एटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) मोठी घोषणा केली आहे. आता एटीएम कार्डशिवाय एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषण केली. लवकरच ही सिस्टीम सुरू करण्यासाठी आरबीआयकडून मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध केली जाणार आहे.
शक्तिकांत दास यांनी आज नवीन आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. यावेळी त्यांनी एटीएम कार्डशिवाय एटीएम मशीनमधून पैसे काढण्याबाबतच्या नवीन प्रणालीची घोषणा केली. डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा काही बॅंकामध्येच सुरू आहे. सध्या ही सुविधा फक्त आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बॅंकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
कार्ड क्लोनिंगला बसणार चाप
कार्डलेस एटीएमद्वारे पैसे काढण्याच्या या नवीन प्रणालीमुळे कार्ड क्लोनिंग करून फसवणूक करणाऱ्या लोकांच्या कारवायांना आळा बसेल. या नवीन प्रणालीद्वारे व्यवहार करताना ग्राहकाची युपीआय (UPI) वरून ओळख निश्चित केली जाणार आहे. या सुविधा आरबीआय आणखी विस्तार करण्याच्या तयारीत असून, एका बॅंकेचा ग्राहक दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढू शकेल, अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याच्या या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना एक चांगली बॅंकिंग सुविधा मिळणार आहे. यामुळे फसवणुकीचे प्रकार कमी होण्यास मदत होणार आहे.