• 28 Nov, 2022 17:26

Cardless Cash Withdrawal : UPI द्वारे ATM मधून पैसे कसे काढायचे जाणून घ्या!

Cardless Cash Withdrawal

Cardless Cash Withdrawal : ग्राहकांना आता युपीआयचा वापर करून एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. यासाठी एटीएम मशीनमध्ये युपीआयचा ऑप्शन दिला जाणार आहे. ही प्रोसेस कशी असणार आहे; याची माहिती आपण घेणार आहोत.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India-RBI) एटीएममधून कार्डलेस कॅश विड्रॉव्हल (Cardless Cash Withdrawal) यंत्रणा सुरू करण्याची परवानगी दिली. कार्डलेस कॅश विड्रॉव्हलमध्ये युपीआयचा (UPI) वापर केला जाणार आहे. एटीएममधून कशापद्धतीने कॅश विड्रॉव्हल केली जाईल. याबाबत आरबीआयने अजून स्पष्ट केलेले नाही. पण या प्रकारच्या व्यवहारासाठी ग्राहकांना एटीएममध्ये कार्ड टाकण्याची आवश्यकता भासणार नाही.

आरबीआयने कार्डलेस कॅश विड्रॉव्हल करण्याची परवानगी दिली आहे. पण अजून सर्व बॅंकांनी ही यंत्रणा पूर्णपणे सुरू केलेली नाही. याबाबत बॅंका आणि आरबीआय यांचे ट्रायल आणि एरर सुरू आहे. एटीएममधून (Automated Teller Machine-ATM) युपीआयचा वापर करून पैसे कसे काढले जाणार याबाबत स्पष्टता दिलेली नाही. सध्या ज्या बॅंकांमध्ये ही सुविधा सुरू आहे. तिथे मोबाईलमधील ओटीपीचा वापर करून हा व्यवहार पूर्ण करता येतो.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मागे झालेल्या मॉनेटरी पॉलिसीच्या बैठकीदरम्यान कार्डलेस कॅश विड्रॉव्हलची सुविधा युपीआयद्वारे घेतली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना याची उत्सुकता आहे की, एटीएम कार्डविना युपीआयच्या मदतीने एटीएममधून पैसे कसे काढणार? याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.

युपीआयच्या मदतीने एटीएममधून असे काढता येणार पैसे!

एटीएममधून युपीआयच्या मदतीने पैसे काढताना, एटीएममध्ये युपीआयचा एक पर्याय दिला जाणार आहे. हा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकाला रक्कम टाकावी लागणार आहे. एटीएममध्ये अमाऊंट टाकल्यानंतर युपीआयद्वारे एटीएम मशीनमध्ये क्यूआर कोड जनरेट होईल. हा कोड मोबाईलमधील युपीआय अॅपमधून स्कॅन करावा लागणार हे. त्यानंतर पिन क्रमांक टाकून एटीएममधून पैसे काढता येतील.

या प्रकियेद्वारे एटीएममधून कॅश काढल्यास ग्राहकांची कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग यासारख्या फ्रॉडपासून सुटका होईल. कारण या प्रक्रियेमध्ये एटीएममध्ये कार्डचा वापरच केला जाणार नाही. त्यामुळे कार्डशी संबंधित फ्रॉड किंवा धोके यातून ग्राहकाची सुटका होणार आहे. 

सध्या एटीएममधून कार्डलेस कॅश विड्रॉव्हल कशी होते!

सध्या काही मोठमोठ्या बॅंका एटीएममधून कार्डलेस कॅश विड्रॉव्हलची सुविधा देत आहेत. यामध्ये आयसीआयसीआय बॅंक, कोटक महिंद्र बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि एसबीआय बॅंक (ICICI BANK, KOTAK MAHINDRA BANK, HDFC BANK & SBI BANK) यांचा समावेश आहे. या बॅंकांच्या एटीएममधून कार्डविना पैसे काढता येतात. पण यासाठी ग्राहकाला आपल्या मोबाईलमध्ये एक अॅप इन्स्टॉल करावे लागते. अॅपमध्ये कार्डलेस कॅश विड्रॉव्हलचा पर्याय देण्यात आला आहे. अॅपमध्ये पैसे काढण्याची रक्कम टाकून त्याची रिक्वेस्ट टाकावी लागते. रिक्वेस्ट टाकल्यानंतर एक सिक्रेट कोड येतो. तो एटीएम मशीनमध्ये टाकला की, ग्राहकाच्या मोबाईलवर ओटीपी नंबर येतो. हा ओटीपी नंबर टाकला की एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येतात. या सुविधेसाठी वेगळ्या प्रकारच्या एटीएमचा वापर केला जातो.


कार्डलेस कॅश विड्रॉव्हलचे तोटे!

कार्डलेस कॅश विड्रॉव्हलचे जसे काही फायदे आहेत; तसेच याचे काही तोटे सुद्धा आहेत. जसे की, या सुविधेमार्फत ग्राहकांना त्यांना वाटेल तेवढी रक्कम काढता येत नाही. याचे लिमिट बॅंकेद्वारे ठरवले जाते. उदाहरणार्थ, एचडीएफसी बॅंकेतून एका दिवसात 10 हजार आणि महिन्यात फक्त 25 हजार रुपये काढता येतात. तसेच या सुविधेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना बॅंकेला शुल्कसुद्धा द्यावे लागते.