वाढत्या महागाईमुळे तुम्ही आम्ही सर्वजण हैराण आहोत. जितका पैसा कमावतो तितकाच खर्च होतो आणि शिल्लक काही राहत नाही असा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना असेल. मात्र पैशाचं उत्तम नियोजन केलं तर बचत करणे सोपे जाईल आणि जीवन जगणे देखील सुकर होईल. बचत करायची म्हणजे मौजमजा करायचीच नाही असं नाही. चांगली लाइफस्टाइल जगून देखील तुम्ही पैशांची बचत करू शकता. हे सगळं नेमकं कसं करायचं यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. .
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे मध्यमवर्गीय कुटुंबासमोर सध्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.मुलांचे शिक्षण, घर खर्च, पाहुणे, दवाखाना इत्यादी इत्यादी…अशी भली मोठी खर्चाची लिस्ट तुमच्याकडे असेल. महिन्याला येणारा पगार जर पुरत नसेल तर जाणकारांनी सुचवलेला 50:30:20 हा फॉर्म्युला वापरून तुम्ही सहज बचत करू शकता. तुमच्या उत्पन्नाचे ढोबळमानाने 3 भाग करून ते कुठे आणि कसे खर्च करावे हे हा फॉर्म्युला सांगतो.
तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर तुमच्या महिन्याच्या कमाईची जी काही रक्कम जमा होत असेल तर त्यावर तुम्ही 50:30:20 चा फॉर्म्युला लागू करू शकता. तुमच्या कमाईवर हे सूत्र कसे लागू कारायचे हे आपण समजून घेऊया.
50% खर्च कुठे कराल?
समजा तुमचा पगार 80,000 रुपये महिना असेल तर तुम्ही ही कमाईची रक्कम 3 भागात विभाजित करावी. 50:30:20 फॉर्म्युला नुसार पगाराच्या 50% रक्कम ही तुम्ही अत्यावश्यक गरजांसाठी खर्च केली पाहिजे. यात तुमचे घरभाडे, EMI, मुलांचे शिक्षण तसेच इतर काही कर्ज असेल किंवा महिन्याचा किराणा, लाईट बिल, सोसायटीचा देखभाल खर्च यासाठी राखीव ठेवावा. म्हणजेच एकूण 80,000 रुपयांच्या कमाईतील 40,000 रुपये तुम्ही तुमच्या अत्यावश्यक गरजांसाठी तुम्ही बाजूला ठेवणार आहात.
30% खर्च कुठे कराल?
वरील फॉर्म्युलानुसार तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 30% तुमच्या लाइफस्टाइलसाठी राखील ठेवले पाहिजेत.म्हणजेच पिकनिकला जाणे, भटकंती करणे, कपडे खरेदी करणे, सिनेमा बघणे, मोबाईल किंवा संगणक खरेदी, गाडी- कार खरेदी आणि हॉस्पिटल खर्च यासाठी तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 30% रक्कम राखीव ठेवायला हवी. 80,000 रुपये कमाईनुसार तुम्ही 24,000 रुपये तुमच्या जीवनशैलीसाठी बाजूला ठेवावी.
20% खर्च कुठे कराल?
उरलेले 16 हजार रुपये तुम्ही भविष्यासाठी कुठल्या ना कुठल्या गुंतवणूक योजनेत गुंतवले पाहिजे. आपल्या पगाराच्या 20% रक्कम गुंतवणूक करणे ही एक स्मार्ट आयडिया मानली जाते. सध्या मार्केटमध्ये खूप सारे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. दरमहा SIP करणे हा देखील उत्तम परतावा देणारा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तसेच मुदत ठेव, आवर्ती ठेव, सोने खरेदी असे वेगवेगळे पर्याय तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. 80,000 रुपये पगाराच्या 20% गुंतवणूक करून तुम्ही वर्षाला 1,92,000 रुपयांची गुंतवणूक सहज करू शकता.
हा फॉर्म्युला वापरून तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल आणि भविष्यासाठी देखील चांगली तजवीज करून ठेवू शकाल. तुमच्या कमाईवर हा फॉर्म्युला वापरण्याआधी तुमच्या अत्यावश्यक गरजा, देणी किती आहेत, तुम्ही सहसा कुठे सर्वात जास्त पैसे खर्च करता या सगळ्यांची एक यादी बनवा. या यादीनुसार तुम्ही तुमचे पैसे कुठल्या विषयात अधिक वाचवू शकता याचा अंदाज घ्या आणि त्यानुसार पैशाचे नियोजन करा.