• 02 Oct, 2022 08:01

International Youth Day 2022: तरूणांसाठी आर्थिक आत्मनिर्भरतेचे 10 पर्याय!

International Youth Day 2022

International Youth Day 2022 : तरूणांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच कौशल्यं, पैशांचं मूल्य आणि आर्थिक स्वातंत्र्य समजून देणं गरजेचं आहे.

10 ते 15 वर्षे शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर या मुलांना नेहमीच एक प्रश्न सतावत असतो. तो म्हणजे इतकी वर्षे आम्ही जे शाळेत शिकलो. त्याचा आता आम्हाला पैसे कमावण्यासाठी उपयोग काय? पण याचं नेमकं उत्तर पालकांनाही ठाऊक नसतं. कारण त्यांच्याही मते, पाठ्यपुस्तकातून मिळालेलं शिक्षण याचा दैनंदिन जीवनात फारसा वापर होत नाही. पैसे कमावण्याच्या दृष्टीने तर मुळीच नाही. शिक्षण पूर्ण झालं की, मग पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा प्रोफेशनल शिक्षण घेतलं जातं.

आज जग इतक्या झपाट्याने बदलत आहे; तरीही आपल्या शिक्षणात मात्र तसा बदल होताना दिसत नाही. वर्षानुवर्ष सरसकट सर्व मुले गणिताची सूत्रे पाठ करण्यात आणि सायन्समधील प्रॅक्टील्स पूर्ण करण्यात वेळ घालवत आहेत. याऐवजी अभ्यासात विशेष रस नसणाऱ्या तरूणांना वास्तविक जगात लागू होणारी कौशल्ये शिकवली तर त्यातून त्यांचा सर्वांगिण विकास तर होईलच. त्याचबरोबर ते लवकर आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आजच्या International Youth Day 2022 च्या निमित्ताने तरूणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या 10 पर्यायांची माहिती घेणार आहोत.

फ्री-लान्स (Free-Lance)

कोरोनामुळे फ्री-लान्स आणि वर्क फ्रॉर्म होम ही संकल्पना चांगलीच बळावली. यामुळे हजारो लोक घरात बसून व्हर्च्युअली काम करत आहेत. फ्री-लान्समुळे आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार काम करण्याची संधी मिळते. ज्या तरूणांना ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत. त्यांच्यासाठी फ्री-लान्स हा एक चांगला पर्याय आहे. इंटरनेटवर फ्री-लान्सचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.

ग्राफिक डिझायनिंग (Graphic Designer)

सध्या आपल्या भूतलावरील अर्ध्याहून अधिक जग हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेले आणि हे डिजिटल प्लॅटफॉर्म ग्राफिक्सशिवाय अपूर्ण आहे. जर तुमच्याकडे सौंदर्यदृष्टी असेल आणि एखाद्या गोष्टीकडे कलाकाराच्या नजरेतून पाहण्याची अनोखी दृष्टी असेल तर ग्राफिक डिझायनिंग हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. तुमच्या कलेचे मूलभूत गुण असतील तर तुम्ही YouTube च्या माध्यमातून कला या क्षेत्रातील ज्ञान वाढवून एक चांगले डिझायनर बनू शकता. यातून तुम्ही तुमच्या कलात्मक गोष्टींची विक्री करून चांगले पैसेही मिळवू शकता.

वेबसाईट डिझायनिंग (Website Designing)

आजच्या ऑनलाईनच्या दुनियेत वेबसाईटला खूप महत्त्व आले आहे. अगदी मोठमोठ्या ब्रॅण्डसपासून छोटे-मोठे व्यावसायिक सुद्धा वेबसाईटद्वारे आपल्या उत्पादनाची जाहिरात करत आहेत. त्यामुळे वेबसाईट डिझायनिंग हा एक मागणी असलेला चांगला पर्याय आहे. तांत्रिक ज्ञान आणि कोडिंगबाबत तुम्हाला आवड असेल तर वेबसाईट डिझायनिंगचे कोर्स ही उपलब्ध आहेत. त्यातून तुम्ही काही दिवसांत वेबसाईट डिझाईन करणे शिकू शकता.

इन्फ्लुएंसर (Influencer)

सध्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असलेले लोक इन्फ्लुएंसर म्हणून काम करत आहेत. बरेच तरूण आपली प्रतिभा आणि कौशल्य सिद्ध करण्यासाठी सोशल मिडियावर अक्टीव्ह असतात. यातून त्यांना लाईक करणारे फॉलोअर्स मिळतात. ज्यांचा उपयोग मोठ्या कंपन्या आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी करतात. अशाप्रकारे प्रमोशन करणाऱ्यांना इन्फ्लुएंसर म्हणतात. यातून त्यांना चांगले पैसे ही मिळतात.

ब्लॉगिंग आणि युट्यूब व्हिडिओ (Blogging & YouTube Video)

ब्लॉगिंग आणि युट्यूब व्हिडिओ हा ऑनलाईन पैसे कमवण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तरूणांसाठी पैसे मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. अनेक कंपन्या मार्केटिंगसाठी ब्लॉग मार्केटिंगचा वापर करतात. यासाठी त्यांना अशा ब्लॉगर्सची गरज लागत असते. ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी ऑनलाइन अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. युट्यूब हा सुद्धा असाच पर्याय आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील व्हिडिओ अपलोड करून चांगली माहिती लोकांपर्यंत शेअर करू शकता. ज्याचा तुम्हाला आर्थिक आणि इतरांना चांगली माहिती मिळाळ्याचा फायदा होऊ शकतो.

अॅफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

अॅफिलिएट मार्केटिंग हा शब्द नवीन वाटत असला तरी, तो मार्केटिंगमधला महत्त्वाचा भाग आहे. हे मार्केटिंगचं असं तंत्र आहे; ज्याद्वारे विक्रेते आपल्या वस्तुंची विक्री करून त्यातून चांगले पैसे मिळवतात. यामध्ये प्रत्येक वेळी तुम्ही ज्या कंपनीची प्रोडक्ट्स विकता तेव्हा तुम्हाला त्यावर कमिशन मिळते. तुम्हाला जर सोशल मिडिया ब्रँडिंग आणि डिजिटल मार्केटिंगची माहिती असेल तर यातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता.

ऑनलाईन सर्व्हे (Online Survey)

ऑनलाईन सर्व्हे हा पैसे कमवण्याचा आणखी एक चांगला आणि सोपा मार्ग आहे. इंटरनेटवर अशा काही वेबसाईट्सही आहेत. ज्या तरूणांना सर्व्हे भरण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे देतात. अशा वेबसाईटवर तुम्ही स्वत:ची नोंदणी करून सर्व्हेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता.

ऑनलाइन शिकवणे (Online Teaching)

कोरोना साथीनंतर ऑनलाईन शिकवणीला चालना मिळू लागली आहे. म्हणजे काही लोकांसाठी हा पर्याय चांगला ठरत आहे. दोघेही नोकरी करणारे पालक आपल्या मुलांसाठी अशा ऑनलाईन क्लासेससाठी तयार असतात. कारण घरात राहूनच मुलांचे शिकवणीचे वर्ग, छंद वर्ग जोपासता येऊ शकतात. अशी कौशल्ये असणाऱ्या तरूणांसाठी ही सुद्धा एक चांगली संधी आहे.

स्वत:च्या मालकीचा व्यवसाय (Owning a Small Business)

2016 मध्ये इन्स्टाग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवर खरेदी-विक्रीचा पर्याय दिल्यापासून ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. इन्स्टाग्रामवर अशी ऑनलाईन व्यवसायाची अनेक खाती आहेत. जी तरूण सफाईदारपणे हाताळत आहेत. यातून त्यांना चांगला मोबदला देखील मिळत आहे. इन्स्टाग्रामवर पेंटिंग्ज, विविध वस्तू, हस्तनिर्मित भेटवस्तू आणि इतर गोष्टी ऑनलाऊन विकून ही तुम्ही पैसे कमवू शकता.

डेटा एंट्री (Data Entry)

कोणतीही गुंतवणूक न करता, तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल आणि तुम्हाला चांगले टायपिंग येत असेल तर तुम्ही घरबसल्या डेटा एंट्रीचा जॉब करू शकता. डेटा एंट्रीमधूनही चांगले पैसे मिळतात. हे काम तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि घरातून करू शकता. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स आहेत; ज्या डेटा तयार करण्यासाठी किंवा त्याचे अनालिसिस करण्याचे काम देतात.

या अशाप्रकारच्या पर्यायातून तुम्हाला तरूणपणात आर्थिक स्वातंत्र्यही मिळू शकते आणि अनुभवही घेता येतो. या वयात तुमच्या वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे वेगवेगळ्या सर्जनशील कल्पना आणि कौशल्यं असतील तर तुम्ही नोकरीव्यतिरिक्त अधिक पैसे कमवू शकता.