पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. याच जिल्ह्यात दुर्वेश नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावातील आदिवासी महिला बांबू हस्तकला कारागीर बनल्यात. या महिलांना त्यांच्याच गावात रोजगार मिळू लागलाय. सोबतच देशीविशातील लोक त्यांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू खरेदी करतायेत. अर्थसाक्षर बनलेल्या या महिलांची कहाणी या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
'सेवा विवेक सामाजिक संस्था' ही एक सेवाभावी संस्था आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून ही संस्था आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेच प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर या महिला बांबू हस्तकला काम करून रोजगार मिळवत आहेत. आधीच अल्पशिक्षित आणि निरक्षर असलेल्या महिलांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. पैशासाठी घरातील पुरुषावर अवलंबून राहावं लागतं. या सगळ्या समस्या आता सुटू लागल्या आहेत. कारण, गावातील महिला कमवत्या बनल्या आहेत.
Table of contents [Show]
असे दिले जाते प्रशिक्षण
प्रत्येक पाड्यावर जाऊन संस्था महिलांचे प्रशिक्षण वर्ग घेते. एका महिन्याच्या प्रशिक्षणात महिलांना बांबूपासून राख्या, कंदील, मोबाईल स्टँड, ट्रे आदी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना 7-8 वस्तू बनवण्यास शिकवले जाते.
हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इच्छुक महिलांना विविध वस्तू बनविण्यासाठी काम देखील दिले जाते. यातून महिला महिन्याला 7-8 हजार रुपये कमवत आहेत. दिवाळी-दसऱ्याला बांबूपासून बनवलेल्या वस्तूंना मोठी मागणी असते. भेटवस्तूंसाठी लोक मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतात.
जगभरातून वस्तूंना मागणी
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ज्या महिलांना रोजगार हवा असेल त्यांना कच्चा माल संस्थेमार्फत पोहोचवला जातो. निर्धारित वेळेत वस्तू बनवून महिला संस्थेकडे देतात. संस्थेत या वस्तूंवर पुन्हा एकदा गुणवत्ता तपासणी केली जाते. त्यानंतर या वस्तू विक्रीसाठी पाठवल्या जातात. ‘ना नफा ना तोटा’ या नियमानुसार संस्था काम करते. यातून महिलांना उत्पन्न मिळेल हा संस्थेचा हेतू आहे, त्यामुळे कच्च्या मालासाठी आणि वाहतुकीसाठी आलेला खर्च वजा करून महिलांना पैसे दिले जातात.
आदिवासी महिलांनी बांबू हस्तकलेपासून तयार केलेल्या वस्तू आज जागतिक स्तरावर देखील विकल्या जात आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर दिसणाऱ्या बांबुचे, वेताचे पेन स्टॅण्ड, मोबाईल होल्डर, मेकअप बॉक्स किंवा अनेक लहान मोठ्या वस्तू या पालघर जिल्ह्यातील अनेक गावात तयार झालेल्या आहेत. आदिवासी पाड्यांवर तयार होणाऱ्या आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रोजगार निर्मितीचे साधन ठरणाऱ्या अनेक वस्तू आता ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आहेत.
महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देणाऱ्या निर्मला दांडेकर सांगतात की, गेली 7 वर्ष बांबू हस्तकला कारागीर म्हणून त्या पालघर जिल्ह्यात कार्यरत आहेत. बांबू हस्तकला मधून मिळणाऱ्या रोजगारातून त्यांनी टेलरिंग तसेच डिजायनिंगचे क्लास पूर्ण केले आहेत. आर्थिक शहाणपण या निमित्ताने येऊ लागलं असं त्या सांगतात. स्वतःच्या लग्नात आई-वडिलांना आर्थिक मदत करता आली याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. सोबतच लग्नानंतर सासरच्या कुटुंबाला देखील त्यांनी आर्थिक हातभार लावला आहे. नुकतेच त्यांनी आणि त्यांच्या पतीने मिळून नवं घर बांधलं आहे अस त्या सांगतात. एकेकाळी कामासाठी वणवण फिराव्या लागणाऱ्या महिलांना रोजगारातून एक नवा आत्मविश्वास मिळाला आहे असं निर्मलाताईच्या बोलण्यातून जाणवत.
सुरेख जाधव या देखील संस्थेत प्रशिक्षक म्हणून काम करतात. कधी काळी त्या देखील एका कार्यशाळेत प्रशिक्षण घ्यायला आल्या होत्या. गेली 7 वर्ष त्या बांबू हस्तकलेचे काम करत आहेत, गेल्या 2 वर्षांपासून त्या आता प्रशिक्षक म्हणून काम बघत आहेत. ‘कामातून रोजगार आणि रोजगारातून आत्मसन्मान’ मी अनुभवते आहे असे सुरेखाताई सांगतात. मला आता चांगला रोजगार मिळत असल्याने मी माझ्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकते हे मोठ्या अभिमानाने सुरेखाताई सांगतात. येणाऱ्या काळात जास्तीत जास्त महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचा निर्धार सुरेखाताई व्यक्त करतात.
प्रतीक्षा गोवारी या देखील प्रशिक्षक म्हणून संस्थेत काम करतात. बांबू हस्तकलेचे ट्रेनिंग घेण्यापूर्वी मी गृहिणी व शेतीची काम करत होते असं त्या सांगतात. माझं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर मी घरची व शेतीची काम करत बांबू हस्तकलेच्या वस्तू बनवू लागले, त्यातून मला चांगला रोजगार मिळू लागला हे सांगताना त्यांच्यातला आत्मविश्वास ठळकपणे जाणवतो. आधी आम्हाला घर खर्चासाठी इतर लोकांकडून पैसे उसने घ्यावे लागायचे पण आता तशी परिस्थिती राहिली नाही, मी आमच्या घरखर्चात आता हातभार लावू लागले आहे, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवते.
‘मन की बात’ मध्ये कामाचा गौरव!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पालघरमध्ये महिला करत असलेल्या कामाचा उल्लेख केला होता. महिलांच्या सामुदायिक उपक्रमाचे प्रधानमंत्री मोदी यांनी विशेष कौतुक केले होते. या महिलांकडून प्रेरणा घेऊन इतर महिलांनी देखील असे उपक्रम सुरु करावेत असे आवाहन त्यांनी केले होते.
थेट देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या कामाचे कौतुक केले असल्यामुळे सगळ्या महिला खूप खुश आहेत.आपल्या कामाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेले कौतुक बघून महिला आता अधिक उत्साहाने काम करत आहेत.
अर्थसाक्षर महिला, स्वावलंबी महिला!
जेव्हापासून महिलांच्या हाती पैसा येऊ लागला आहे,तेव्हापासून त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे असं सेवा विवेक संस्थेचे कार्यकर्ते विनम्र आचरेकर सांगतात.महिला सुरुवातीला जेव्हा संस्थेत आल्या तेव्हा त्यांचे साधे बँक खाते देखील नव्हते. महिलांना बँक खाते कसे सुरु करायचे, पैसे बँकेत कसे टाकायचे, कसे काढायचे, बचत कशी करायची हे देखील वेळोवेळी सांगितले जाते असे विनम्र सांगतात. आजघडीला जवळपास 200 आदिवासी महिला बांबूपासून वेगवगेळ्या वस्तू बनवत आहेत आणि रोजगार मिळवत आहेत.
हे काम आता केवळ महिलांपर्यंत मर्यादित नसून तरुणांना देखील या प्रक्रियेत सामावून घेतले जात असल्याचे विनम्र यांनी सांगितले आहे. होतकरू आदिवासी तरुणांना बांबू फर्निचर, सोफा बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात असून, येणाऱ्या काळात हे काम देखील वाढवण्याचा संस्थेचा विचार आहे, अशी माहिती विनम्र यांनी दिली आहे.
अर्थसाक्षर महिला आता स्वावलंबी बनत चालल्या आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होत असल्याचे निरीक्षण विनम्र नोंदवतात. येणाऱ्या काळात अधिकाधिक महिलांना रोजगार मिळवून देण्याचा, त्यांना अर्थसाक्षर करण्याचा प्रयत्न सुरु राहणार असल्याचे ते सांगतात.