चालू आर्थिक वर्षात भारतीय कांद्याची निर्यात (India's Onion Exports) झपाट्याने वाढत आहे. पहिल्या 7 महिन्यांतच गेल्या आर्थिक वर्षातील एकूण निर्यातीच्या 88 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मागील याच कालावधीच्या तुलनेत त्याची निर्यात 38 टक्क्यांनी (38 percent increase in onion exports) वाढली आहे. निर्यातीत एवढी मोठी वाढ होण्याचे कारण म्हणजे देशातील कांद्याचे कमी भाव. कांदा स्वस्त झाल्यामुळे निर्यात बाजारात भारतीय कांद्याची मागणी वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात निर्यातदारांना 22 ते 25 रुपये किलो भाव मिळत होता, या आर्थिक वर्षात 18 ते 20 रुपये किलो दराने मिळत आहे.
Table of contents [Show]
‘या’ देशांमध्ये झालेली कांद्याची निर्यात
केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2022-23 या एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 13.54 लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 9.81 लाख टन कांद्याची निर्यात झाली होती. अशाप्रकारे चालू आर्थिक वर्षात कांद्याच्या निर्यातीत सुमारे 38 टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक 3.94 लाख टन कांद्याची निर्यात बांगलादेशला झाली आहे. यानंतर मलेशियाला 2.23 लाख टन, यूएईला 1.85 लाख टन, श्रीलंकेला 1.47 लाख टन आणि नेपाळला 1 लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत निर्यात वाढली
2022-23 मध्ये इतका कांदा निर्यात होत आहे की पहिल्या 7 महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) निर्यात गेल्या आर्थिक वर्षातील एकूण निर्यातीच्या 88 टक्क्यांच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एकूण 15.38 लाख टन कांद्याची निर्यात झाली होती, तर या आर्थिक वर्षाच्या केवळ 7 महिन्यांमध्येच 13.54 लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. मलेशियाने या आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत 2.23 लाख टन निर्यात केली आहे, जी गेल्या आर्थिक वर्षात 1.70 लाख टन होती. गेल्या आर्थिक वर्षात यूएईला एकूण 1.22 लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली होती, तर या आर्थिक वर्षाच्या 7 महिन्यांत 1.85 लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. साहजिकच, गेल्या आर्थिक वर्षातील एकूण निर्यातीपेक्षा या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यांमध्ये यूएईला सुमारे 53 टक्के अधिक आणि मलेशियाला सुमारे 31 टक्के अधिक निर्यात झाली आहे.
यंदा या देशांना झाली एवढी कांदा निर्यात
मागील आर्थिक वर्षात ओमानला 14,586 टनांच्या तुलनेत 35,840 टन, इंडोनेशियाला 37,666 टनांच्या तुलनेत 69,347 टन, कतारला 33,326 टनांच्या तुलनेत 47,892 टन, कुवेतला 24,219 टनांच्या तुलनेत 28,253 टन आणि बहरिनला 14,386 टनांच्या तुलनेत 15,968 टन कांद्याची निर्यात 7 महिन्यात झाली आहे.
मात्र तरीही भाव मंदावले
भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे सांगतात की, भारतीय कांदा स्वस्त आणि मुबलक असल्याने त्याची निर्यात वाढत आहे. सर्वसाधारणपणे, जेव्हा निर्यात वाढते तेव्हा किंमती देखील वाढल्या पाहिजेत. मात्र देशात विक्रमी उत्पादन झाल्याने बंपर निर्यात होऊनही कांद्याचे भाव मंदावले आहेत.