डिमॅट हे एक प्रकारचे बँक खातेच असते. ज्यात तुमचे शेअर्स सर्टिफिकेट्स, म्युच्युअल फंड्स आणि इतर सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक फॉरमॅट मध्ये सुरक्षित असतात. आणखी थोडे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेअर ठेवण्याच्या सुविधेस डिमॅट असे म्हणतात. डिमॅट चा फुलफॉर्म डिमटेरिलायझेशन (Dematerialization) असा आहे.
असे चालते डिमॅट खाते
भारतात जेव्हा एखादी व्यक्ती डीमॅट खाते उघडते तेव्हा ती केंद्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CSDL) या दोन सेंट्रल डिपॉझिटरी संस्थांपैकी एका संस्थेकडे खाते उघडत असते. या डिपॉझिटरीज संस्था वेगवेगळ्या एजन्टची म्हणजेच डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)ची नेमणूक करत असतात. या एजंट संस्था मुख्य संस्था आणि गुंतवणूकदार यांच्यात मध्यस्थी म्हणून काम करतात.
डिमॅट खात्याचे प्रकार
भारतात शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी किंवा शेअर विकत घेण्यासाठी डिमॅट खाते काढावे लागते. ट्रेडिंग करण्यासाठी 3 प्रकारची डिमॅट खाती असतात. प्रत्येक ट्रेडर आपल्या सोयीनुसार यातील खात्यांची निवड करतो .
1. रेग्युलर डिमॅट खाते (Regular Demat Account) : रेग्युलर डिमॅट खाते हे भारतीय नागरिकांसाठी असते. ज्यांना फक्त भारतीय कंपन्यांमध्ये ट्रेडिंग करायचे आहे. त्यांच्यासाठी या प्रकारच्या डिमॅट खात्याची गरज असते.
2. रिपॅट्रीयेबल डिमॅट खाते (Repatriable Demat Account) : रिपॅट्रीयेबल डिमॅट खाते हे अनिवासी भारतीयांसाठी (NRI) आहे. या खात्याद्वारे परदेशात पैसे पाठवणे सहज शक्य असते. तसेच या डिमॅट खात्याला NRI बॅंक खात्याशी जोडणे बंधनकारक असते.
3. नॉन-रिपॅट्रीयेबल डिमॅट खाते (Non-Repatriable Demat Account) : नॉन-रिपॅट्रीयेबल डिमॅट खाते सुद्धा अनिवासी भारतीयांसाठीच असते. पण या खात्यातून परदेशात पैसे पाठवता येत नाहीत. या प्रकारच्या डिमॅट खात्याला NRO बॅंक खात्याशी जोडणे बंधनकारक आहे.
असे सुरू करा डिमॅट खाते
सर्वप्रथम तुमची डिपॉझिटरी कंपनी (डीपी) निवडा. ती निवडल्यानंतर त्या संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन नवीन खाते उघडा.
खाते सुरू करण्यासाठी फॉर्म भरून सोबत आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडून सबमिट करा.
डिमॅट खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
निवडलेल्या कंपनीच्या अटी व नियम काळजीपूर्वक वाचून ही सेवा पुरवण्यासाठी ते किती शुल्क आकारले जाणार आहे, हे तपासा.
फॉर्म योग्यप्रकारे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक आणि यूझर आयडी मिळेल. त्याद्वारे तुम्ही तुमचे खाते सुरू करू शकता.
या खात्याच्या वार्षिक देखभालीसाठी आणि व्यवहारासाठी शुल्क द्यावे लागते. हे शुल्क प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळे असते.
डिमॅट खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे
डिमॅट खाते सुरू करण्यासाठी केवायसीच्या नियमानुसार कागदपत्रे द्यावी लागतात आणि शेअर्सचे व्यवहार करणाऱ्या दलालांशी करार करावा लागतो.
पॅन कार्ड
बँक स्टेटमेंट
रहिवासाचा पुरावा
आयकर परतावा
2 रंगीत फोटो
बँकेचा क्रॉस केलेला चेक
केवायसी माहिती
आधारकार्ड
डिमॅट खात्याचे फायदे
डिपॉझिटरी सिस्टीममुळे कागदपत्रांशी संबंधित धोके जसे कि, गहाळ होणे, चोरीला जाणे, फाटणे, नकली प्रमाणपत्र मिळणे कमी झाले.
ह्या सिस्टीममुळे शेअर्सचे त्वरित वितरण होते आणि नोंदणीसाठी लागणारा वेळ टळतो.
गुंतवणूकदाराशी जलद संपर्क करता येतो.
स्वाक्षरी न जुळल्याने वितरणात होणारे व्यत्यय टळतात.
शेअर विक्रीतून येणारे पैसे त्वरित खात्यात जमा होतात.
शेअर हस्तांतरणावर स्टॅम्प ड्युटी आकारली जात नाही.
ट्रेडर्स कोठूनही काम करू शकतात.
फक्त एक शेअर सुद्धा विकता येतो.