मरण हे त्रिकाल बाधी सत्य आहे. आपला मृत्यू कधी ना कधी तरी होणार हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण आपल्या मृत्यूनंतरदेखील आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जीवंत असतानाच काही गोष्टी करणे गरजेचे आहेत. प्रत्येकाने किमान काही रक्कमेचा लाईफ इन्श्युरन्स म्हणजेच जीवन विमा उतरवणे गरजेचे आहे. पण लाईफ इन्श्युरन्स घेताना कोणता घ्यायचा असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आज आम्ही तुम्हाला याचविषयी सांगणार आहोत.
लाईफ इन्श्युरन्स हा कधीही कमी वय असतानाच काढावा. त्यामुळे पॉलिसीचे प्रीमियम भरणे सोपे जाते. कारण कमी वयात प्रीमियम कमी असतात. एकदा वय वाढले की शरीराची त्यावेळची स्थिती , तसेच धुम्रपान किंवा इतर वाईट सवयींचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याच पॉलिसीकरता तुम्हाला जास्तीचा प्रीमियम द्यावा लागू शकतो. तसेच आपल्या चुकीच्या सवयींमुळे एखादा मोठा आजार झाला तर इन्श्युरन्स मिळणंच कठीण होऊन जाते.
लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी या विविध प्रकारच्या असतात. त्यामुळे कोणती पॉलिसी घ्यायची हा सगळ्यात पहिला प्रश्न लोकांना भेजसावतो. लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी ही वय , प्रीमियमची रक्कम आणि तुमच्या पॉलिसीला किती रक्कमेचे कवच आहे यावर अवलंबून असते. पॉलिसीमध्ये टर्म इन्श्युरन्स आणि पारंपरिक किंवा युनिट-लिंक्ड पॉलिसी असे ही प्रकार असतात.
टर्म इन्श्युरन्समध्ये एखादी व्यक्ती वैयक्तिक त्याच्या पॉलिसीचा हफ्ता भरत असतो. त्या पॉलिसीच्या कालावधीत त्याचे निधन झाले तर त्याच्या पॉलिसीची ठरावीक रक्कम त्याच्या वारसाला किंवा नॉमिनेट केलेल्या व्यक्तीली मिळते. या पॉलिसीचा प्रीमियम कमी असतो आणि यात मृत्यूनंतरच वारसदाराला संपूर्ण पैसे मिळतात. व्यक्ती जिवंत असताना त्याला या पॉलिसीचा कोणताच लाभ मिळत नाही. तर पारंपरिक किंवा युनिट-लिंक्ड पॉलिसीमध्ये पॉलिसी परिपक्व झाल्यावर एक ठरावीक रक्कम पॉलिसी धारकाला मिळते. यामध्ये पॉलिसीची वर्षे आणि रक्कम पॉलिसीनुसार वेगवेगळी असतात. अशाप्रकारची पॉलिसी घेणे लोक अधिक पसंत करतात. मात्र, या पॉलिसीत जास्त पैसा गुंतवावा लागतो आणि या पॉलिसीचा प्रीमियम हा खूपच जास्त असतो.
दोन्ही जीवन विमा पॉलिसीचे फायदे हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही किती प्रीमियम भरू शकता यावर तुम्हाला कोणती पॉलिसी घ्यायची आहे हे तुम्ही ठरवू शकता. कारण तुमच्या उत्पन्नातून तुम्हाला तुमचे घर चालवायचे असते. तुमचे दैनंदिन खर्च भागवायचे असतात. तसेच होम लोन किंवा कार लोन घेतले असेल तर त्याचा हफ्ता भरायचा असतो. त्यामुळे या सगळ्यातून तुम्ही किती पैसे तुमच्या जीवन विमाच्या प्रीमियमसाठी खर्च करू शकता, हे प्रत्येकजण आपापले ठरवू शकतो.
लाईफ इन्श्युरन्स घेण्यासाठी तुम्ही इन्श्युरन्स कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता किंवा इन्श्युरन्स एजंटकरून इन्श्युरन्सच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी जाणून घेऊ शकता आणि त्यातून तुम्हाला कोणता आणि किती रक्कमेचा इन्श्युरन्स काढायचा आहे हे ठरवू शकता. यात तुम्ही तुमच्या घरातील वडिलधाऱ्या मंडळींची देखील मदत घेऊ शकता. कारण या मंडळींना अनुभवानुसार लाईफ इन्श्युरन्सविषयी अधिक माहिती असते. ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात.
इन्श्युरन्स पॉलिसीचा फायदा हा दरवर्षी कर भरताना आपल्याला मिळतो. तुम्ही वर्षभर पॉलिसीसाठी जे प्रीमियम भरता त्यांना कलम 80 C अंतर्गत किमान दीड लाखांचा टॅक्स बेनिफिट मिळतो.