एक दीड महिन्यांपूर्वी टोमॅटोचे दराने उच्चांक गाठला होता. टोमॅटोच्या दराने प्रति किलोला 200 रुपयापेक्षा जास्तीचा उच्चाक गाठल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाला होता. त्याकाळात शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असताना शासनाने जनतेच्या हितासाठी नेपाळमधून टोमॅटो आयात करून स्वस्त दराने ग्राहकांना उपलब्ध करून दिला. मात्र, आता टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकऱ्याच्या टोमॅटोचे ढीग पुन्हा रस्त्याच्याकडेला दिसू लागले आहेत. टोमॅटोची आवक वाढल्यामुळे सध्या टोमॅटोला 1 रुपया प्रति किलो दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
टोमॅटोचे दर 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलवर
टोमॅटोने गाठलेले उच्चांकी दर फार काळासाठी शेतकऱ्यांना समाधानी ठेऊ शकले नाहीत. सध्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यातच टोमॅटोचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले असून शेतकऱ्यांच्या टोमॅटोला प्रतिक्विंटल 100 ते 300 रुपये दर मिळत आहे. टोमॅटोसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवडाभरात टोमॅटोला 1 ते 3 रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. तर राज्यातील इतर बाजार पेठेत टोमॅटोचे दर 3 ते 5 रुपये किलो आहे.
उत्पादन खर्चात घाटा, टोमॅटो रस्त्यावर
सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या कष्टाने टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत आहे. मात्र,सध्या मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.2-3 रुपये भाव असल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो बाजार पेठेत घेऊन जाणे देखील परवडत नाही. मिळणाऱ्या भावातून वाहतूक खर्च वजा जाता उत्पादन खर्चात घाटा होत आहे. त्यामुळे शेतकरी टोमॅटो रस्त्याच्या कडेला टाकून देत असल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे.