Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Options for Housewives: घरबसल्या गृहिणी 'या' ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करून मिळवू शकतात लाखोंचा परतावा

Investment Options for Housewives

Investment Options for Housewives: संपूर्ण घराचा डोलारा सांभाळण्याचे काम गृहिणी एकहाती करते. एक एक रुपयाची बचत करून ती संकटकाळात याच पैशाचा वापर करते. तिचा हाच पैसा कोणत्या ठिकाणी गुंतवल्यावर सर्वाधिक परतावा देईल, जाणून घेऊयात.

आजही भारतात नोकरदार स्त्रियांपेक्षा गृहिणींचे (housewives) प्रमाण सर्वात जास्त आहे. घर सांभाळणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. घराचे बजेट सांभाळायची, ते खर्च करण्याची आणि त्यातून बचत करण्याचे कसब केवळ गृहिणींलाच अवगत असते. हीच गृहिणी महिन्याच्या घर खर्चातून एक एक रुपयाची बचत करून संकटकाळात कुटुंबाला सावरण्यासाठी मदत करते. म्हणूनच तिला सेफ मनी बँक असं म्हणतात. परंतु या मनी बँकेतील पैसा वाढायला हवा असेल, तर सरकारच्या आणि खासगी क्षेत्रातील काही निवडक गुंतवणूक योजनांमध्ये गृहिणींनी पैसे गुंतवायला हवेत. हे पैसे त्या पुढे जाऊन मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी किंवा घरामध्ये त्यांच्या आवडीची एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी वापरु शकतात. त्या गुंतवणूक योजना कोणत्या, जाणून घेऊयात.

गृहिणींनी 'या' ठिकाणी पैसे गुंतवल्यावर मिळेल सर्वाधिक परतावा

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMSS)

पोस्टात गुंतवलेले पैसे हे सर्वात सुरक्षित मानले जातात. याचे कारण म्हणजे पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना या सरकारकडून चालवल्या जातात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत (Post Office Monthly Income Scheme) गृहिणी आर्थिक गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात. या योजनेत महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता येते. ज्यावर निश्चित व्याजदर देण्यात येतो.

सध्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत किमान 1000 रुपये, तर कमाल 9 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत गृहिणी 5 वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात. ज्यावर पोस्टाकडून 7.4% व्याजदर देण्यात येत आहे.

मुदत ठेव योजना (FD Scheme)

गुंतवणुकीतील पारंपरिक आणि विश्वासू पर्याय म्हणून बँकेतील मुदत ठेव योजनेकडे (FD Scheme) पाहिले जाते. बँकेच्या मुदत ठेव योजनेमध्ये गृहिणी ठराविक कालावधीसाठी आर्थिक गुंतवणूक करू शकतात. ज्यावर निश्चित असा व्याजदर बँकेकडून देण्यात येतो.

सध्या सर्वसामान्य लोकांसाठी बँक 3.5% ते 8% पर्यंत व्याजदर देत आहे. याचा कालावधी हा 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत असतो. या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करून गृहिणी चांगला परतावा मिळवू शकतात. विशेष म्हणजे मुदत ठेवींवर बँकेकडून कर्ज काढण्याची सुविधाही उपलब्ध करून  देण्यात येते.

महिला सन्मान बचतपत्र योजना (MSCS)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात खास महिलांसाठी महिला सन्मान बचतपत्र योजनेची (Mahila Samman Savings Bank Scheme) घोषणा केली. महिलांना बचतीची आणि गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेत केवळ 2 वर्षासाठी महिलांना गुंतवणूक करता येणार आहे. 2025 हे वर्ष या योजनेचे अंतिम गुंतवणुकीचे वर्ष आहे.

या योजनेत गृहिणींना 7.5 % व्याजदर मिळणार आहे. या योजनेची किमान गुंतवणूक मर्यादा 1000 रुपये असून कमाल मर्यादा 2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र या योजनेत कर सवलतीचा लाभ मिळणार नाही.

म्युच्युअल फंड (Mutual funds)

सध्या सर्वांचाच कल हा म्युच्युअल फंडातील (Mutual funds) गुंतवणुकीकडे पाहायला मिळत आहे. यामागील कारण म्हणजे त्यातून मिळणारा सर्वाधिक परतावा. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने आर्थिक गुंतवणूक करता येते. पहिली म्हणजे शेअर्सद्वारे, तर दुसरी एसआयपी पद्धतीने.

एसआयपी पद्धतीने गृहिणी किमान 500 रुपये प्रति महिना गुंतवून म्युच्युअल फंडात आर्थिक गुंतवणूक करू शकतात. घर खर्चातून वाचलेले पैसे गृहिणी म्युच्युअल फंडात गुंतवून 12% पर्यंत परतावा मिळवू शकतात. गुंतवणुकीचा कालावधी हा गृहिणी ठरवू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, जितक्या जास्त वर्षासाठी तुम्ही गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अंतर्गत येते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

भारतातील लोकांना बचतीची सवय लागावी यासाठी सरकारने 1968 साली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) योजनेची सुरुवात केली. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी स्वतंत्र खाते ओपन करावे लागणार आहे. हे खाते कोणत्याही बँकेत  किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करता येईल.

यामध्ये किमान 500 रुपये, तर कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.या योजनेचा परिपक्व कालावधी हा 15 वर्षाचा असून यामधील गुंतवणुकीवर सध्या 7.1% व्याजदर देण्यात येत आहे. यातील गुंतवणूक ही कर सवलतीस पात्र आहे.

(डिस्क्लेमर: 'महामनी' कोणत्याही स्वरूपातील गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)