ICICI बँकेने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (ICICI CSR Fund) अंतर्गत आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी टाटा मेमोरियल सेंटरला (TMC) दिली आहे. 1200 कोटी रुपये आयसीआयसीआय बँकेने कर्करोग ट्रिटमेंट हब उभारणीसाठी देऊ केली आहे. भारतातील कोणत्याही कंपनीने कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी एवढी मोठी रक्कम याआधी दिली नाही. या पैशांनी देशात तीन कर्करोग रुग्णालये उभारण्यात येणार आहेत.
या तिन्ही रुग्णालयात कर्करोगावरील उपचारासाठी अत्याधुनिक मशिन्स बसवण्यात येणार आहेत. (ICICI CSR Fund help to Tata memorial center) एकूण 7 लाख 50 हजार स्केअर फूट जागेवर ही नवी ट्रिटमेंट सेंटर्स उभारण्यात येतील. नवी मुंबई, पंजाबमधील मुल्लानपूर आणि विशाखापट्टणम येथे ही सेंटर्स बांधण्यात येतील. या तिन्ही सेंटर्समध्ये हाय एंट रेडिऑलॉजी मशिन्सची सुविधा असेल.
मुंबईत कर्करोगावरील रुग्णालय उभे राहणार
नवी मुंबईतील खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयावर 460 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. विशाखापट्टनम आणि मुल्लानपूर येथील रुग्णालयांवर अनुक्रमे 390 कोटी आणि 350 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांना या सुविधेचा फायदा होणार आहे. रेफर सेंटर म्हणून या रुग्णालयात रुग्ण इतर ठिकाणांवरून पाठवण्यात येतील. देशभरातील 25 हजार रुग्णांना या नव्या रुग्णालयातून उपचार मिळतील.
टाटा मेमोरियल सेंटर्सद्वारे 1 लाखांपेक्षा जास्त रुग्णावर उपचार
देशभरात टाटा मेमोरियल सेंटरची अनेक रुग्णालये आहेत. यातून दरवर्षी 1 लाख 25 हजार रुग्णांना उपचार मिळतात. देशातील 10% कॅन्सर रुग्ण टाटा मेमोरियल सेंटरमध्ये उपचार घेतात. आयसीआयसीआय बँक पुढील 3 वर्षात हा फंड टाटा मेमोरियल सेंटरला देणार आहे. ही रक्कम एकूण सीएसआर फंडाच्या 50% आहे. 2027 पर्यंत या तिन्ही कॅन्सर सेंटर्सची कामे पूर्ण होतील. तिन्ही कॅन्सर सेंटर्समधून रुग्णांना स्वस्तात उपचार मिळतील.
टाटा मेमोरियल सेंटर या संस्थेला डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी विभागाकडूनही निधी मिळतो. तसेच टाटा ट्रस्ट आणि इतर संस्था आर्थिक मदत करतात. मुंबई, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, आसाम, आंध्र प्रदेश या राज्यात टाटा मेमोरियल सेंटर्सची रुग्णालये आहेत. सर्व सुविधांनी युक्त कॅन्सर रुग्णालय उभारण्यास 600 ते 650 कोटी रुपये खर्च येतो.
भारतात दरवर्षी कॅन्सरचे नवे रुग्ण किती?
भारतामध्ये दरवर्षी कॅन्सरचे 13 लाख नवे रुग्ण सापडतात. कर्करोगावरील उपचार महाग असल्याने सर्वसामान्य आणि गरीब घरातील रुग्णांना खर्च परवडत नाही. त्यामुळे टाटा मेमोरियल सेंटर्स हा कॅन्सर रुग्णांसाठी मोठा आधार आहे. TMC द्वारे 60% रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तर 20% रुग्णांकडून एकूण खर्चाच्या 15 ते 20% रक्कम घेतली जाते. इतर 20% रुग्णांकडून 60 ते 70% खर्च घेतला जातो.