Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Investment for Housewife: घर खर्चातून बचत करून गृहिणी 'या' ठिकाणी करू शकतात आर्थिक गुंतवणूक

Financial Investment for Housewife

Financial Investment for Housewife: प्रत्येक कुटुंबाच्या बजेटची जबाबदारी त्या घरातील गृहिणीची असते. हीच गृहिणी मासिक बजेट सांभाळून बचत देखील करते. सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. कमीत कमी रकमेमध्ये गुंतवणूक सुरू करता येते. तेव्हा गृहिणी घर खर्चातून बचत करून कोणत्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकतात जाणून घेऊयात.

खरंतर खर्च भागवून बचत करणं, हे महिलांकडून आणि विशेषत: गृहिणींकडून शिकायला हवं. आपली आई किंवा ताई आत्तापर्यंत तांदळाच्या डब्यात, कपाटात किंवा बँकांमध्ये घर खर्चातून वाचलेले पैसे बचत स्वरूपात ठेवत होत्या. मात्र आता काळ बदलला आहे. प्रगत तंत्रज्ञानाबरोबर गृहिणींनी देखील बचतीच्या सवयी बदलायला हव्यात. सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तेव्हा गृहिणींनी घर खर्चातून चार पैसे वाचवून गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवले, तर काही वर्षानंतर मोठा फंड तयार होऊ शकतो. गृहिणींनी घर खर्चातून चार पैसे वाचवून कोणत्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करायला हवी, जाणून घेऊयात.

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना (Post Office RD Scheme)

केंद्र सरकारने नुकत्याच छोट्या गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. याच गुंतवणूक योजनांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस मधील 'आवर्ती ठेवी योजना'. या योजनेत सध्या 6.5% व्याजदर देण्यात येत आहे. याचा गुंतवणूक कालावधी 1,2,3 आणि 5 वर्षाचा असून गृहिणी मुदत कालावधीची निवडून  करून मासिक आधारावर या योजनेत गुंतवणूक करू शकतात. कुटुंबाच्या मासिक खर्चातून बचत करून गृहिणी यामध्ये गुंतवणूक करू शकतात. यातील गुंतवणूक मोठा परतावा मिळवून देऊ शकते.

बँकेतील मुदत ठेव योजना (Bank Fixed Deposit Scheme)

गृहिणी मासिक आधारावर थोडी थोडी रक्कम स्वतः जवळ जमा करून वर्षाच्या अखेरीस एका निश्चित रकमेची बँकेमध्ये मुदत ठेव (FD) करू शकतात. दीर्घकाळासाठी केलेल्या मुदत ठेवीवर चांगला व्याजदर बँकेकडून दिला जातो. बँकेच्या मुदत ठेवीमध्ये कमीत कमी 1000 रुपये गुंतवले जातात. तर याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. प्रत्येक बँकेचे मुदत ठेवीवरील व्याजदर हे वेगवेगळे असते. हे व्याजदर 3% सुरू होऊन 9%पर्यंत मिळते. गृहिणींसाठी हा पर्याय देखील एक उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून समोर येत आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

लोकांना गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी भारत सरकारने 1968 साली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेची (PPF) सुरुवात केली. या योजनेत वार्षिक 7.1% व्याजदर देण्यात येत आहे. यामध्ये किमान 500 रुपये, तर कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाते. ज्यावर कर सवलतीचा लाभ घेता येतो. गृहिणी या योजनेत मासिक आधारावर किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळू शकतात. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेतील खाते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये ओपन करता येते.

एसआयपी (SIP)

सध्या म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये सर्वाधिक लोक गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहेत. ही गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अंतर्गत येते. मात्र यामध्ये सर्वाधिक परतावा मिळत असल्याने बहुतांश लोक यामध्ये गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. एसआयपीमध्ये किमान 500 रुपयांची गुंतवणूक करून एसआयपी सुरू करता येते. याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. एसआयपीचा मुदत कालावधी जितका जास्त असेल, तितका त्यातून मिळणारा परतावा ही जास्त असतो. मात्र यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.