), ईटीएफ (ETF), एनएफटी (NFT), वेब 3.0 (Web3.0), क्रिप्टो (Crypto) याविषयीची माहिती घेणं, त्यावर बोलणं आवडू लागले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करून घेतले आहेत. सोशल मिडियामधून ते यावर व्यक्त होऊ लागले आहेत. स्वत: गुंतवणूक करून इतरांनाही मार्गदर्शन करत आहेत.

वडिलांच्या पाऊलावर पाऊल

सध्याची तरूणाई वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत असताना त्याला आधुनिकतेची जोड देत आहे. पूर्वी आई-बाबा दिवाळी किंवा वाढदिवसाला रोखीने जमा झालेले पैसे एकत्र गोळा करून ते मुदत ठेवीमध्ये (Fixed Deposit) गुंतवायचे. पण आताची पिढी हेच पैसे चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवून देणाऱ्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये कसे टाकू शकतो, असे ठामपणे सांगत आहे. पूर्वी घरातील कर्ता पुरूष गुंतवणुकीचे किंवा पैशांचे सर्व निर्णय घेत होता. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. माहितीचे विविध स्त्रोत वापरून तरूणाई महागाई (inflation), कच्च्या तेलांचे परिणाम (The effects of crude oil), रूपयाच्या तुलनेत डॉलरची वाढ या विषयांवर अधिकारवाणीने चर्चा करत आहे. काही प्रमाणात कुटुंबातील प्रमुखांना ते समजावून सांगत आहे.

काळ बदलतोय

सध्या आपल्याला मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी सोबत पैसे नेण्याची गरज लागत नाही. आपलं हे काम मोबाईलने सहज पूर्ण होत आहे आणि मुळात आपल्याला खरेदी करण्यासाठी ही मार्केटला जाण्याची गरज नाही. कारण मोबाईल अपच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच सामान आणून दिलं जात आहे. पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी बॅंकेतही जावे लागत नाही. तसंच विमा काढायचा असेल तर ऑनलाईन काढायची सोय उपलब्ध आहे किंवा विमा एजंटला घरी बोलावून सर्व प्रक्रिया पूर्ण करता येते. सध्या सर्व गोष्टी तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या वेळेनुसार उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला फक्त अपडेट राहण्याची गरज आहे. सध्या असे अनेक अप्स आहेत. जे तुम्हाला अधिक स्मार्ट व्यवहार करण्याचे प्रशिक्षण देतात.

आताची तरूण पिढी अधिकाधिक माहिती घेण्यात अग्रेसर आहे. तसेच जोखीम स्वीकारून पैशांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याबाबत आशावादी आहे. नवनवीन गोष्टी शिकून स्वत: आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच ते इतरांनाही त्यांच्यापद्धतीने अधिक स्मार्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.