Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अफवांना कसे सामोरे जावे?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अफवांना कसे सामोरे जावे?

गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड (Mutual Fund Investment) किंवा कोणत्याही गुंतवणुकीबाबत काहीही चिंता वाटत असेल तर त्याने सेबी (SEBI) नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहायला हवे!

इंटरनेट, गुगल किंवा विविध सोशल मिडियावरून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर गुंतवणूक करणे हे नेहमीच जोखमीचे ठरू शकते. सध्याच्या अस्थिर वातावरणात आर्थिक सल्लागाराशिवाय किंवा स्वत: केलेल्या अभ्यासपूर्ण निर्णयाशिवाय केल्या गेलेल्या गुंतवणुका तोट्यात जात असल्याचे दिसून येत आहे. शेअर मार्केट किंवा एकूणच भांडवली मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग नाही. यासाठी आर्थिक नियोजन (Financial Planning) आणि आर्थिक शिस्त (Financial Discipline) खूप महत्त्वाची आहे.

शेअर मार्केट खाली जाणार की वर जाणार हे तज्ज्ञांनाही ठामपणे सांगता येत नाही. कारण शेअर मार्केट हे विविध घटकांवर रिअ‍ॅक्ट होऊन खालीवर होत असते. अर्थात शेअर मार्केटला रिअ‍ॅक्ट होण्यासाठी आर्थिक घडामोडी खूप महत्त्वाच्या आहेत. या घडामोडींच्या आधारावर शेअर मार्केट (Share Market) अंदाज व्यक्त करत असते. तुम्ही अशा किती लोकांना ओळखता ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गमावले आहेत; कारण त्यांना मार्केटचा अंदाज लावता आला नाही. तसेच अशा किती लोकांना ओळखता ज्यांनी शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसे कमावले आहेत; कारण त्यांना मार्केट वर जाणार की खाली जाणार हे कळले होते? तर शेअर मार्केट हे फक्त अंदाजावर चालत नाही. यासाठी सखोल विश्लेषण आणि बाजारातील घडामोडी यांचा आर्थिक संबंध लावावा लागतो. 


दिशाभूल केल्या जाणाऱ्या माहितीपासून सावध राहा! 

सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्यावर सतत माहितीचा भडिमार होत आहे. ही माहिती खरी की खोटी याची खातरजमा न करता ती पुढे पाठवत आहोत किंवा त्यावर रिअ‍ॅक्ट होत आहोत. पण अशा माहितीपासून सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. विशेषत: आर्थिक घडामोडींशी संबंधित असेल तर त्याची खातरजमा केल्याशिवाय त्यावर व्यक्त होऊ नका. अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

सध्या इंटरनेटमुळे गुंतवणूकदारांना मार्केट व आर्थिक विश्वातील घडामोडी सहज मिळू शकतात. तसेच या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत, याचा अनुमान लावता येऊ शकतो. कारण खऱ्या बातम्यांवर आधारित केलेली गुंतवणूक कदाचित चांगला परतावा मिळवून देऊ शकत. पण खोट्या आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांमुळे (MF Rumour) गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराने स्वत:चे मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच माध्यमातून येणाऱ्या खऱ्या आणि खोट्या अशा दोन्ही बातम्यांचा अंदाज घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने अस्सल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. 

शेअर मार्केटवर खऱ्या आणि खोट्या / अफवा पसरवणाऱ्या माहितीचा विपरित परिणाम होत असतो. क्षणार्धात मार्केट कोसळण्याची किंवा मोठी भरारी घेण्याची शक्यता असते. अशावेळी या जोखमीपासून दूर राहण्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला नक्कीच आधार देऊ शकते. कारण कोणत्याही घडामोडीवर रिअ‍ॅक्ट होणं हा शेअर मार्केटचा गुणधर्म आहे. 

त्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये त्याचा इतका परिणाम जाणवत नाही. त्यामुळे Mutual Fund मध्ये गुंतवणूक केल्याने वरील सर्व समस्या आपोआप टाळळ्या जातात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे म्युच्युअल फंडचे मॅनेजर आणि त्यांची मोठी टीम या अशा जोखमींना सामोरे जाण्यासाठी तयार असतात. त्यामुळे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदाराला थेट अशा जोखमीचा सामना करावा लागत नाही. याबाबतचे सर्व निर्णय फंड मॅनेजर घेतात. अर्थात हे निर्णय कंपनीच्या आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे असतात. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीबाबत काही चिंता वाटत असेल तर तुम्ही सेबी (SEBI) नोंदणीकृत आर्थिक सल्लागार किंवा म्युच्युअल फंड वितरकाशी संपर्क साधून त्याचे निवारण करू शकता.

आर्थिक क्षेत्रात यशस्वी होण्यास हुशार किंवा व्यावहारिकदृष्टय़ा तरबेज असणे गरजेचे नसून, संयम आणि शिस्तबद्धता अधिक फायदेशीर ठरते.