मागील काही महिन्यांपासून महागाई सतत वाढत असून त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता येत्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. किरकोळ बाजारातील महागाई मार्चपर्यंत 5 टक्क्यांच्याही खाली येऊ शकते, असे एसबीआयने केलेल्या अहवालात म्हटले आहे. किरकोळ बाजारातील महागाई कन्झ्युमर प्राइस इंडेक्सनुसार ठरवली जाते.
जानेवारी ते मार्च पर्यंत किरकोळ बाजारातील महागाई दर 4.7 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता एसबीआयने अहवालात वर्तवली आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात देशामध्ये 5.72 टक्के किरकोळ महागाई दर होता. हा दर आता खाली येत असून पुढील काही महिन्यांत महागाई नियंत्रणात असेल, असे अहवालात म्हटले आहे.
देशामध्ये मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 6.77 इतका महागाईचा दर होता. मागील वर्षाच्या सुरुवातीपासून ऑक्टोबरपर्यंत महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पुढे होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये तो खाली येऊन 5.88 टक्के झाला. डिसेंबरपासून किरकोळ महागाई दर आणखी खाली येत आहे. घरगुती किराणा मालाच्या वस्तू, फळे भाजीपाला, अंडी अशा वस्तूंचे दरही खाली आहेत.
देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 डिसेंबर 2022 ला व्याजदरामध्ये 35 बेसिस पॉइंटने वाढ केली होती. आरबीआयने निश्चित केलेल्या पातळीत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतरही कर्जाचे भाव बँका आणि आर्थिक संस्थांनी वाढवले आहेत. त्यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले असून बाजारातील पैशांची तरलता कमी झाली आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            