• 05 Jun, 2023 19:39

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF investment : पीपीएफमधली गुंतवणूक नेहमीच नसते फायद्याची, काय कारणं?

PPF investment : पीपीएफमधली गुंतवणूक नेहमीच नसते फायद्याची, काय कारणं?

PPF investment : सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण पीपीएफला पसंती देत असले तरी यातली गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरेल, असं नाही. खरं तर अधिक परतावा मिळवू इच्छिणारे पीपीएफची निवड फारशी करत नाहीत. त्याची अनेक कारणं आहेत. गुंतवणूक करण्याआधी या सर्व बाबी आपल्या ध्यानी असायला हव्यात.

भविष्यकाळातल्या आर्थिक नियोजनासाठी पीपीएफ हा उत्तम पर्याय आहे, असं आपण नेहमीच वाचतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमधली (PPF) गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसंच ही एक सरकारी योजना आहे. मात्र तुम्हाला ही बाब नक्कीच माहीत असेल, की पीपीएफ ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या स्वप्नांशी तडजोड करण्यास भाग पाडू शकते.

पीपीएफ टाळण्याची कारणं

आपल्यासमोर काही कारणं अशी असतात, की त्या कारणांची पूर्तता होण्यासाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक आपण करत असतो. मात्र अशीही काही कारणं आहेत, ज्यामुळे आपण यात गुंतवणूक करू नये, हे दर्शवतात. प्रमुख कारणं जाणून घेतल्यास या योजनेमध्ये गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला सर्वोत्तम परतावा कसा मिळत नाही, याचा अंदाज तुम्हाला येईल. काय आहेत ती कारणं, जाणून घेऊ...

व्याजाचा दर कमी

प्रत्येक तिमाहीत सरकारकडून पीपीएफसाठी व्याजाचा दर जाहीर होतो. 1 एप्रिल 2023पासून पीपीएफवर 7.1 टक्के व्याज मिळत आहे. हा दर अत्यंत कमी आहे. रोजगार भविष्य निर्वाह निधीवर (EPF) 8.15 टक्के व्याज मिळतंय. म्हणजे यापेक्षाही व्याजाचा दर कमी आहे. त्यामुळेच जर तुम्ही तुमच्या ईपीएफमध्ये पीपीएफऐवजी व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंडाद्वारे (VPF) अतिरिक्त गुंतवणूक केली तर तुम्हाला ईपीएफच्या व्याजाचा लाभ मिळू शकेल.

लॉक-इन पिरियड मोठा

पीपीएफमधली एक नकारात्मक बाब म्हणजे यात 15 वर्षांचा लॉक-इन पिरियड असतो. ज्यांना खरंच एवढ्या मोठ्या कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूक हवीय, त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य आहे. मात्र ज्यांना अल्पावधीच्य गुंतवणुकीवर चांगला परतावा हवाय, त्यांच्यासाठी मात्र पीपीएफ पर्याय फारसा उपयोगाचा नाही. असे गुंतवणूकदार इतर गुंतवणुकीच्या योजनांकडे वळतात. म्युच्युअल फंडासारख्या योजनांमध्ये ते गुंतवणूक करतात. विशेष म्हणजे त्यात जोखीम अधिक असते. मात्र परतावा चांगला मिळतो.

कमाल ठेव मर्यादा निश्चित

पीपीएफमधल्या गुंतवणुकीचा आणखी एक गैरसोयीचा मुद्दा म्हणजे कमाल ठेव मर्यादा 1.5 लाख आहे. इतर योजनापेक्षा ती खूप कमी आहे. जसं की व्हीपीएफमध्ये ही मर्यादा 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. म्युच्युअल फंडात तर क्षमतेनुसार कितीही गुंतवणूक करता येवू शकते.

मध्येच पैसे काढण्यासाठी नियम कठोर 

गुंतवणूक एक तर दीर्घकाळासाठी आहे. त्यात एखाद्याला आर्थिक अडचण निर्माण झाली तर नियम कठोर आहेत. पीपीएफमधून एखाद्याला मध्येच पैसे काढायचे असतील तर अनेक कडक नियम आहेत. पीपीएफमधून 5 वर्षानंतरच पैसे काढता येवू शकतात. ते काढण्यासाठीही निश्चित अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तरच पैसे काढण्याची मुभा देण्यात येते. पैसे काढताना 1 टक्का व्याज कपातीलादेखील सामोरं जावं लागतं. ज्यांना पीपीएफमध्ये पुढे गुंतवणूक करायची नाही, ते वर्षभरासाठी फक्त 500 रुपये जमा करूनदेखील 15 वर्षांसाठी पीपीएफचं खातं उघडू शकतात.

प्री-मॅच्युरिटीची सोय नाही

मध्येच पैसे काढणं पीपीएफमध्ये सोपं नाही. ही मोठी गैरसोय असताना मॅच्युरिटीचेही नियम आहेत. मॅच्युरिटी होईपर्यंत म्हणजेच 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत पीपीएफ तुम्हाला बंद करता येत नाही. या कालावधीत तुम्हाला आर्थिक अडचण आली किंवा तुम्हाला इतर काही कारणास्तव तुमचं पीपीएफ खातं बंद करायचं असेल तर तुम्हाला ते करता येत नाही. ते 15 वर्ष सुरूच ठेवावं लागतं. दरम्यान, जोडीदाराचा जीवघेणा आजार, मुलं, मुलांचं उच्च शिक्षण आणि गुंतवणूकदाराची निवासी स्थिती यासारख्या काही विशिष्ट अडचणीच्या परिस्थितींमध्ये ते बंद करता येवू शकतं. अशा आर्थिक परिस्थितीत पैसे काढायचे असतील तर त्यासाठीदेखील अनेक नियम आहेत.

पीपीएफ गुंतवणुकीसंदर्भातल्या या काही नकारात्मक बाबी आहेत. कमी व्याज दराची ज्यांना विशेष समस्या नसते, तसंच दीर्घ कालावधी आणि इतर मुद्द्यांच्या बाबतही काही समस्या नसेल तर पीपीएफ हा उत्तम पर्याय आहे. मात्र सर्वसाधारणपणे अशी स्थिती खूपच कमीवेळा पाहायला मिळते. त्यामुळे गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यायला हवी.