पीपीएफ (Public Provident Fund) एक्स्टेन्शन करता येते का, असा प्रश्न अनेकांना पडल्याचं दिसून आलं आहे. पीपीएफ हा सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायासह येणारी अशी एक सरकारी योजना आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी 15 वर्षांच्या मॅच्युरिटीसह येते. या योजनेत वर्षाला किमान 500 ते 1,50,000 रुपये गुंतवण्याची व्यवस्था आहे. सध्या या योजनेत 7.1 टक्के दरानं व्याज मिळतं. चक्रवाढ व्याजाचा लाभदेखील या योजनेत मिळत असतो. दीर्घकाळासाठी विचार केल्यास यातून चांगली रक्कम जमा होते. मात्र 15 वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक (Investment) करायची असेल तर काय पर्याय आहेत, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
Table of contents [Show]
दोन पर्याय कोणते?
पीपीएफ एक्स्टेंशनसाठीचे काही नियम आहेत. त्याविषयी गुंतवणूकदारास माहिती असायला हवी. पीपीएफ एक्स्टेंशन हा 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये केला जातो. म्हणजे समजा 15 वर्षांनंतरही एखाद्यास पीपीएफ एक्स्टेंशन करायचं असेल तर ते पुढचे 5 वर्ष असेल. म्हणजेच 20 वर्षांचा एकूण कालावधी असेल. तर गरजेनुसार 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये कितीही वेळा एक्स्टेंशन करता येवू शकतो. एक्स्टेंशनच्या बाबतीत गुंतवणूकदाराकडे 2 पर्याय असतात. कॉन्ट्रीब्यूशनसोबत एक्स्टेंशन तर दुसरा म्हणजे विना गुंतवणुकीसह एक्स्टेंशन.
कॉन्ट्रीब्यूशनसह एक्स्टेंशन
15 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर जर एखाद्यास पीपीएफ खाते कॉन्ट्रीब्यूशनसह सुरू ठेवायचं असेल तर तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसला तसा अर्ज द्यावा लागतो. ज्याठिकाणी खातं असेल तिथं हा अर्ज देणं गरजेचं आहे. हा अर्ज तुम्हाला मॅच्युरिटीच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच द्यावा लागणार आहे. तर मुदतवाढीसाठी एक फॉर्म भरावा लागेल. ज्याठिकाणी पीपीएफचं खातं आहे, त्याच पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत हा फॉर्म सबमिट केला जाईल. हा फॉर्म तुम्हाला वेळेत सबमिट करावा लागेल. तसं न केल्यास तुम्ही आपल्या अकाउंटमध्ये कॉन्ट्रीब्यूशन देऊ शकणार नाहीत.
कॉन्ट्रीब्यूशनशिवाय एक्स्टेंशन
तुमच्या पीपीएफ खात्यात 15 वर्षांनंतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नसेल मात्र त्यातल्या व्याजाचा फायदा घ्यायचा असेल तर हा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसला कळवण्याचीदेखील गरज नाही. 15 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर समजा तुम्ही रक्कम नाही काढली तर हा आपोआपच हा पर्याय लागू होतो. याचा तुम्हाला फायदा होतो. कारण तुम्ही कोणतीही रक्कम खात्यात भरत नाही, मात्र व्याजाचा फायदा मिळत राहतो शिवाय करामध्येही सूट मिळते. तुम्ही तुमच्या या खात्यातून कितीही आणि कधीही रक्कम काढू शकता. सर्व पैसे काढण्याचीही मुभा असते. यात एफडी आणि बचत खात्याची सुविधा तुम्हाला मिळत असते.
एक्स्टेंशन करताना 'हे' लक्षात ठेवा...
- केवळ भारतात राहणाऱ्या नागरिकांनाच पीपीएफ मुदतवाढ मिळू शकते. इतर देशाचं नागरिकत्व घेतलेल्या भारतीयाला अशाप्रकारे पीपीएफ खातं उघडण्याची परवानगी नाही. तसंच आधीपासून खातं असेल तर त्याचं एक्स्टेंशन करता येणार नाही.
- पीपीएफ एक्स्टेंशनसाठी ज्याठिकाणी तुमचं खातं असेल त्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अर्ज द्यावा लागेल. हा अर्ज मॅच्युरिटीच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच द्यावा लागेल.
- तुमच्या अर्जावर पीपीएफ खात्याचा एकूण कालावधी 5 वर्षांसाठी वाढवला गेला असेल तर तुम्हाला दरवर्षी किमान 500 रुपये जमा करणं गरजेचं राहील. ही किमान रक्कम असणार आहे. ती जर तुम्ही भरू शकला नाहीत, तर तुमचं खातं बंद केलं जाणार आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी दर वर्षी 50 रुपये दंडदेखील भरावा लागेल.
- पीपीएफ एक्स्टेंशन पर्यायाची निवड केल्यानंतर वर्षातून एकदाच तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढता येवू शकतात. मुदतपूर्तीच्या तारखेपर्यंत पैसे काढण्याची रक्कम तुमच्याकडे असलेल्या रकमेच्या 60 टक्क्यांपर्यंत असू शकते.