जेव्हा तुम्ही बॅंकेत किंवा इतर कोणत्याही प्रोडक्टमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तिथे तुम्हाला नॉमिनी (Nominee) नाव टाकायला सांगितले जाते. नॉमिनी नाव देणं हे आता बंधनकारक आहे. पण बऱ्याच जणांना हा नॉमिनी म्हणजे कोण? आणि तो कशासाठी लागतो? याची माहिती नसते. तर आज आपण नॉमिनी किंवा नामनिर्देशित व्यक्ती (Nominated Person) म्हणजे कोण? आणि त्याचा नेमका अर्थ काय? याची माहिती घेणार आहोत.
नॉमिनेशन / नामांकन म्हणजे काय?
नामांकन ही कायद्याने दिलेली एक सुविधा आहे; जी विशेषकरून आर्थिक गोष्टींशी संबंधित आहे. आर्थिक सेवा देणाऱ्या संस्था ग्राहकांकडून नॉमिनेशन नाव न चुकता भरून घेतात. उदाहरणार्थ, एखाद्या खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या उत्पन्नाची काळजी घेण्यासाठी किंवा तिची योग्य पद्धतीने वाटणी करण्यासाठी नेमलेली व्यक्ती म्हणजे नामनिर्देशित व्यक्ती (Nominated Person). यालाच नॉमिनेशन (Nomination) किंवा नॉमिनी (Nominee) म्हटले जाते.
नॉमिनेशन महत्त्वाचे का आहे?
- एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी नॉमिनेशन अत्यंत गरजेचं आहे. जर त्या खात्याला नॉमिनेशन नसेल तर ती रक्कम तशीच बँकेत पडून राहते.
- कुटुंबियांसाठी अडचणीच्या काळात मृत व्यक्तीच्या खात्यातील पैसे हक्काने वापरता यावेत यासाठी प्रत्येक खात्यासाठी नॉमिनेशन करणं गरजेचं आहे.
- बॅंक खात्यत नॉमिनेशन केलेले नसेल तर कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच वारस प्रमाणपत्र, मृत्युपत्र किंवा कोर्टाचा आदेश यासह अनेक दस्तावेजांची गरज लागू शकते. यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाण्याची शक्यता अधिक असते.
- कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज असताना त्यांना आपल्याच व्यक्तीचे पैसे काढण्यासाठी त्रास होऊ नये, म्हणून प्रत्येक खात्यासाठी नॉमिनेशन करणं आवश्यक आहे.
नॉमिनेशन किती जणांचे करता येते?
नॉमिनी किंवा नॉमिनेशनची संख्या गुंतवणुकीच्या पर्यायानुसार बदलते. पण प्रत्येक पर्यायात किमान एका व्यक्तीचे नाव नॉमिनेट करणे बंधनकारक आहे. बॅंकेत खाते उघडताना तुम्ही फक्त एकच नॉमिनी नाव देऊ शकता. पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना एका फोलिओसाठी किमान 3 नावे देता येतात. एकापेक्षा जास्त नावे दिली जातात. तेव्हा तिथे प्रत्येक नावाला किती टक्के हिस्सा दिला जावा. हे नमूद करावे लागते.
नॉमिनी म्हणून कोणाचे नाव देता येते?
नॉमिनी म्हणून साधारणपणे जोडीदाराचे (पती किंवा पत्नीचे), आई, वडील, भाऊ, बहिणी, मुले किंवा आपल्या परिचयातील, नातेवाईकांपैकी व्यक्तीचे नाव देता येते. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त नावे नॉमिनी म्हणून देता येतात. तर काही ठिकाणी एकच नाव देता येते आणि ते बंधनकारक आहे. काही प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त व्यक्तींची नावे नॉमिनी म्हणून दिली असतील तर तिथे त्या नॉमिनींचा हिस्साही नमूद करावा लागतो. मुख्य गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यानंतर सदर व्यक्तीच्या खात्यातील रक्कम नॉमिनीला दिली जाते. नॉमिनी एकापेक्षा जास्त असतील आणि त्यांचा हिस्सा नमूद केला नसेल तर सर्वांना समान पद्धतीने हिस्सा दिला जातो.
नॉमिनेशन देण्याचे फायदे काय आहेत?
नॉमिनेशन व्यक्तीचे नाव दिल्यामुळे मुख्य गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर संबंधित रक्कम नामांकित व्यक्तीकडे हस्तांतरण करणं सोपं जातं. पण काही प्रकरणात नॉमिनेशन दिले नसेल तर गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्या गुंतवणुकीवर दावा करणाऱ्या कायदेशीर वारसाला अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात.
नॉमिनेशन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. काही जणांनी नॉमिनेशन नाव न दिल्यामुळे अनेक बॅंकांमध्ये कोट्यवधी रूपये पडून आहेत. नॉमिनेशन न केल्यामुळे असे पैसे काढणे खूप अवघड असते. त्यामुळे आपल्या मृत्यूपश्चात कुटुंबियांचे भविष्य सरळित राहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नॉमिनेशन नाव आवर्जून भरा.