Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Independence Day 2023: विद्यार्थी आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवू शकतात?

How to get Financial Freedom

Independence Day 2023: आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर आर्थिक साक्षर असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर त्यांनी घराचं बजेट कसं चालतं? बचत, गुंतवणूक म्हणजे काय? कर्ज म्हणजे नेमकं काय? हे समजून घेतलं पाहिजे.

Independence Day 2023: प्रत्येक भारतीय देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो. कारण या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी जी किंमत मोजली आहे. त्याचे मूल्य आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांने आर्थिक स्वातंत्र्याचे धडे गिरवून स्वत:ला आर्थिक सक्षम करावे. जेणेकरून भविष्यात कोणताही आर्थिक निर्णय घेताना त्याची चलबिचल होणार नाही. उलट तो अगदी ठामपणे निर्णय घेऊन आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची चुणूक दाखवेल. आज आपण आपल्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी स्वत:ला कसे आर्थिक स्वातंत्र्य बनवू शकतात. याबद्दल जाणून घेणार आहोत.

आर्थिक स्वातंत्र्याचा पहिला धडा हा आर्थिक साक्षरतेपासून सुरू होतो. म्हणजे तु्म्हाला जर खरोखरच आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर, तुमचे आर्थिक साक्षरतेचा पाया भक्कम असणे गरजेचा आहे. यामध्ये शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी घराचे बजेट कसे चालते? बचत, गुंतवणूक म्हणजे काय? कर्ज म्हणजे नेमकं काय? ते कोण देतं? त्याची गरज का भासते? अशा मूलभूत गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेदेखील शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेविषयी धडे दिले पाहिजेत याविषयी आग्रही आहे. आर्थिक व्यवहारांचा समावेश अभ्यासक्रमातही केला गेला पाहिजे, असे आरबीआयचे मत आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच काही गोष्टींचे सामान्य ज्ञान असेल तर ते त्याच्या आधारावर भविष्यात ठोस निर्णय घेण्यास तयार होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे लहानपणापासूनच दिले पाहिजेत.

बचतीची सवय

मुलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यासाठी लहानपणापासून बचतीची सवय लावणे गरजेचे आहे. आर्थिक बचत ही एक प्रकारची शिस्त आहे. या आर्थिक शिस्तीच्या आधारावर मुले भविष्यात खूप मोठी मजल मारू शकतात. विद्यार्थ्यांना मिळणारा पॉकेटमनी, नातेवाईकांकडून पैशांच्या स्वरूपात मिळणाऱ्या भेटवस्तू या खर्च करण्याऐवजी त्यातील काही रक्कम विशिष्ट उद्दिष्टांसाठी बचत करण्याची सवय लावली पाहिजे. यासाठी त्यांना बँकेमध्ये एखादे सेव्हिंग अकाउंट सुरु करून द्यायला हवे.

आर्थिक उद्दिष्ट्ये ठरवणे

ज्याप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान पुढील वर्षाची उद्दिष्ट्ये आणि ध्येय लाल किल्ल्यावरून जाहीर करतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांची उद्दिष्ट्ये ठरवण्यासाठी मदत केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट आई-वडिलांना सांगून विकत घेण्याऐवजी पालक ती वस्तू विकत घेण्यामागची भावना आणि त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, हे सांगू शकतात. तसेच ती वस्तू विकत घेण्यासाठी ठराविक उद्देशाने बचत केल्यास त्याचा लाभ कसा होतो, हे समजून सांगणे आवश्यक आहे.

बचतीबरोबरच गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची

विद्यार्थ्यांना बचतीबरोबरच गुंतवणुकीचे महत्त्वही वेळोवेळी सांगणे गरजेचे आहे. कारण फक्त पैशांची बचत करून त्यात वाढ होत नाही. बचत केलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर त्यामध्ये योग्य पद्धतीने वाढ होऊ शकते. अशावेळी पैसे वाढविण्याचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत.याची माहिती विद्यार्थ्यांना देता येऊ शकते. यातून मुलांना त्याची तोंडओळख होण्यात मदत होऊ शकते.

कर्ज चांगले की वाईट

आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील आणि आपल्याला पैशांची खूपच गरज असेल तर काय करता येऊ शकते. नातेवाईकांव्यतिरिक्त आपल्याला कोणी पैसे उसने देऊ शकतं का? ते किती आणि कसे मिळतात. तसेच सतत उसने किंवा कर्जाने पैसे घेणे कितपत चांगले याची माहिती मुलांना देता येऊ शकते. घेतलेले कर्ज वेळेत परत केले नाही तर कसे मोठे नुकसान होते. याची माहितीही मुलांना दिली पाहिजे.

अशाप्रकारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर साक्षर, आर्थिक साक्षर, डिजिटल साक्षर असा एक-एक टप्पा पूर्ण करणे गरजेचे आहे. या गोष्टी शिकत असताना त्याच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूदेखील समजून घेणे गरजेचे आहे. यामुळे मुलांचा आर्थिक साक्षरतेचा प्रवास पक्का होईल आणि भविष्यात त्यांना कोणत्याही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.