2023 हे आय़पीएलचं 16 वं वर्षं असणार आहे. आणि त्यापूर्वाचा खेळाडूंचा मिनी लिलाव (IPL Mini Auction) आज कोचीमध्ये पार पडला. आणि यात स्पर्धेच्या इतिहासातले नवीन विक्रमही पाहायला मिळाले. कारण, इंग्लिश ऑलराऊंडर सॅम कुरानवर 18.50 कोटी रुपयांची विक्रमी बोली लागली. तर कॅमेरुन ग्रिन आणि बेन स्टोक्सही विक्रमी रक्कम खिशात घालून परतले.
आतापर्यंत एकूण 37 खेळाडू विकले गेले आहेत. आणि यातले 22 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. सगळ्यात जास्त बोली इंग्लिश ऑलराऊंडर सॅम कुरानवर 18.50 कोटी इतकी लागली. तर त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर कॅमेरुन ग्रिन (मुंबई इंडियन्स - 17.50 कोटी रु) आणि बेन स्टोक्स (चेन्नई सुपरकिंग्ज - 16.25 कोटी रु) यांचा क्रमांक लागला. नकोलस पूरन या विकेटकीपर बॅट्समनवरही 16 कोटी रुपयांची बोली लागली. स्पर्धेच्या इतिहासातला तो सगळ्यात महाग विकेटकीपर ठरला आहे.
भारतीय खेळाडूंपैकी मयंक अगरवालला सर्वाधिक 8.25 कोटी रुपये मिळाले. आधी पंजाब टीमकडून खेळणाऱ्या मयांकला सनरायझर्स हैदराबादने यंदा विकत घेतलंय. याशिवाय शिवम मणी आणि मुकेश कुमार या भारतीय बोलरवरही पाच कोटींच्या वर बोली लागली. मुकेश कुमारचं अजून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण व्हायचं आहे.
आजच्या दिवसांतला पहिला विकला गेलेला खेळाडू होता न्यूझीलंडचा केन विल्यमसन. गुजरात टायटन्स टीमने त्याला 2 कोटी रुपयांत विकत घेतलं. तर सध्या भारतीय टीममधलं स्थान गमावलेला अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्जनी 50 लाख रुपयांना विकत घेतलं आहे.   
 या लिलावात एकूण 405 खेळाडूंनी भाग घेतला. पण, टीमकडे 87  जागा रिक्त होत्या.   
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            