देशातील किरकोळ महागाईचा दर सप्टेंबर महिन्यात 5.02 टक्क्यांवर आला असल्याचे सांख्यिकी विभागाने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतीमुळे बेजार झालेल्या सामान्यांना आता दिलासा मिळू लागला आहे. अशातच ऐन सणासुदीच्या काळात गव्हाच्या किंमती वाढू शकतात असा अंदाज आहे. य सर्व परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेऊन आहे.
यंदा गव्हाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी निघेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर देशातील अन्नधान्य महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून गव्हाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या गव्हाचा साठा खुल्या बाजारात विकला आहे.
2.37 मिलियन टन गव्हाची विक्री
गव्हाची साठेमारी होऊ नये आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. भारतीय खाद्य महामंडळ (Food Corporation of India) याबाबत सजग असून महामंडळाने या आर्थिक वर्षात 2.37 दशलक्ष टन गव्हाची विक्री खुल्या बाजारात केल्याचे म्हटले आहे.
यामुळे देशातील विविध भागात गव्हाची टंचाई निर्माण होणार नाही आणि पर्यायाने भाव नियंत्रणात राहतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून या आठवड्यात खाद्य महामंडळाकडून 0.19 मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्यात आली आहे. डिसेंबर अखेरीपर्यंत 500 0.19 मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
भाववाढ नियंत्रणात
यंदा पडलेला असमाधानकारक पाऊस, बदलते हवामान यांचा परिणाम शेतीवर झालेला पाहायला मिळतो आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. खरीपाचे पिक समाधानकारक निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना देखील नाहीये. जून-जुलै महिन्यापासून गव्हाच्या किंमतीत सातत्याने भाववाढ पहायला मिळाली होती.
आता सणासुदीच्या काळात सामान्यांना महागाईला तोंड देऊ लागू नये म्हणून केंद्र सरकारने मागच्या महिन्यापासूनच उपाययोजना सुरु केल्या आहेत. मागील महिन्यात केंद्र सरकारने गव्हाचे व्यापारी, घाऊक विक्रेते आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांवरील साठा मर्यादा 3,000 टनांवरून 2,000 टनांपर्यंत कमी केली आहे. म्हणजेच गव्हाच्या साठ्यात 1000 टनांची कपात करण्यात आली होती. आता गव्हाची खुल्या बाजारात विक्री होत असल्याने भाववाढ नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत आहेत.