Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hurun India Report: खासगी क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सर्वात जास्त, तर अदानी ग्रुपच्या मूल्यांकनात घसरण

Reliance Industries has the highest market value

Image Source : www.tradebrains.in

Hurun India Report: बरगंडी प्रायव्हेट-हुरून इंडियाने मंगळवारी देशातील 500 खासगी कंपन्यांच्या मूल्यांकन बदलाबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) देशातील सर्वात जास्त मूल्यांकन असणारी कंपनी ठरली आहे. तर अनलिस्टेड कंपन्यांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) पहिल्या क्रमांकावर आहे.

बरगंडी प्रायव्हेट-हुरून इंडियाने (Burgundy Private-Hurun India) देशातील 500 मोठ्या खासगी कंपन्यांच्या मूल्यांकनातील बदलाबाबत अहवाल तयार केला आहे. हा अहवाल कंपनीने मंगळवारी जाहीर केला. या अहवालातील माहितीनुसार अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) देशातील नंबर 1 प्रायव्हेट कंपनी ठरली आहे. या कंपनीचे मूल्यांकन 16.4 लाख कोटी रुपये असून ती देशातील सर्वात जास्त मूल्यांकन असलेली कंपनी ठरली आहे. तर दुसऱ्या स्थानावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आहे. या कंपनीचे मूल्यांकन 11.8 लाख कोटी रुपये आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर एचडीएफसी बँक  (HDFC Bank) आहे. जिचे मूल्यांकन 9.4 लाख कोटी रुपये आहे. या अहवालात आणखी काय म्हटलं आहे, जाणून घेऊयात.

अदानी ग्रुपच्या मूल्यांकनात 52 टक्क्यांची घसरण

बरगंडी प्रायव्हेट- हुरून इंडियाने (Burgundy Private-Hurun India) हा अहवाल 30 ऑक्टोंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत तयार केला आहे. या कालावधीतील देशातील खाजगी क्षेत्रातील 500 कंपन्यांच्या बदललेल्या मूल्यांकनाबाबत हा अहवाल असून यातील माहितीनुसार या कंपन्यांच्या मूल्यांकनात गेल्या सहा महिन्यात जवळपास 6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. तर अदानी ग्रुप कंपनीचे मूल्यांकन हे अर्ध्याहून कमी झाले आहे.

या कालावधीत अदानी गॅसचे (Adani Gas) मूल्यांकन 73.8 टक्क्यांनी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तर अदानी ट्रान्समिशनच्या (Adani Transmission) मूल्यांकनात 69.2 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या (Adani Green Energy) मूल्यांकनात 54.7 टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली. हुरूनच्या रिपोर्टनुसार अदानी ग्रुपच्या एकूण 8 कंपन्यांचे बाजारमूल्य 9.5 लाख कोटी रुपये आहे. मागील सहा महिन्यात यामध्ये 52 टक्क्यांची घसरण झाली आहे.

अनलिस्टेड कंपन्यांमध्ये ‘या’ कंपनीचे मूल्यांकन सर्वात जास्त

हुरून इंडियाच्या या अहवालानुसार लस बवणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) देशातील सर्वात जास्त मूल्यांकन असणारी अनलिस्टेड (unlisted) कंपनी ठरली आहे. या कंपनीचे मूल्यांकन 1. 92 लाख कोटी रुपये आहे. महत्त्वाचं म्हणजे सीरमने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (National Stock Exchange) देखील या शर्यतीत मागे सोडले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मूल्यांकन 1.65 लाख कोटी असून ही देशातील दुसरी अनलिस्टेड कंपनी आहे. तर ई-लर्निंग कंपनी बायजु (Byju) ही देशातील तिसरी अनलिस्टेड कंपनी असून तिचे मूल्यांकन 69, 100 कोटी रुपये आहे.

Source: hindi.moneycontrol.com