केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी केंद्र सरकारच्या फॉरेन ट्रेड महासंचालनालयाने (DGFT) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या अधिसूचनेनुसार, सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे! यामुळे आता परदेशातून मोठमोठ्या कंपन्यांचे लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटर भारतात येऊ शकणार नाहीयेत. ‘मेक इन इंडिया’ वर भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून विशेष लक्ष देत आहे. भारतातच या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन बनावे आणि विक्री व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
फॉरेन ट्रेड महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार, HSN 8741 अंतर्गत येणारे लॅपटॉप, टॅब्लेट, पर्सनल कॉम्प्युटर, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कॉम्प्युटर आणि सर्व्हरची आयात यापुढे प्रतिबंधित असणार आहे. परंतु ज्या कंपन्यांशी आधीपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयातीबाबत निर्णय झालाय, अशा कंपन्यांच्या उत्पादनांची आयात केली जाऊ शकेल असेही या अधिसूचनेत म्हटले आहेत. म्हणजेच वैध परवाना असल्यास परदेशातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात करता येऊ शकेल, मात्र नव्याने कुठलीही उत्पादने आयात करता येणार नाहीत.
केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे.#laptop #tablet #computer #dgft #indiangovernment pic.twitter.com/RlCyVKTpAZ
— Sagar Bhalerao (@SagarMahamoney) August 3, 2023
‘या’ कारणासाठी करता येणार आयात!
परदेशी बनावटीच्या सर्वच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंदी घालण्यात आलेली नाही. काही विशिष्ट कारणांसाठी परदेशी वस्तू खरेदी करता येणार आहेत. Reserach and Development म्हणजेच विकास आणि संशोधन प्रक्रियेसाठी, परदेशी उत्पादनांमध्ये होत असलेले बदल जाणून घेण्यासाठी, वापरलेले तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी एकावेळेस केवळ 20 नग इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात करता येणार आहे असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.
‘मेक इन इंडिया’साठी खटाटोप?
गेल्या काही वर्षात भारतात चीनमधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात वाढली होती. भारताची लोकसंख्या, ग्राहकसंख्या लक्षात घेता देशोविदेशातील कंपन्या भारतीय बाजारपेठेकडे एक संधी म्हणून बघत आहेत. अशातच देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उतादन वाढावे आणि देशातच त्यानिमित्ताने रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी या स्वरूपाचा निर्णय घेतला गेला आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. सोबतच येत्या 5 ऑगस्टला जिओ रिलायन्सचा JioBook 2.0 लॉन्च होणार आहे. केवळ 16,499 रुपयांना बेस्ट फीचर्स असलेला लॅपटॉप भारतीयांना खरेदी करता येणार आहे. हा गेम चेंजर लॅपटॉप लॉन्च होण्याआधीच फॉरेन ट्रेड महासंचालनालयाची अधिसूचना आली आहे हे विशेष!