शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते. शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्न-धान्याने सगळ्यांची भूक मिटते. पण ह्या बळीराजावर नेहमीच नैसर्गिक संकटं येत असतात. सगळ्या जगाच्या पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीमुळे कधीकधी उपाशी झोपण्याची वेळ येते. अशा संकटाना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) आणली आहे.
पीक विमा योजनेचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट या योजनेचे आहे. या योजने अंतर्गत 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत 1,07,059 कोटी रुपयांहून अधिकचे दावे निकाली काढण्यात आले. तसेच 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे. या योजनेत नोंदणी केलेले सुमारे 85 टक्के शेतकरी हे छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. ही योजना असुरक्षित शेतकऱ्यांना देखील आर्थिक साहाय्य मिळवून देण्यास मदत करते.
‘माझी पॉलिसी-माझ्या हातात'
सर्व राज्यांमध्ये 'शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा पॉलिसी पोहोचवण्यासाठी ‘माझी पॉलिसी-माझ्या हातात' या उपक्रमाखाली घरोघरी पॉलिसीचे वितरण केले जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी असलेली धोरणे, जमिनीच्या नोंदी, दाव्याची प्रक्रिया आणि पीएमएफबीवाय (PMFBY) अंतर्गत तक्रार निवारणासंदर्भात आवश्यक असणारी सर्व माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पीक योजनेचा फायदा कोणत्या शेतकऱ्याला मिळतो
पिकांची पेरणी केल्यापासून ती काढेपर्यंत शेतकऱ्याला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. जसे की, पिकांच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्ती, कीड, रोगांचा प्रादुर्भाव, तसेच पूर, दुष्काळ इत्यादींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट होणार असेल तर त्या शेतकऱ्याला पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळू शकते. या योजनेत पिकांची काढणीनंतर होणारे नुकसान ही भरून मिळण्याची सोय आहे. चक्रीवादळ, अवेळी पाऊस, कापणीनंतर सुकण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळू शकते.
विविध संकटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास जास्तीत जास्त 14 दिवसांत अर्ज केल्यास विम्याचा फायदा मिळतो. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्यास संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसान झाल्यापासून 48 तासांच्या आत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.