Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sant Gadge Baba: समाजसुधारणा करताना लोकांना अर्थशिक्षण देणारे संत गाडगेबाबा!

Gadge Maharaj

Gadge Maharaj: आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजाचे भले व्हावे यासाठी गाडगेबाबांनी लोकशिक्षण दिले. जुन्या रूढी परंपरांना छेद देतानाच त्यांनी लोकांना अर्थसाक्षर देखील केले हे विसरता येणार नाही. गाडगेबाबांना लोक उगाचच 'चालते बोलते विद्यापीठ' बोलत नव्हते. त्यांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या जनमानसावर पाहायला मिळतो.

संत गाडगेबाबांची आज जयंती. अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे, समाज शिक्षित व्हावा, स्वच्छतेचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी आयुष्यभर संत गाडगेबाबांनी मेहनत घेतली. गाडगेबाबा गावोगावी जात आणि कीर्तनातून लोकांना मूल्यशिक्षण देत. 23 फेब्रुवारी 1876 साली अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव नावाच्या अगदी छोट्याश्या गावात गाडगेबाबांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव होते, डेबूजी झिंगराजी जानोरकर. अशिक्षित असलेल्या गाडगेबाबांनी समाजसेवेसाठी घरदार सोडलं. दिवसा गावातला घाण, कचरा, गटारी साफ करून संध्याकाळी ते कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना मानवमूल्य, समाजमूल्य समजावून सांगत. साफसफाईचे, वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारे गाडगेबाबा आर्थिक नियोजन कसे करावे, पैसे कुठे वापरावेत याबद्दल देखील प्रबोधन करत.

पैसा कमवावा का? 

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थापैकी माणूस जर केवळ अर्थाला म्हणजेच पैशाला महत्व देत असेल तर ते साफ चुकीचे आहे असे गाडगेबाबा म्हणत. पैशासोबत माणसाने नीतिमत्ता देखील कमावली पाहिजे असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. कर्ज काढून तीर्थयात्रा करणाऱ्यांना देव भेटत नसतो असे ते म्हणायचे. पैशाची बचत करणारा व्यक्तीच आयुष्यात सफल होत असतो असे ते कायम म्हणत.

पैशाचा अभिमान नको! 

पैशामुळे लोक गर्विष्ठ होतात असे गाडगेबाबा म्हणत. पैसा हा काही जन्माला पुरत नसतो परंतु त्याचा योग्य संचय केल्यास, बचत केल्यास आपण आपले जीवनमान सुधारू शकतो असे गाडगेबाबा म्हणत. पैशाचा गर्व बाळगणारे लोक निकामी असतात असे ते म्हणत. अंधश्रद्धेसाठी विनाकारण पैसे खर्च करणारे लोक मूर्ख असतात असे ते म्हणत.

धन आणि मालमत्ता

गाडगेबाबा संत असले तरी त्यांनी लोकवर्गणीतून महाराष्ट्रभर धर्मशाळा बांधल्या. पंढरपूर, मूर्तिजापूर, नाशिक, आळंदी, देहू, पुणे, मुंबई, त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या. मूर्तिजापूर, नागरवाडी आणि राहुरी येथे त्यांनी गोरक्षण करण्यासाठी गोशाळा देखील बांधल्या. त्या काळात ही संपत्ती करोडोंची होती. या संपत्तीचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य गाडगेबाबांसारख्या निरक्षर माणसाने आत्मसात केले होते ते केवळ अनुभवाच्या जोरावर! एकदा महात्मा गांधी आणि गाडगेबाबांची भेट झाली. गांधींनी गाडगेबाबांना विचारलं, "तुम्ही लोकवर्गणीतून इतके पैसे जमवले, तुमची संपत्ती किती?". गाडगेबाबा त्यांच्या एका हातात असलेले मातीचे खापर आणि दुसऱ्या हातात असलेली लाकडाची काठी गांधीजींना दाखवत म्हणाले, "हीच माझी संपत्ती!".

गरिबीचे कारण, आर्थिक बेशिस्त आणि शिक्षणाचा अभाव!

नाशिकमध्ये एका कीर्तनात बोलताना आर्थिक बेशिस्त कशी माणसाला देशोधडीला लावते यावर भाष्य केले होते. पैशाचा वापर योग्य ठिकाणी केल्यास भविष्यात योग्य तो परतावा मिळतो हे ते लोकांना पटवून देत. शिक्षणावर माणसाने पैसे खर्च केले पाहिजेत कारण ती एक गुंतवणूकच असते असे गाडगेबाबा म्हणत. याचे उदाहरण देताना ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक चळवळीबद्दल बोलत. फुले दाम्पत्यांनी गरिबांना, बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून दिली याचे महत्व ते अधोरेखित करत. तसेच डॉ. आंबेडकरांचा संघर्ष सांगत ते त्यांनी केलेल्या आर्थिक नियोजनाचे दाखले देत. डॉ. आंबेडकरांच्या आईवडिलांनी पैशाचे नियोजन केले नसते, बचतीचे मार्ग शोधले नसते तर आंबेडकरांना शाळेत घालणे त्यांना जमले नसते. त्यांनी योग्य ठिकाणी पैसा खर्च केला म्हणून आंबेडकर घडले असे ते सांगत.

जमाखर्च ठेवा! 

मानवाला आपला संसार सुखाचा करायचा असल्यास त्याने बचतीला महत्त्व दिले पाहिजे असे गाडगेबाबा कायम म्हणत. आपले उत्पन्न किती आणि आपण खर्च करतो किती याचा ताळेबंद प्रत्येकानं ठेवला पाहिजे असा गाडगेबाबा आग्रह धरत. 'पगार पुरत नाही' अशी तक्रार न करता पैशाचे असे नियोजन करा की 'पगार सरतच नाही' असं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. कमवत्या माणसाने दर महिन्याला ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवली पाहिजे असे ते म्हणत.

आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजाचे भले व्हावे यासाठी गाडगेबाबांनी लोकशिक्षण दिले. जुन्या रूढी परंपरांना छेद देतानाच त्यांनी लोकांना अर्थसाक्षर देखील केले हे विसरता येणार नाही. गाडगेबाबांना लोक उगाचच 'चालते बोलते विद्यापीठ' बोलत नव्हते. त्यांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या जनमानसावर पाहायला मिळतो.

संदर्भ:
1) संत गाडगे महाराज काल आणि कर्तृत्व, लेखक- प्रा. सत्यवान मेश्राम

2) संत गाडगेबाबांच्या कीर्तनातील व्यावहारिक विचार, लेखक- डॉ. महेश डाबरे