श्रावण महिना सुरु झाला की आपल्याकडे सणासुदीला सुरुवात होत असते. ऐन सणासुदीच्या काळात आता मिठाई आणि गोडधोड पदार्थ खाणे महागणार आहे, याचे कारण म्हणजे आजपासून मुंबईत दुधाचे भाव लिटरमागे दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आधीच हिरव्या पालेभाज्या, कांदे, बटाटे, तूर डाळ व इतर कडधान्यांच्या किमती वाढलेल्या असताना ग्राहकांना आता दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे देखील महागणार आहे. दुध दरवाढीच्या या निर्णयाबाबत सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईतील म्हशीच्या दुधाचा घाऊक दर आजपासून, म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून 85 रुपये प्रतिलिटरवरून 87 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई दूध उत्पादक संघाने केली आहे. दुध दरवाढीचे कारण आणि स्पष्टीकरण देखील दुध संघाने दिले आहे.
दुष्काळाची सुरुवात?
दुध दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे गाई-गुरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने यंदा दडी मारली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली आहे. अशातच चारा उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला असून, शेतात आणि बाजारात सध्या चारा उपलब्ध नसल्याचे दुध उत्पादक संघाने म्हटले आहे.
चाऱ्याबाबतीत मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्यामुळे चारा महागला असून दुध उत्पादकांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे. ‘एल निनो’ चा परिणाम अग्नेय आशियायी देशांमध्ये जाणवेल असे हवामान खात्याने आधीच जाहीर केले होते. त्यामुळे येणारा उन्हाळा अधिक खडतर असेल असे मानले जात आहे.
बैठकीत घेतला निर्णय
मुंबई दूध उत्पादक संघाची बैठक नुकतीच पार पडली. या दुध उत्पादक संघात 700 हून अधिक डेअरी मालक आणि 50,000 हून अधिक म्हैस मालक सहभागी आहेत. त्याच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात चाऱ्याचे भाव 20 टक्क्यांनी वाढले असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे दुध उत्पादक संघाने म्हटले आहे. तसेच सहा महिन्यानंतर या निर्णयाचा आढावा घेतला जाईल असे देखील संघाने म्हटले आहे.
ऐन सणासुदीच्या दिवसांत ही दुध भाववाढ झाल्याने नागरिकांना आता किरकोळ बाजारात म्हशीचे दूध 90-95 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करावे लागणार आहे.