नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये (एप्रिल-जून) देशातील चार बड्या IT कंपन्यांची कर्मचारी संख्या रोडवली आहे. सोबतच कर्मचाऱ्यांवरील खर्चात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. इन्फोसिस कंपनीमधील सुमारे 7 हजार कर्मचारी कमी झाले. सध्या कंपनीमध्ये 336,294 कर्मचारी आहेत. देशातील चार मोठ्या IT कंपन्यांचे मिळून 17,335 कर्मचारी कमी झाले आहेत.
मागील आर्थिक वर्षात ही परिस्थिती आणखी गंभीर होती. 2023 आर्थिक वर्षातील एप्रिल-जून तिमाहीत टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल कंपनीचे मिळून 51 हजार कर्मचारी कमी झाले होते. चालू आर्थिक वर्षात परिस्थिती अगदीच बिकट झाली नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात इन्फोसिस कर्मचाऱ्यांची पगारवाढ करते. मात्र, अद्याप असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
TCS मधील स्थिती काय?
टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस कंपनीने फक्त 523 कर्मचाऱ्यांची भरती केली. मागील वर्षी याच काळात कंपनीने 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती. TCS मध्ये एकूण 615,318 कर्मचारी आहेत. तर नोकरी सोडून जाण्याचा दर (अॅट्रिशन रेट) 17.8% आहे. कंपनीचा कर्मचाऱ्यांवरील खर्च 15 टक्क्यांनी वाढला आहे. येत्या काही दिवसांत कंपनी 40 हजार फ्रेशर्स कामावर घेण्याचा विचार करत आहे.
विप्रो कंपनीतील स्थिती
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विप्रोमधील 8,812 कर्मचारी कमी झाले. एकूण 249,758 कर्मचारी कामावर आहेत. नोकरी सोडून जाण्याचा दर 17.3% आहे. मागील आठ तिमाहीतील हा दर सर्वात कमी आहे. तसेच पहिल्या तिमाहीत कंपनीने फ्रेशर्सची भरती केली नाही.
HCL टेक कंपनीतील स्थिती
एचसीएल कंपनीतील 2,506 कर्मचारी पहिल्या तिमाहीत कमी झाले. मंदी असतानाही कंपनीने 1,597 कर्मचारी भरती केले. कर्मचारी सोडून जाण्याचा दर 16.3% आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावर्षी पगारवाढ मिळणार नाही. तसेच कर्मचाऱ्यांची पगार वाढ अद्याप झालेली नाही. पगारवाढीचा आढावा घेतला जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.