यावर्षी भारतातील सामान्य नागरिकांच्या महागाईच्या बाबतीतल्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.पावसाळा सुरु होताच देशभरात हिरव्या पालेभाज्या, कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि कडधान्यांचे भाव महागले होते. आता यात भरीस भर म्हणून तांदळाच्या किंमती देखील वाढण्याच्या शक्यता आहे. याचे कारण म्हणजे यावर्षी तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्वाच्या राज्यांमध्ये उत्पादन कमी
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला देशभरात वरूण राजाने चांगलीच हजेरी लावली होती. मात्र गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. मागील वर्षी झालेल्या हवामान बदलामुळे आग्नेय आशियात ‘एल निनो’चा परिणाम जाणवू शकतो आणि आवर्षण परिस्थिती निर्माण होऊ शकते असा शास्त्रज्ञांनी आधीच अंदाज वर्तवला होता.
पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असून भात शेती करणारे शेतकरी चिंतेत आहेत. त्यांच्या शेतातील भाताची लावणी झालेली असतानाचा पावसाने दडी मारल्यामुळे याचा थेट परिणाम तांदळाच्या उत्पादनावर पाहायला मिळणार आहे. ICAR म्हणजेच राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने यावर्षी तांदळाच्या पिकात 5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते असे म्हटले आहे.
शेतकऱ्यांना दिला सल्ला
यंदा पाऊस कमी पडल्यामुळे भात लावणी आणि पिक उत्पादनावर याचा थेट परिणाम जाणवणार आहे. उत्पादन कमी निघाल्यास तांदळाच्या बाबतीतले मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडू शकते आणि महागाईचा भडका उडू शकतो. यावर उपाय म्हणून कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पिक लावण्याची सूचना ICAR ने शेतकऱ्यांना केली आहे. यामुळे कमी पावसात आणि खराब हवामानातही शेतकऱ्यांना पिक घेता येईल आणि स्वतःचे आर्थिक बजेट सावरता येईल.
भारतात 90 ते 100 दिवसांत पिक देणारे तांदळाचे वाण उपलब्ध आहे. अशा वाणांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना पिक काढता येईल आणि तांदळाच्या भाववाढीचा मुद्दा पुढे येणार नाही असे ICAR च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तांदळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता
पुढील आर्थिक वर्षातील अंदाज लावत असताना यावर्षी देखील तांदळाची भाववाढ होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत उत्पादन वाढवून त्याचा खप आधी देशातच केला जावा आणि महागाई नियंत्रणात आणावी यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.