पैसे हा आपल्या सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कष्टाने कमावलेला, साठवलेला किंवा गुंतवलेल्या पैशांवर कोणी डल्ला मारला की, आपला जीव तुटतो. कारण ते न भरून येणारं आर्थिक नुकसान असतं. तर अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी किंवा आपली कोणी आर्थिक फसवणूक करू नये, यासाठी अर्थसाक्षरता (Financial Literacy) असणे महत्त्वाची आहे. याचा अर्थ असा नाही की, अर्थसाक्षर असलेल्यांची फसवणूक होतच नाही. पण त्याची तीव्रता मात्र नक्कीच तुलनेने कमी असते. तर आज आपण आर्थिक फसवणूक होण्यापासून कशी काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत.
Table of contents [Show]
पैशांबाबत अलर्ट राहा!
सध्या मार्केटमध्ये फसवणुकीच्या अनेक क्लृपत्या बाजारात आहेत. जसे की, कोणी फोन करून ओटीपी किंवा बॅंकेचा पासवर्ड किंवा तत्सम माहिती विचारतो. तर कोणी आधार कार्ड, किंवा लॉटरी, बंद झालेली पॉलिसी सुरू करण्यासाठी ओटीपी द्या, अशा अनेक प्रकारे लोकांकडून माहिती मिळवून त्यांची फसवणूक केली जात आहे. मुळात म्हणजे अशा गुन्हेगारांचा मूळ उद्देश हाच असतो की, तुमच्याकडून पैसे उकळणे किंवा तुमच्या खात्यातून जमतील तेवढे पैसे ट्रान्सफर करून घ्यायचे. एखादी व्यक्ती आपल्याकडून अशाप्रकारे काही गोपनीय माहिती मागत असेल तर, लगेच अलर्ट व्हायला हवे. कारण कोणतीही गोपनीय माहिती ही मोबाईल किंवा मॅसेजद्वारे कोणतीही बॅंक किंवा संस्था मागत नाही. त्यामुळे अशी माहिती जर कोणी मागत असेल तर, अशा लोकांशी लगेच संवाद बंद करा किंवा त्याची माहिती पोलिसांना द्या.
ई-मेलद्वारे होणारी फसवणूक
तुमचे बॅंक खाते किंवा पॉलिसी बंद झाली आहे. ती सुरू करण्यासाठी अमुक-तमुक क्रमांकावर फोन करा किंवा सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून बंद पडलेले खाते किंवा पॉलिसी पुन्हा सुरू करा, असा मॅसेज दिलेला असतो. असे ई-मेल लगेच स्पॅममध्ये टाकावेत किंवा सायबर क्राईमकडे त्याची तक्रार नोंदवावी. अशा मेलमधून आलेल्या ईमेलवर कधीच क्लिक करू नका. मोबाईलमधूनही नाही आणि लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमधूनही नाही. तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केले तर तुमचे गॅजेट हॅक करून त्यातील सर्व गोपनीय माहिती चोरली जाण्याची शक्यता असते. तसेच अशा ईमेलमध्ये दिलेल्या फोनवर कॉल सुद्धा करू नका.
ओटीपी कोणालाच शेअर करायचा नसतो... बॅंकेलाही नाही...
ओटीपीद्वारे फसवणूक झालेल्यांची संख्या बरीच आहे. पोलिसांकडेही अशाप्रकारे फसवणूक झालेल्या तक्रारी बऱ्याच येतात. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांची संख्या अधिक आहे. बऱ्याचवेळा घरातील इतर सदस्य ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन पेमेंट किंवा ऑनलाईन बॅंकिंगची सेवा सुरू करून देतात. पण त्यासाठी काय काळजी घ्यायची हे मात्र सांगायला विसरतात. याचाच फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात. ते अशा लोकांना फोन त्यांच्याकडून ओटीपी घेऊन त्यांच्याच खात्यातून पैसे काढून पोबारा करतात. त्यामुळे कोणताही ओटीपी हा कधीच कोणालाही शेअर करू नका, अगदी बॅंकेलाही. असे मॅसेज किंवा फोन आल्यास घरातील लोकांना सांगा किंवा असे फोन लगेच कट करा.
क्यूआर कोड पैसे पाठवण्यासाठी स्कॅन करतात
क्यूआर कोडचा वापर करून पैसे लुबाडण्याचा हा आणखी एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. याबाबत आपण जागृत असले पाहिजे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, क्यूआर कोड (QR Code) हा पैसे पाठवण्यासाठीच स्कॅन केला जातो. पैसे मिळवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा लागत नाही. तुम्हाला जर कोणी पैसे पाठवतो असे सांगून क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगत असेल तर, तो फ्रॉड आहे हे समजावे.
पैसे उकळण्याचे नवनवीन मार्ग गुन्हेगारी टोळ्या शोधत असते. पण आपण आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून आपल्या मेहनतीच्या पैशांचे रक्षण केले पाहिजे. त्यासाठी थोडे जागृत राहिले पाहिजे. जमेल तेव्हा त्याची माहिती करून घेतली पाहिजे. तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर याची निक्षूण काळजी घेतली पाहिजे. कारण स्मार्टफोनचे जेवढे फायदे आहेत; तेवढेच त्याचे तोटेही आहेत. ते ओळखायला शिका आणि आर्थिक साक्षरतेबरोबरच डिजिटल साक्षर (Digital Literacy) ही व्हा.