तब्बल 149.60 कोटींचे कर्ज थकवल्या प्रकरणी आयडीबीआय बँकेने झी एंटरटेंमेटविरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (National Company Law Tribunal - NCLT) आयडीबीआय बँकेने झी एंटरटेंमेंट विरोधात दिवाळखोरीचा दावा दाखल केला.
दिवाळखोरी आणि नादारी कायदा 2016 च्या कलम 7 नुसार बँकेने झी एंटरटेंमेंट एंटरप्राईस लिमिटेड (ZEEL) विरोधात कठोर कार्यवाही केली आहे. झी एंटरटेंमेंट आणि आयडीबीआय बँक यांच्यात कर्जाबाबत करार झाला होता. त्यानुसार सिटी नेटवर्क्स लिमिटेड या कंपनीला अर्थसहाय्य करण्यात आले होते.
सिटी नेटवर्क्स (SITI Networks) ही पूर्वी सिटी केबल नेटवर्क या नावाने कंपनी ओळखली जात होती.एस्सेल समूहातील ही एक कंपनी आहे.कंपनी देशभरातील 580 लोकेशनवर केबल सेवा पुरवते. कंपनीचे 11.3 दशलक्ष ग्राहक आहेत.
झी एंटरटेंमेंटकडे जवळपास 149.60 कोटी रुपयांची थकबाकी वसुली बाकी असल्याचे बँकेने म्हटले आहे. झी एंटरटेंमेंसाठी फायनान्शिअल क्रेडिटर्स असल्याचा दावा आयडीबीआय बँकेने केला आहे. झी कडून कर्जफेड करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आयडीबीआय बँकेने केला आहे.यापूर्वी एप्रिल महिन्यात एचडीएफसीने सिटी नेटवर्क्स विरोधात 296 कोटींच्या वसुलीसाठी दिवाळखोरीचा दावा दाखल केला होता.
आज शेअर्सवर काय परिणाम झाला
आज शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये आयडीबीआय बँकेचा शेअर 2.21% घसरला. तो 57.40 रुपयांवर ट्रेड करत होता. झी एंटरटेंमेंट एटंरप्राईसचा शेअर 3.17% घसरणीसह 250.15 रुपयांवर ट्रेड करत होता.