गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कर्जांची परतफेड करणाऱ्या विद्यमान कर्जदारांची झोप उडेल असे विधान रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. देशात कर्जाचा व्याजदर दिर्घकाळ उच्चांकी स्तरावर राहील, असे मत गव्हर्नर दास यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे महागाई पाहता आरबीआयकडून आगामी पतधोरणात आणखी व्याजदर वाढवण्याची शक्यता बळावली आहे.
मागील वर्षभरापासून जगभरात महागाईने कहर केला आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर वस्तूंचा पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे अनेक देशांत महागाईचा आगडोंब उसळल्याचे दिसून आले होते. प्रमुख सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढवून महागाईला वेसण घालण्याचा प्रयत्न केला होता. जगभरात महागाईचा पारा हळुहळू खाली येत आहे, मात्र जोखीम अजून कायम आहे, असे दास यांनी सांगितले.
फिक्स्ड इन्कम मनी मार्केट अॅंड डेरिव्हेटीव्हज असोसिएश ऑफ इंडिया आणि प्रायमरी डिलर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या परिषदेत दास बोलत होते. ते म्हणाले की जगातील प्रमुख सेंट्रल बँकांनी व्याजदर कमी करण्याच्या दिशेन पावले उचलली आहेत. महागाई कमी होणे किंवा महागाई स्थिर असल्याने या बँकांचा कल पतधोरण शिथिल करण्याकडे आहे, मात्र भारताचा विचार केल तर देशात चढे व्याजदर आणखी काही काळ कायम राहतील. कारण जोखीम कमी झालेली नाही, असे दास यांनी स्पष्ट केले.
वर्ष 2022 मध्ये महागाईचा आलेख वरच्या दिशेने सरकत होता. मात्र नोव्हेंबर 2022 आणि डिसेंबर 2022 मध्ये मात्र महागाईची आकडेवारी दिलासादायक ठरली. नोव्हेंबर 2022 मध्ये महागाई दर 5.88% इतका खाली आला. तर डिसेंबर 2022 मध्ये तो 5.72% इतका खाली आला होता. विकास दराचा विचार केला तर जग आता मंदीतून सावरत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हीड काळात चलनातील अस्थिरता ही यापूर्वीच्या तुलनेत कमी झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. वर्ष 2008 मधील जागतिक मंदीच्या काळात रुपयातील अस्थिरता 25% इतकी होती. 2013 मध्ये ती 20% इतकी राहिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गव्हर्नरांनीच व्याजदर आणखी काहीकाळ उच्च स्तरावर राहतील, हे स्पष्ट केल्यानंतर कर्जदारांची चिंता वाढली आहे. वर्ष 2022 मध्ये आरबीआयने रेपो दरात 2.25% वाढ केली होती. त्यापाठोपाठ बँकांनी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे व्याजदर वाढवले होते. बँकांनी मुदत ठेवींच्या दरात देखील वाढ केली होती. कर्ज महागल्याने कर्जदारांना ईएमआयसाठी अतिरिक्त पैशांची तजवीज करावी लागली होती. सध्या गृह कर्जाचा दर 9% पासून सुरु आहे. वाहन कर्जाचा दर 11% पासून आहे.