आपल्या पगाराच्या बजेटनुसार सुट्टी घेऊन फिरायला जाणाऱ्या इच्छुकांना 18 जुलै, 2022 पासून आपल्या हॉटेल रूम्ससाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण आजपासून (दि. 18 जुलै) दिवसाला एक हजार रुपयांपेक्षा कमी शुल्क आकारणारी हॉटेल्सही जीएसटीच्या जाळ्यात येणार असल्याचे वस्तू व सेवा कर परिषदेने (GST Council) जाहीर केले आहे.
जीएसटी काऊन्सिलने 29 जून, 2022 रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दररोज 1 हजार रुपये म्हणजेच 24 तास राहण्यासाठी 1 हजार रूपये दर आकारणाऱ्या हॉटेलच्या रूम्सवर आता 12 टक्के टॅक्स (New GST Rates for Hotels) आकारला जाणार आहे. आतापर्यंत, दररोज 1 हजार रुपयांपर्यंत दर आकारणाऱ्या हॉटेलमधील रूम्सना जीएसटीमधून सवलत मिळत होती.
आतापर्यंत निवासी किंवा लॉजिंग उद्देशाने सुरू असलेली हॉटेल्स, गेस्ट हाऊस, क्लबमधील दररोज 1 हजार रूपयांपेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या रूम्सना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती. पण जीएसटी परिषदेने ही सूट मागे घेऊन त्यावर 12 टक्के जीएसटी लागू (New GST Rates for Hotel) करण्याची शिफारस केली आहे. या नवीन नियमामुळे सर्व हॉटेल व्यावसायिकांनी 7500 रूपये ते त्यापेक्षा कमी भाडे असलेल्या रूम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होईल, असे म्हटले आहे. परिणामी जीएसटीच्या नवीन नियमामुळे सर्वसामान्यांसाठी सुट्टीच्या दिवसांमध्ये हॉटेलमध्ये राहणं महागात पडू शकतं, Taxmann.com च्या इनडायरेक्ट टॅक्स रिसर्च अॅण्ड अॅडव्हायझरी, पूनम हरजानी (Poonam Harjani, Leader, Indirect Tax Research and Advisory, Taxmann.com) यांचं म्हणणं आहे.
18 जुलै 2022 नंतर हॉटेलच्या रुमवर आकारला जाणारा जीएसटी खालीलप्रमाणे असेल:
दररोज 1 रुपयांपर्यंत दर असलेल्या हॉटेलच्या रूमवरील जीएसटीची सूट मागे घेण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यावर 12 टक्के जीएसटी आकारण्याचा (GST Slab Rates 2022) सरकार विचार करत आहे. सरकारने या क्षेत्रातील टॅक्सचा पाया अधिक व्यापक करण्यासाठी हे बदल केले आहेत; पण यामुळे सर्वसामान्यांना हॉटेलमध्ये राहणं महागणार, असं मत केपीएमजी इंडियाचे इनडायरेक्ट टॅक्स पार्टनर अभिषेक जैन (Abhishek Jain, Partner, Indirect Tax, KPMG India) यांनी व्यक्त केले.
या दरवाढीचा सर्वसामान्यांवर किती परिणाम होऊ शकतो. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा, तुम्ही हॉटेलची एक रूम तुम्ही दोन रात्रीसाठी बुक केली आणि त्याची एका रात्रीची किंमत 900 रूपये आहे. अशा परिस्थितीत कालपर्यंत तुम्हाला या एका रूमसाठी फक्त 1800 रूपये भरावे लागले असते. पण आता यावर आजपासून (दि. 18 जुलै) 12 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. म्हणजे रूमचे भाडे 1800 रुपये अधिक जीएसटी 216 रुपये, असे एकूण 2016 रूपये द्यावे लागणार आहेत.
दरम्यान, छोट्या हॉटेल व्यावसायिकांना या नवीन जीएसटीपासून दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे हरजानी यांचे म्हणणे आहे. जीएसटी काऊन्सिल अगदी लहान हॉटेल्स ज्यांचा वार्षिक महसूल 20 लाख रुपयांच्या करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे; त्यांना कदाचित जीएसटीच्या कक्षेत आणले जाणार नाही, असे हरजानी यांना वाटते.