Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance for Everyone : मागेल त्याला विमा, पण कितीचा?

Insurance for Everyone

घरातील कमावत्या व्यक्तीच्या (Breadwinner) आकस्मिक निधनाने त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाच्या किमान आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणारा घटक म्हणजे इन्शुरन्स (Term Insurance). पण या इन्श्युरन्सचा कव्हर किती असावा, याचे काही नियम आहेत. ते आपण जाणून घेऊ.

“कुणी मरणार नाहीये हो या घरात!!!”, असे म्हणत कधी काळी इन्शुरन्स एजंटच्या तोंडावर दरवाजा बंद केला जात असे. काळाचे गणित बदलले. अत्यंत धकाधकीच्या, दिवसेंदिवस अधिकाधिक अनिश्चित होत चाललेल्या माणसाच्या आयुष्यातील एकमेव निश्चित असलेल्या, मात्र तंतोतंत स्थळ-काळ, वेळ, अवधी याबाबत पूर्णतः अनभिज्ञ (Unknown) असलेल्या ‘मृत्यू’बाबत खुलेपणाने चर्चा करण्याइतके समाजमन आता सजग होऊ लागले आहे.

कोणत्याही घरातील कमावत्या व्यक्तीवर (Breadwinner) काही  निश्चित अशा आर्थिक जबाबदाऱ्या असतातच आणि त्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनाने त्याच्या पश्चात त्याच्यावर असणाऱ्या किमान आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणारा घटक म्हणजे इन्श्युरन्स (Insurance). मग तो लाईफ इन्श्युरन्स (Life Insurance) असो किंवा टर्म इन्शुरन्स (Term Insurance). कोणतीही कमावती व्यक्ती तिच्या आर्थिक जीवन कालावधीत काही  ठराविक अटींच्या अधीन राहून स्वतःकरिता टर्म इन्शुरन्स घेऊ शकते. मात्र या टर्म इन्शुरन्सचे कव्हर / मूल्य किती असावे? हे निश्चित करण्याचे शास्त्रीय परिमाण आहे.


कमावत्या व्यक्तीचे वय, त्या व्यक्तीच्या व्यवसायाचे स्वरूप आणि त्याचे  सद्यस्थितीत उत्पन्न (Financial Earnings), त्याची नोकरीची प्रत्यक्ष उरलेली वर्षे (Retirement Years), त्याची जीवनशैली (Life Style), त्याचे रहिवासाचे ठिकाण, त्याचे इन्श्युरन्स घेतानाचे आरोग्य (Health history), पूर्वी घेतलेल्या विमा-कवचाचे एकूण मूल्य अशा विविध घटकांचा (पॅरामीटर) विचार करून मगच विमा कंपनी (Insurance Company) त्या व्यक्तीचे “मानवी जीवन-मूल्य” (Human Life Value - HLV) ठरवते आणि जोखीम स्वीकारण्यायोग्य असल्यास  त्या व्यक्तीला देता येऊ शकणारे विमा-कवचाचे (Life Cover)चे मूल्य ठरवते.

मग प्रश्न असा पडतो की टर्म इन्शुरन्सची रक्कम किती असावी? तर याचे साधे आणि सोपे उत्तर आहे. ते म्हणजे संबंधित व्यक्तीचे वय आणि त्याचे त्यावेळचे उत्पन्न यावर ठरवता येते. ते कसे हे आपण खालील उदाहरणामधून समजून घेऊ.

व्यक्तीचे वय

उत्पन्नाचे पटीमध्ये प्राप्त होऊ शकणारे कव्हर

40 पेक्षा कमी असल्यास

उत्पन्नाच्या 20 ते 30 पट लाईफ कव्हर प्राप्त होऊ शकते

वय 40 ते 50 च्या दरम्यान असल्यास

उत्पन्नाच्या 10 ते 15 पट लाईफ कव्हर प्राप्त होऊ शकते

50 पेक्षा अधिक असल्यास

उत्पन्नाच्या 5 पट लाईफ कव्हर प्राप्त होऊ शकते

कोणत्याही व्यक्तीची लाईफ स्टाईल ही त्या माणसाचे वय आणि उत्पन्नानुसार बदलत असते. त्याचबरोबर त्या माणसाचे वय जस-जसे वाढू लागते, तसे त्याच्या आरोग्याविषयीची जोखीमसुद्धा वाढू लागते. परिणामी इन्शुरन्स कंपनीची देखील लाईफ कव्हर पुरविण्याची जोखीम वाढत असते. त्यामुळे अधिकचे लाईफ कव्हर उपलब्ध करून देताना इन्श्युरन्स कंपन्या (Insurer) प्रीमियमची रक्कम जास्त घेतात. तसेच त्या व्यक्तीच्या आर्थिक जीवनात बदल किंवा सुधारणा झाल्यास म्हणजेच त्याच्या उत्पन्नाच्या रकमेत वाढ झाल्यास त्याला अतिरिक्त लाईफ कव्हरसाठी इन्श्युरन्स कंपनीला प्रपोझल पाठवून कव्हर वाढवण्याची मागणी करता येते.

मात्र टर्म इन्शुरन्सचा कव्हर निश्चित करताना आपली उत्पन्नाची उर्वरित वर्षे, सद्यस्थितीमध्ये असलेली जमापुंजी, भविष्यात येऊ घातलेल्या आर्थिक गरजा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईचा दर विचारात घेणे अत्यावश्यक आहे.  

टर्म इन्शुरन्समध्ये केवळ आणि केवळ पॉलिसीच्या मुदतीच्या कालावधीमध्ये मृत्यू लाभ उपलब्ध असतो. तर लाईफ इन्श्युरन्समध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या वारसाला (नॉमिनी) लाईफ कव्हरची संपूर्ण रक्कम मिळते. या रकमेवर इन्कम टॅक्स अधिनियम, 1961 (Income Tax Act, 1961)च्या कलम 10 (10 D) अंतर्गत कोणताही कर (Tax) आकारला जात नाही.