पैसा हा सर्व घटकातील लोकांसाठी महत्त्वाचा आहे. पण त्याचे महत्त्व लवकरात लवकर कळणे आवश्यक आहे. कारण पैसा हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. ज्याच्याकडे पुरेसे पैसे आहेत आणि ते योग्य पद्धतीने वापरण्याची समज आहे. तो आपले जीवन स्वत:च्या लाईफस्टाईलने जगू शकतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या नवीन आर्थिक साक्षरतेच्या उपक्रमामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचाही समावेश केला आहे. याचा अर्थ आरबीआयने शालेय विद्यार्थी हा घटक महत्त्वाचा मानून त्यांच्यासाठी आर्थिक साक्षरतेचे शिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत शिकत असताना अनेक गोष्टींचे ज्ञान आणि माहिती दिली जाते. पण आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेत व्यावहारिक आणि प्रात्यक्षिक शिक्षणाचा अभाव दिसून येतो. तो भरून काढण्यासाठी ज्या गोष्टी मुलांना शाळेत शिकवल्या जात नाहीत. त्या गोष्टी पालक घरातून नक्कीच शिकवू शकतात. यात आर्थिक शिक्षणाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कारण पैसे मिळवण्यासाठी किती आणि कशाप्रकारे मेहनत करावी लागते. तसेच मिळवलेले पैसे योग्य पद्धतीने साठवणे आणि गुंतवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच पैसे खर्च कसे करावेत याचेही तारतम्य असणे गरजेचे आहे. यासाठी काही मुलांना लहाणपणापासूनच काही आर्थिक सवयी लावल्या तर त्याचा त्यांना पुढे नक्कीच फायदा होऊ शकतो.
Table of contents [Show]
पैशांविषयी मुलांसोबत चर्चा करा
पैसे हे सर्वांसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्याविषयी मुलांसोबत नेहमी चर्चा करा. पैसे किंवा व्यवहार हे गंभीर विषय आहेत. मोठे झाल्यावर त्यांना कळतील. असा विचार करू नका. पैशांचे महत्त्व, त्यातून निर्माण होणारे संबंध किंवा पैशांची फसवणूक कशी होऊ शकते. अशा गोष्टी मुलांना व्यावहारिक उदाहरणाद्वारे सांगणे आवश्यक आहे.
पैशांचा जमा-खर्
मुलांना बजेटबद्दल सांगणे किंवा त्याविषयी चर्चा करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. कारण आपल्याकडे पैसे किती आहेत? आणि त्यातील खर्च किती करायचे. तसेच उरलेल्या पैशांचे काय होते. हे जर मुलांना लहान वयात कळले तर त्याचा त्यांना आयुष्यभर फायदा होऊ शकतो. तसेच यातून मुलांना आर्थिक शिस्त लागण्यास मदत होऊ शकते.
पॉकेटमनी मागची फिलॉसॉफी सांगा
मुलांना प्रत्येक महिन्याला किंवा आठवड्याला विशिष्ट खर्चासाठी पॉकेटमनी दिला जातो. पण हा पॉकेटमनी देताना त्याच्या जमा-खर्चाचा हिशोब मुलांकडून घेत जा. पॉकेटमनी हा फक्त खर्चासाठीच असतो ही संकल्पना मुलांच्या मनातून काढून टाका. पॉकेटमनीतून फक्त बचत किंवा आवश्यक गोष्टींवर खर्च करण्यासाठीची तरतूद अशी नवीन संकल्पना त्याला समजावून सांगा.
गरज आणि इच्छा यातील फरक स्पष्ट करा
अनेकवेळा मुले गरज नसताही पालकांकडे वेगवेगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी आग्रह करतात. पण अशावेळी पालकांनी मुलांच्या हट्टापुढे न झुकता त्या वस्तुची गरज किती आहे. त्यातून नेमका काय फायदा होणार आहे. हे समजून सांगणे आवश्यक आहे. फक्त इच्छा म्हणून खरेदी केलेल्या वस्तुंमुळे जेव्हा खरीच गरज असते तेव्हा पैसे संपलेले असतात. त्यामुळे कोणताही खर्च करताना त्याची गरज किती आणि इच्छा किती हे समजून घेणे गरजेचे आहे.
पैसे गुंतवण्याचे प्रकार मुलांना समजावून सांगा
मुलांना पिगी बँक किंवा पैसे साठवण्याबरोबरच, साठवलेले पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्यात कशी वाढ होते. हे सुद्धा सांगणे गरजेचे आहे. कारण पैसे नुसते जमा करून वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी खूप वर्षे वाट पाहावी लागू शकते. पण तेच जमा केलेले पैसे योग्य ठिकाणी ठेवले किंवा गुंतवणूक केले तर त्यात कमी कालावधीत कशी वाढ होऊ शकते. हे सुद्धा मुलांना सांगणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे मुलांमध्ये आर्थिक साक्षरतेविषयी चांगल्या सवयी रुजवल्या जाऊ शकतात. पण यासाठी पालकांना आपल्या स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे. घरातीलच छोट्या-छोट्या गोष्टींपासून याची सुरूवात केली तर या सवयींचा मोठ्यापणी चांगला फायदा होईल.