Child Financial Literacy: लहान मुलांना क्रिकेट, चित्रकला, डान्स स्विमिंग असे विविध एक्स्ट्रा करिक्युलर क्लासेस पालक लावत असतात. त्याच प्रमाणे आर्थिक साक्षरता मुलांमध्ये लहानपणापासून रुजवण्यासाठी सुद्धा शिक्षण दिले पाहिजे. कारण, पैशाचा संबंध व्यक्तीच्या जन्मापासून येतो. भारतामध्ये आर्थिक साक्षरतेचा समावेश शालेय अभ्यासक्रमात नाही. त्यामुळे मुलांना पुढे जाऊन गुंतवणूक, आर्थिक व्यवहार, बचत याबाबत ज्ञान मिळत नाही.
बालकांना पैशांची लहानपणापासून किंमत समजण्यासाठी अर्थसाक्षर करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे 7-8 वर्षांपासून पुढे आर्थिक साक्षरतेचे धडे लहान मुलांना देऊ शकतो. बाजारात असे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याद्वारे मुलांना आपण आर्थिक साक्षर करू शकतो.
आर्थिक साक्षरता कोर्सेसमध्ये काय अभ्यासक्रम असतो पाहूया?
पैसा म्हणजे काय? त्याची गरज व्यक्तीला कशासाठी लागते याची सर्वप्रथम ओळख मुलांना करून दिली जाते. पैशाद्वारे व्यवहार कसा केला जोता. हे विविध गेम्स आणि प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगितले जाते. मुलांना विविध अभिनय करायला लावून पैशांचे व्यवहार करायला लावले जातात.
उत्पन्नाचे स्रोत म्हणजे काय? पैसे कसे कमावले जातात.
बजेट म्हणजे काय, खर्च कशाला म्हणतात, कोण कोणत्या गोष्टींवर खर्च होतो, बँक कशी काम करते? हे मुलांना रिअल लाइफ उदाहरणांद्वारे समजून सांगितले जाते.
बँका कशा काम करतात? बँकेद्वारे दिले जाणारे डेबिट/क्रेडिट कार्ड कसे काम करतात.
कर्ज म्हणजे काय? कर्ज कसे उपयोगी ठरते.
विमा क्षेत्राची तोंडओळख.
बचत, गुंतवणूक संकल्पना, पर्याय, बचतीचे मार्ग, शेअर बाजाराची तोंडओळख.
एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, उत्पादन खर्च कसा मोजला जातो.
विविध प्रकारच्या सेल मध्ये डिस्काउंट कसा दिला जातो?
आर्थिक संकट म्हणजे काय?
वरील विषयांवर मुलांना सविस्तर माहिती दिली जाते. तसेच व्यवहार कसे चालतात याचे प्रात्यक्षिक दिले जाते. काही मुले बँक प्रतिनिधी, तर काही ग्राहक, विक्रेता खरेदीदार अशा भूमिकांतून मुलांना फायनान्स सोपा करून सांगितला जातो.