Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाला शेअर बाजारांचा ग्रीन सिग्नल

HDFC-HDFC Bank Merger:

Image Source : www.businesstoday.in

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी समूहातील दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाला शेअर बाजारांनी मंजुरी दिली आहे. एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार आहे. दोन्ही कंपन्यांचे मालमत्ता मूल्य 18 लाख कोटी इतके असेल.

खासगी वित्तीय सेवा क्षेत्रासाठी निर्णायक ठरणाऱ्या एचडीएफसी (Housing Development Finance Corporation Ltd) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाला दोन्ही शेअर बाजारांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. एचडीएफसी बँकेमध्ये एचडीएफसी या वित्त पुरवठादार कंपनीचे विलीनीकरण होणार (HDFC merge with HDFC Bank) आहे. या प्रस्तावाला मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने(NSE) परवानगी दिली. त्यामुळे विलीनीकरणाचा शेवटचा अडथळा देखील पार झाला आहे.  

एचडीएफसी ही वित्त सेवा क्षेत्रातील मोठी खासगी कंपनी आहे. एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचे एकूण मालमत्ता मूल्य 18 लाख कोटींपर्यंत (Combined Asset Value will be 18 lakh crore)  वाढेल. एप्रिल 2022 मध्ये एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने एचडीएफसी कंपनीचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एचडीएफसीकडून बीएसई आणि एनएसईकडे या संदर्भात 5 डिसेंबर 2022 रोजी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. एचडीएफसी बँकेत विलीन करण्याच्या प्रस्तावाला दोन्ही शेअर बाजारांनी 13 डिसेंबर रोजी मान्यता दिल्याचे एचडीएफसी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रस्तावातील माहिती खोटी किंवा चुकीची असल्यास हा प्रस्ताव कधीही रद्द केला जाऊ शकतो, असे बीएसई आणि एनएसई यांनी स्पष्ट केले आहे.

भागधारकांना काय मिळणार 

आज BSE आणि NSE ने एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. दोन्ही कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. विलीनीकरणानंतर एचडीएफसीतील भागधारकांना 25 शेअर्सच्या तुलनेत 42 शेअर एचडीएफसी बँकेचे मिळणार आहेत.जुलै महिन्यात बीएसई आणि एनएसई यांनी दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाला ना हरकत दाखला दिला होता. विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेत पब्लिक शेअर होल्डिंग 100% असेल तर एचडीएफसीतील भागधारकांचा त्यात 41% हिस्सा असेल. आज बुधवारी 14 डिसेंबर रोजी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सकाळी 12.30 वाजता बीएसईवर एचडीएफसी बँकेचा शेअर 1664.00 रुपयांवर आहे. त्यात 0.95% वाढ झाली. एचडीएफसीचा शेअर  1% ने वाढला असून तो 2729.00 रुपयांवर आहे.