Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Blunders: मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करताय? मग गुंतवणूक करताना 'या' 6 चुका टाळा

investment tips

भविष्यात घर, गाडी घ्यायचा विचार करताय? किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचं स्वप्न स्वस्थ बसू देत नाही तर आत्ताच गुंतवणूक सुरू करा. दीर्घकाळ शिस्तीने गुंतवणूक केल्यास तुमचे ध्येय पूर्ण होईल. मात्र, हे करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात ते या लेखात पाहूया.

Investment Blunders: दीर्घकाळात गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, अनेक जण मध्येच येणाऱ्या मार्केट ट्रेंडला भुलून काहीतरी चुकीचा निर्णय घेऊन बसतात. त्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते. तुम्ही नवखे असा किंवा अनुभवी गुंतवणूक करताना संयम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कोठेही गुंतवणूक करताना हे पैसे नक्की कशासाठी गुंतवत आहोत याचे ध्येय निश्चित करून घ्या. तसेच खाली दिलेल्या चुका टाळा.

अशक्य असे ध्येय ठरवू नका?

प्रत्येकजण काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतो. (Mutual Fund Investment Mistakes) परदेशवारी, मोठे आलिशान घर, गाडी किंवा स्वत:च्या व्यवसायाचं सुरू करायचं स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र, तुमच्या प्रत्येक स्वप्नासाठी किती पैसे लागतील याचा आधी विचार करा. 

तुमचे सध्याचे उत्पन्न किती आहे? त्यातील किती रक्कम म्युच्युअल फंड किंवा कोणत्याही योजनेत गुंतवता येईल हे पाहा. इतर आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी किती रुपये खर्च करावे लागत आहेत ते पाहा. प्रत्येक गुंतवणुकीचे ध्येय निश्चित करा. नाहीतर भविष्यात अचानक पैशांची गरज लागल्यास SIP मध्येच बंद करून पैशांची गरज भागवावी लागेल. गुंतवणुकीचा फॉर्म्युला कसा ठरवावा हे या लिंकवर पाहायला मिळेल. 

मार्केट ट्रेंडच्या मागे धावू नका

तात्पुरत्या मार्केट ट्रेंडच्या मागे धावू नका. मार्केटमध्ये कायम चढउतार येत असतात. काही योजना वर्षभराच्या रिटर्नमध्ये आकर्षक वाटू शकतात. त्यामुळे इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक काढून या अल्पकाळात चांगला परतावा देणाऱ्या योजनेत अनेकजण गुंतवणूक करतात. एक लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेतील कोणतेही क्षेत्र कायम तेजीत किंवा मंदीत नसते. त्यामुळे दीर्घकालीन तुम्ही जे ध्येय ठरवले आहे ते संयमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

गुंतवणूक करताना आणीबाणीच्या निधीला विसरू नका

आणीबाणीचा निधी म्हणजेच एमर्जन्सी फंड, ज्याची गरज तुम्हाला अचानक कधीही लागू शकते. दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवत असताना काही रक्कम आणीबाणीसाठी वेगळी ठेवा. (Investment mistakes to avoid)  अल्पकालीन बचत योजना किंवा लिक्विड फंड चांगला पर्याय ठरू शकतो. 

आरोग्य आणीबाणी किंवा अचानक नोकरी गेल्यास तीन ते सहा महिने पुरेल एवढा एमर्जन्सी फंड हवा. नाहीतर दीर्घकालीन ध्येयासाठी सुरू केलेली योजना बंद करून खर्च भागवावे लागतील. आणीबाणी फंड नक्की किती असावा हे या लिंकवर वाचायला मिळेल. 

बाजारातील चढउताराने घाबरून जाऊ नका 

भांडवली बाजारात अचानक चढउतार झाल्यास घाबरून जाऊ नका. जागतिक घडामोडी किंवा देशांतर्गत मोठे निर्णय यामुळे बाजार वरखाली होऊ शकतो. मात्र, अशा परिस्थितीत जर तुम्ही गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतल्यास चुकीचे ठरू शकते. जेव्हा मार्केट पुन्हा वर जाते तेव्हा पश्चाताप करण्याची वेळ येते. शांतपणे निर्णय घ्या किंवा सेबी अधिकृत सल्लागाराची मदत घ्या. 

महागाईच्या दराला विसरू नका

आज जेवढे पैशाचे मूल्य आहे तेवढे 20 वर्षांनी राहणार नाही. दरवर्षी महागाईमुळे पैशांचे मूल्य कमी होईल. सध्या सुमारे 6 टक्क्यांचा महागाईचा दर आहे. यात कमी जास्त होऊ शकते. मात्र, भविष्यातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वैद्यकीय खर्च, निवृत्तीनंतर घरगुती खर्च किती लागतील याचा महागाईचा दर विचारात घेऊन निर्णय घ्या. 

समजा तुम्हाला आज 20 हजार रुपये घरखर्चासाठी लागतात. मात्र, 20 वर्षांनी निवृत्त झाल्यानंतर 6 टक्के महागाईच्या दराने किती रुपये लागतील हे पाहा. त्यानुसारच निवृत्तीचे नियोजन आणि गुंतवणुकीचे निर्णय घ्या. 

मार्केटची योग्य वेळ असते का?

कोठेही गुंतवणूक करताना निश्चित अशी योग्य वेळ नसते. त्यापेक्षा SIP च्या मार्गाने केलेली गुंतवणूक जास्त फायद्याची ठरू शकते. बाजारातील स्थिती कशीही असो, तुम्ही दरमहा सातत्याने काही रक्कम गुंतवली तर दीर्घकाळात चांगला फायदा मिळण्याची शक्यता वाढते. तुम्ही ठरवलेले ध्येय साध्य होईपर्यंत गुंतवणूक काढून घेणं टाळा. या चुका टाळल्यास दीर्घकाळात संपत्ती वाढेल.