अचानक उद्भवलेल्या कठीण परिस्थितीला आणीबाणी म्हणजेच एमर्जन्सी म्हटले जाते. आता अशा परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार हवे. जसे की, अचानक नोकरी जाणे, अपघात, मालमत्तेचे आणि जिविताचे नुकसान यासह इतरही अनेक प्रकारच्या परिस्थिती कधीही उद्भवू शकतात. अशा वेळी तुम्हाला तत्काळ पैशाची गरज भासू शकते. त्यामुळे तुम्ही काही रक्कम बाजूला काढून ठेवली पाहिजे किंवा अशा पर्यायांमध्ये गुंतवली पाहिजे की ती तुम्हाला तत्काळ उपलब्ध होईल. कारण, दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीतील पैसे तुम्हाला तत्काळ काढता येणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीला भविष्यात तोंड द्यावे लागू शकते, हे गृहित धरूनच आर्थिक नियोजन करायला हवे.
किती रक्कम बाजूला काढून ठेवायला हवी
तुमची जीवनशैली, कुटुंबातील सदस्य, खर्च, आरोग्याची स्थिती यानुसार प्रत्येकाची गरज वेगवेगळी असू शकते. सुमारे सहा महिन्यांपर्यंत तुमचे खर्च भागवू शकेल एवढी रक्कम तुमच्या एमर्जन्सी फंडात हवी, असे मानले जाते. मात्र, कोणत्या प्रकारची आणीबाणी आहे, त्यावर किती रकमेची तुम्हाला गरज भासेल, हे नक्की सांगता येणार नाही. समजा, २ लाख रुपये तुम्हाला एमर्जन्सी हाताळण्यासाठी वेगळे ठेवायचे आहेत. तर प्रत्येक महिन्याला सुमारे दहा हजार रुपयांची बचत केली तर दोन वर्षानंतर तुमच्याकडे मोठी रक्कम जमा होईल. एमर्जन्सी हाताळण्यासाठी तुम्ही जी रक्कम बाजूला काढून ठेवता ती अशा पर्यायांमध्ये गुंतवली पाहिजे की, तेथून पैसे काढून घेताना तुम्हाला दंड होऊ नये. तसेच मालमत्तेची किंमतही कमी होऊ नये. सर्वप्रथम एमर्जन्सी फंड एका रात्रीत उभा केला जाऊ शकत नाही. प्रत्येक महिन्याला त्यासाठी काही रक्कम तुम्ही वेगळी काढून ठेवली पाहिजे.
एमर्जन्सी फंड कुठे गुंतवायला हवा?
एमर्जन्सी हाताळण्यासाठी साठवलेली रक्कम कधीही एकाच ठिकाणी ठेवू नका. काही रक्कम तुम्ही कॅशच्या स्वरुपात घरी तर काही रक्कम बँक खात्यामध्ये ठेवू शकता. त्यासोबतच अल्प काळासाठीच्या मुदत ठेवी, डेब्ट म्युच्युअल फंड, लिक्विड फंडात तुम्ही ही रक्कम विभागून ठेवायला हवी. कारण, तुम्हाला गरज पडल्यानंतर तत्काळ तुम्ही ही रक्कम वापरू शकता. तसेच तुम्हाला या पर्यायांमधील गुंतवणूकीतून परतावाही चांगला मिळेल. जेव्हा गरज पडेल तेव्हा अवघ्या काही दिवसांमध्ये हे पैसे तुम्हाला उपलब्ध झाले पाहिजे, हा हेतू यामागे आहे.
अनेक लिक्विड फंडामधील 90 टक्क्यांपर्यंत गुंतवलेली रक्कम तुम्ही तत्काळ काढू शकता. तुमच्या बँक खात्यात ही रक्कम लगेच ट्रान्सफर होईल. तत्काळ पैसे काढून घेण्यासाठी गुंतवणूक करत असलेल्या लिक्विड फंडाचे नियम कोणते आहेत, हे नीट समजून घ्या. त्यानंतरच गुंतवणूक करा. अशा पद्धतीने तुम्ही विविध आर्थिक पर्यायांमध्ये तुमचे पैसे ठेवू शकता. तसेच अचानक गरज भासल्यास पैसे काढून घेऊ शकता.