Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Basmati Rice Export : बासमती तांदळाची निर्यात रोडावली, किमती कमी करण्यासाठी सरकारच्या हालचाली

Basmati Rice

खरे तर बासमती तांदळाचे निर्यात दर वाढवल्यामुळे निर्यात काही प्रमाणात का होईना कमी होईल आणि देशांतर्गत पुरवठा कायम राहील असा सरकारचा अंदाज होता, मात्र निर्यात दर खूपच चढ्या भावाने ठरवल्याच्या तक्रारी केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

यंदा तांदळाचे देशांतर्गत उत्पन्न कमी होईल असा अंदाज असल्याने केंद्र सरकाने दोन महिन्यांपूर्वीच आधी बिगर बासमती आणि नंतर बासमती तांदळाच्या निर्यातीवर काही बंधने लादली होती. देशांतर्गत तांदळाचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि भाववाढ नियंत्रणात असावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला होता.

मात्र आता या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळाला मागणी कमी होताना दिसते आहे. यामुळेच बासमती तांदळाच्या किमान निर्यात मूल्याचा आढावा घेण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत  असल्याचे समजते आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार सध्या बासमती तांदळाचे निर्यातमूल्य 1,200 डॉलर प्रति टन इतके आहे.

खरे तर किमती वाढवल्यामुळे निर्यात काही प्रमाणात का होईना कमी होईल आणि देशांतर्गत पुरवठा कायम राहील असा सरकारचा अंदाज होता, मात्र निर्यात दर खूपच चढ्या भावाने ठरवल्याच्या तक्रारी केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

शेतकऱ्यांना मिळेना भाव 

खरे तर अमेरिका व इतर युरोपीय देशांमध्ये भारतीय तांदळाला मोठी मागणी असते. देशोविदेशात स्थायिक झालेले भारतीय वंशाचे नागरिक देखील भारतीय तांदूळ मागवत असतो. इतर देशांमध्ये तांदळाला असलेली मागणी भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत असते.

यंदा पाऊस असमाधानकारक झाल्यामुळे अनेक ठिकाणी तांदळाचे उत्पादन समाधानकारक झालेले नाहीये. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ही काही प्रमुख तांदूळ उत्पादक राज्ये आहेत, मात्र येथे देखील यंदा पावसाने दडी मारली आहे. ठेवणीतला तांदूळ देखील विक्रीसाठी काढताना शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना विविध सरकारी नियमांचे पालन करावे लागत आहेत. तांत्रिक अडचणी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना तांदूळ निर्यात करता येत नाहीये अशा त्यांच्या तक्रारी आहेत.

लवकरच होईल निर्णय 

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार बासमती तांदळाच्या किमान निर्यात किंमतीचा आढावा घेण्यावर गांभीर्याने विचार करत आहे. बासमती तांदळाचे निर्यातमूल्य 850 डॉलर प्रति टन केले जावे अशी तांदूळ निर्यातदार संघटनेची मागणी आहे.

नुकतीच अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी बासमती तांदूळ निर्यातदारांसोबत बैठक घेतली असून येणाऱ्या काळात या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.