Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Society For Single Women : बँकांनी कर्ज नाकारलं, एकल महिलांनी सुरु केली स्वतःचीच पतसंस्था!

Women Bank

Credit Society For Single Women : अनेकदा एकल, विधवा आणि घटस्फोटित महिलांना बँका कर्ज देत नाहीत. कारण त्यांच्याकडे रोजगार नसेल तर गहाण ठेवण्यासाठी काहीच नसतं. पण, अशा महिलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेनं चक्क खास एकल महिलांसाठी एक पतसंस्था सुरू केली. आणि आतापर्यंत 90 लाख रुपयांची छोटी कर्ज या संस्थेनं गरजू महिलांना दिली आहे. या पतसंस्थेचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.

शहाण्याने कोर्टची पायरी चढू नये असं म्हणतात. पण,  उन्मानाबादमध्ये शांताबाई कधी आयुष्यात बँकेची पायरी चढल्या नव्हत्या. नवरा जीवंत होता तोपर्यंत तोच बँकेची काम करायचा. नाही म्हणायला त्यांनी संयुक्त खातं काढलं होतं. आणि त्यातून ते गुंतवणूकही करत होते. पण,  शांताबाईंचा त्यात काही सहभाग नव्हता.        

इतकंच कशाला मुलं थोडी मोठी झाल्यावर वडिलांकडे असलेलं शांताबाईंचं डेबिट कार्ड आणि पासबुक मुलांकडे गेलं. पण, इतक्या वर्षांत स्वत: शांताबाईंनी पासबुक काळं की गोरं पाहिलं नव्हतं. पण, अचानक नवरा गेला. मुलं संसाराची जबाबदारी घेण्याएवढी मोठी नव्हती. आणि ही जबाबदारी पडली शांताबाईंच्या खांद्यावर. आता त्या विधवा एकल माता होत्या.        

अशावेळी शांताबाईंचा संबंध कांता शिंदे यांच्याशी आला. कांता एकल महिलांसाठी पतसंस्था सुरू करण्याच्या प्रयत्नांत होत्या. त्यांनी शांताबाईंना आधार दिला आणि स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी पतसंस्थेच्या मदतीने सहाय्य केलं.        

कांता यांनी अशी आणखी अनेक उदाहरणं महामनी डॉट कॉमशी बोलताना सांगितली. त्यातलं एक तर मजेशीर होतं.        

‘ एका गावात निलोफर शेख आपल्या चार मुलींसह राहत होत्या. पण ,  घरी शौचालय नव्हतं. त्यासाठी दीड किलोमीटर दूर जावं लागत होतं. निलोफर यांना लहान मुलींसाठी ते अजिबात सुरक्षित वाटत नव्हतं. सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत असं कर्ज मिळतं. पण,  त्यासाठी निलोफर पात्र नव्हत्या. मग शेवटी आम्हीच त्यांना दहा हजारांचं कर्ज दिलं. त्यातून निलोफर यांनी घराच्या आवारात शौचालय बांधलं ,’  कांता यांनी आपला एक अनुभव सांगितला.        

त्यांच्यामते,  महिला सबलीकरणाच्या दृष्टीने एकल महिलांचं सामाजिक स्थान लक्षात घेता हा उपक्रम खूप गरजेचा होता.     

mahila-2.jpg
 स्वावलंबी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उस्मानाबाद, दुसरा वर्धापनदिन नुकताच पार पडला 

आम्हाला सुरुवातीला एक एक सदस्य जमवायला श्रम पडले. कारण, विविध सामाजिक कारणांमुळे एकल महिला घराबाहेरच पडत नाहीत. एका मेळाव्यात तर आम्ही सर्वांना गजरा वाटला म्हणून एका वृद्ध महिलेला रडू आलं. कारण, तिला केवळ पती मरण पावला या कारणामुळे कधी कुणी गजऱ्यासारखी क्षुल्लक वस्तू भेट दिली नव्हती. अशा सगळ्या संकटातून पार होत अशा महिलांच्या आर्थिक साक्षरता आणि सबलीकरणासाठी आम्ही ही संस्था उभी केली,’  कांता शिंदे संस्थेविषयी भरभरून बोलत होत्या.        

अशी सुरू झाली एकल महिला पतसंस्था        

उस्मानाबाद हा तसा दुष्काळी जिल्हा. नोकरीधंद्यासाठी इथल्या अनेकांनी स्थलांतर केलंय. पण,  रोजगाराची सर्वात जास्त दाहकता जाणवली ती इथल्या परित्यक्ता,  एकल आणि घटस्फोटित महिलांना. अशा महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन देखील फार काही चांगला नव्हता. या महिलांना काम देण्यासाठी लोक आढेवेढे घेत.        

या सगळ्या समस्यांचा विचार करत ‘कोरो’ या संस्थेने उस्मानाबाद जिल्ह्यातील एकल महिलांना संघटित करण्याचा विचार पुढे आणला. ही गोष्ट असेल 2014-2015 सालातील. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, लोहारा, तुळजापूर आणि उस्मानाबाद शहरात एकल महिलांचं संघटन उभं राहिलं.  2020 अखेरीस सुमारे 19 हजार महिला या संघटनेत सामील झाल्या.    

आणि कोरोना काळात ही संस्था खऱ्या अर्थाने फोफावली. कारण,  एकल महिलांसमोरचं आर्थिक संकट आणखी गहिरं झालं होतं. कारण, या आधीच निराधार महिला आता एकट्या पडल्या होत्या.   

सुरुवातीला पतसंस्थेची  700  रुपये वर्गणी भरण्याचीही अनेक महिलांची क्षमता नव्हती. पण,  मजल दरमजल कर मागची दोन वर्षं या पतसंस्थेनं 90,00,000  रुपयांचं कर्ज आणि ते ही एकल महिलांना उपलब्ध करून दिलं आहे.        

पतसंस्थेच्या संचालक कांता शिंदे याविषयी म्हणतात, 'महिलेच्या नावावर कधी शेती केलेली तुम्हाला दिसणार नाही. महिलेचा तसा विचारच घरातून होत नाही. पण, आमची पतसंस्था महिला मिळून चालवतात. आणि इथल्या संचालक पदावरही तुम्हाला महिलाच दिसतील. दोन वर्षं कष्टाने ही पतसंस्था आम्ही उभी केली आहे.’    

पुढे त्या म्हणतात, ‘2021  मध्ये दुसरं लॉकडाऊन लागलं तेव्हा एकल महिला पतसंस्थेचं महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आलं. एकल महिलांना मदतीची गरज होती. पण,  तेव्हा लॉकडाऊन होतं. मग झूम,  गुगल मीट अशा बैठका घेऊन काम सुरू केलं. आणि आता आमची वार्षिक उलाढाल एक कोटींच्या आसपास आहे.’    

संघटनेतून सुरु झाली अर्थसाक्षरता!     

mahila-1.jpg
एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या अर्थसाक्षर बनतायेत 

एकल महिलांनी एकत्र येत संघटन बांधणी केली. गावपातळीवरल्या बैठकांमध्ये महिला वेगवेगळ्या समस्या घेऊन येऊ लागल्या. काही महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, काही महिलांना घर बांधायचं होतं,  काही महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हवं होतं.    

या सर्व महिलांना कर्ज द्यायला कुणीच तयार नव्हतं. तारण ठेवायला या महिलांकडे काहीच नव्हतं. महिलांच्या नावावर घर नव्हतं,  शेत नव्हतं,  गाडी नव्हती, काही म्हणजे काहीच नव्हतं. परंपरेने सत्ता-संपत्ती ही फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. महिलांना संपत्तीत हिस्सा दिला जात नव्हता. बँक कर्ज देत नव्हती म्हणून महिला सावकाराकडून,  ओळखी-पालखीतून कर्ज घ्यायच्या. त्यातून अनेकदा फसवणूक देखील व्हायची. या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी महिलांनी स्वतःच एक पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला!    

पतसंस्थेची नोंदणी एक मोठं दिव्य!    

पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय तर घेतला परंतु त्याची नोंदणी कशी करावी हे महिलांना माहीत नव्हतं. उस्मानाबाद मधील एका कन्सल्टंटला जावून महिला भेटल्या. सुरुवातीला या एकल महिला असं काही करू शकतील असा विश्वास त्यांना बसला नाही.    

अगोदरच्या पतसंस्थांचा फारसा काही चांगला अनुभव लोकांना नव्हता. जिल्ह्यातील काही पतसंस्था डबघाईला आल्या होत्या. पतसंस्था नोंदणीसाठी सहकार विभागात नोंदणी करणं आवश्यक होतं.  3 महिन्यात 1500 सदस्य आणि 10 लाख रुपये भाग-भांडवल जमा करणं आवश्यक होतं.        

कन्सल्टंट व्यक्तीला महिला हे सगळं करू शकतील याची शंका होती. परंतु महिलांनी हे करून दाखवलं. केवळ अडीच महिन्यात 1632  लोकांची नोंदणी आणि 12  लाख रुपये भाग भांडवल जमा केलं गेलं. एकल महिला संघटनेने पहिलं दिव्य पार केलं होतं.    

पतसंस्थेची नोंदणी आणि वाढती जबाबदारी!    

25 फेब्रुवारी 2021 रोजी उस्मानाबाद सहकार आयुक्त कार्यालयात पतसंस्थेची नोंदणी केली गेली. पतसंस्थेचं नाव ठेवलं गेलं 'स्वावलंबी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उस्मानाबाद '.    

कांता सांगतात की, आतापर्यंत बँक खाते कसे वापरायचे हे कित्येक महिलांना माहीत नव्हतं.आजवर महिलांच्या नावे असलेले बँक खाते त्यांच्या घरातले पुरुष मंडळी चालवत होते.’    

‘कोरो’ संस्थेचे कार्यकर्ते आणि या पतसंस्थेच्या निर्मिती प्रक्रियेत पहिल्यापासून सक्रिय असलेले राम शेळके सांगतात की, ‘महिलांना यामुळे बँक खात्याचे महत्त्व समजू लागले. महिला आता दर महिन्याला बचत करायला आणि ती बँकेत जमा करायला शिकल्या. महिलांना बचतीची सवय लागली हा खूप मोठा सकारात्मक बदल होता.’    

आता या पतसंस्थेत इतर महिला देखील सहभागी होऊ लागल्या आहेत. बँकेच्या कागदपत्रांविषयी , नियम-कायद्यांविषयी राम शेळके हे महिलांना मदत करत आहेत.    

एकल महिलांनी सुरू केला लघुउद्योग!    

पतसंस्थेला महिलांचा आणि इतर नागरिकांचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन महिलांनी नवनवे प्रकल्प सुरू केले. जमिला तांबोळी यांनी स्वतःचा कापड व्यवसाय सुरू केलाय. तस्लिम शेख यांनी मसाला कांडप मशीन खरेदी केलंय. मनीषा महामुनी यांनी त्यांच्या गावातच किराणा दुकान टाकलंय. रेश्मा अत्तार यांनी प्रिंटर आणि झेरॉक्स मशीन खरेदी केलं असून त्या टेलरिंगचा व्यवसाय देखील करत आहेत.

झुलेखा तांबोळी यांनी बांगड्या आणि स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केलाय तर कल्पना कांबळे यांनी स्टेशनरी दुकान सुरू केलंय. अर्थात या सर्वांना अर्थसाहाय्य त्यांच्याच बँकेने म्हणजे स्वावलंबी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने दिले आहे. महिला आता स्वतःच पैशाचे नियोजन करतायेत. आर्थिक उलाढाल करायला महिला आता शिकल्या आहेत.   

petrol.jpg
पेट्रोलपंपावर महिलांना आता रोजगार मिळतो आहे. (Image Source: Kanta Shinde) 

पेट्रोप पंपावर महिला कर्मचारी!    

पतसंस्थेची नोंदणी सुरू होती तेव्हाच या एकल महिला रोजगाराच्या शोधात होत्या. पेट्रोल पंप , हॉस्पिटल , पर्सनल नर्स अशी काही रोजगाराची ठिकाणे महिलांनी शोधली. यापैकी पेट्रोल पंपावर रोजगार मिळणं तुलनेनं अवघड होतं. पेट्रोल पंपावर काम करणं हे केवळ पुरुषांचं काम आहे असा सार्वजनिक समज होता. एकल महिलांनी हा समज मोडून काढण्याचा प्रयत्न केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील काही निवडक पेट्रोल पंप मालकांना त्या जाऊन भेटल्या. त्यांनी हसतमुखाने महिलांच्या मागण्या मान्य केल्या,  त्यांना रोजगार दिला.    

शेतमजूर म्हणून उन्हातान्हात काम करावं लागतं,  पैसे देखील कमी मिळतात. परंतु पेट्रोल पंपावर सावलीत काम करता येतं,  वेळेवर पगार मिळतो,  त्यामुळे आम्ही खुश आहोत असं महिला सांगतात. सुरुवातीला पेट्रोल भरताना महिलांना पाहणे पुरुषांना अवघड वाटायचे,  आता मात्र त्यांना देखील सवय झाल्याचे कांताताई सांगतात. महिन्याला 8  हजार पगार घेऊन महिला आता आपलं घर चालवत आहेत,  मुलाबाळांचं शिक्षण करतायेत.     

rickshaw.jpg
महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. (Image Source: Kanta Shinde) 

रिक्षाचालक महिला!    

पुरुष जर रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत असतील तर महिला का नाही ?  हा विचार एकल महिला संघटनेच्या बैठकांमधून पुढे आला.

पुण्या-मुंबईत महिला रिक्षाचालक अलीकडच्या काळात दिसू लागल्या आहेत. उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागात असा काही विचार करणे जरा अवघड होते. परंतु , महिलांनी या विषयावर सकारात्मक विचार करायला सुरुवात केली. एकमेकींच्या मदतीने महिला आता रिक्षा चालवायला शिकल्यात. 12  महिलांचं लायसन्स देखील निघालंय. घरकाम , मुलाबाळांची शाळा व इतर कामे आवरून झाल्यावर या महिला गावात रिक्षा चालवतात. रोजगाराचा एक नवा पर्याय महिलांसाठी खुला झालाय.    

सकारात्मक परिणाम!    

गेल्या  2 वर्षात महिलांमध्ये आर्थिक साक्षरता विकसित झाली आहे. महिलांच्या हाती आर्थिक सत्ता आल्यामुळे त्या स्वावलंबी बनल्या आहेत. केवळ पतसंस्था उभी करून ही चळवळ थांबली नाहीये ,  तर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी देखील महिला एकमेकींना मदत करतायेत. येणाऱ्या काळात ही आर्थिक स्वावलंबनाची चळवळ संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात आणि नंतरच्या टप्प्यात महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचा विचार ' एकल महिला संघटना ' करत आहेत आणि त्यासाठी कार्यरत आहे.