Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Free Income : गुंतवणुकीतून करमुक्त परतावा हवाय? मग 'या ' पाच योजनांची माहिती असायलाच हवी!

Tax Free Income : गुंतवणुकीतून करमुक्त परतावा हवाय? मग 'या ' पाच योजनांची माहिती असायलाच हवी!

Tax Free Income : गुंतवणूक करताना करमुक्त परतावा मिळावा, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र याबद्दल पुरेशी माहिती नसते. आर्थिक वर्ष पुढच्या महिन्यापासून सुरू होईल. म्हणजेच मार्च हा टॅक्स प्लॅनिंग करण्याचा महिना आहे. आयकर रिटर्न (Income Tax) भरण्याची प्रक्रिया पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे त्याचं योग्य प्रकारे नियोजन तुम्हाला याच महिन्यात करावं लागणार आहे.

पुढच्या आर्थिक वर्षाचं योग्य नियोजन केल्यास करात बचत होईल. शिवाय करमुक्त परतावा देणारे मार्ग निवडण्याची प्रक्रियाही सोपी होईल. गुंतवणूक करत असताना त्यातून मिळणारा परतावा अधिक असावा त्यासोबतच ते उत्पन्न करमुक्त असावं, यासाठीचे विविध मार्ग आपल्यासमोर उपलब्ध आहेत. या 31 मार्चपूर्वी त्याचं नियोजन करावं. म्हणजे करात सूट मिळण्याची शक्यता अधिक वाढते. त्यातले पाच मार्ग कोणते, यावर एक नजर टाकूया...

1. कर्मचारी ईपीएफ

सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुंतवणुकीचा आणि त्यातून परतावा मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. EEE (Exempt-Exempt-Exempt) म्हणजेच करात सूट मिळवण्याचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा एक चांगला पर्याय आहे. ईपीएफमध्येही सूटचा पर्याय काही अटींसह मिळतो. ईपीएफच्या माध्यमातून सध्या 8.1 टक्के परतावा मिळतो. गुंतवणुकीच्या मर्यादेत गुंतवणूक केल्यास ती करमुक्त होण्याच्या शक्यता वाढतात. पगारातून साधारणपणे 12 टक्के कपात होत असते. म्हणजे 12 टक्के कर्मचारी आणि 12 टक्के कंपनी. या सर्वांचा सेवानिवृत्तीचा निधी तयार होत असतो. याच रकमेवर 80C याअंतर्गत करकपातीचा दावा करता येवू शकतो. या योजनेतल्या गुंतवणुकीच्या दरम्यान कर्मचाऱ्यांचा ईपीएफ आणि व्हीपीएफ वर्षभरात अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर वाढीव रकमेवर मिळणाऱ्या व्याजाला कर असणार आहे. मॅच्युरिटीच्या रकमेवर मात्र सूट मिळते.

2. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

भविष्यातल्या आर्थिक नियोजनाचं हे सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय माध्यम आहे. या माध्यमातून होणारी गुंतवणूक व्याज, करमुक्त असते. आयकराशी संबंधित 80C कलमाच्या अंतर्गत साधारणपणे दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट मिळते. तर परतावा दर हा 7.1 टक्के असतो. 15 वर्षाच्या इन-लॉक कालावधीत या योजनेतली गुंतवणूक येते. या खात्याच्या माध्यमातून कर्जदेखील घेता येते. सहाव्या वर्षापासून याचा लाभ घेता येवू शकतो. सातव्या वर्षापासून मुदतपूर्व पैसे काढता येवू शकतात. 500 रुपयांपासून दीड लाखांपर्यत गुंतवणूक करता येवू शकते. एका वर्षातली ही कमाल आणि किमान गुंतवणूक असते.

3. सुकन्या समृद्धी योजना

केंद्र सरकारच्या विविध योजनांमधली ही एक योजना असून करात सूट मिळवण्यासाठी या योजनेचा हातभार लागतो. नावावरून लक्षात येतं, की ही योजना मुलींसाठी आहे. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीचा हा पर्याय सरकारमार्फत मिळतो. दहा वर्षांच्या आतील मुलींचे पालक यात सहभागी होऊ शकतात. साधारणपणे 21 वर्षांचा लॉक-इन पिरेड आहे. मुदतपूर्व पैसेही काढता येण्याची सोय आहे, मात्र त्यासाठी अर्थातच अटी लागू असतात. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून मिळणारा परतावा हा 7.6 टक्क्यांपर्यतचा असतो. तर साधारण 250 रुपये कमीतकमी तर दीड लाखांपर्यंत जास्तीतजास्त गुंतवणूक करता येवू शकते.

4. इक्विटी लिंक्ड बचत योजना

इक्विटी लिंक्ड बचत योजना म्हणजे ELSS या माध्यमातून म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करता येवू शकते. करमुक्त परतावा हवा असेल तर या योजनेचा लाभ घ्यायला हरकत नाही. प्रत्येक योजनेत अटी-शर्थी असतात. त्याप्रमाणे यातही अनेक अटी आहेत. भांडवली नफा एका आर्थिक वर्षात लाखापेक्षा म्हणजे 1 लाखांहून कमी असायला हवा. मुदतपूर्व पैसे काढण्याची यात मुभा नाही. तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. यातली गुंतवणूक जोखमीची मानली जाते, कारण ती बाजाराशी संबंधित आहे.

5. ज्येष्ठ नागरिक बचत योजना

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ, भविष्यातल्या आर्थिक नियोजनासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, मुलींसाठी सुकन्या अशा विविध योजनांच्या माध्यमातून करमुक्त परतावा मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक योजना आहे. या योजनेत व्याजावर कर आकारण्याची तरतूद आहे. पण परताव्यावर सूट मिळण्याचा दावाही करता येवू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यानं साधारणपणे 60 वर्षांवरचे नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. तीन महिन्यांच्या कालावधीवर व्याज दिलं जातं. हे व्याज करपात्र असते. तर टीडीएसमध्ये सूट मिळण्याची तरतूद करण्यात आलीय. या योजनेत किमान 1000 तर जास्तीतजास्त 9 लाख गुंतवता येतात.